Mahesh Babu: 'या' कारणामुळे शर्टलेस सीन करण्यास महेश बाबू देतो नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 19:04 IST2022-06-13T18:42:00+5:302022-06-13T19:04:12+5:30
Mahesh Babu: २०१४ मध्ये 'नेनोक्कादीन' या चित्रपटात महेश बाबू एकदाच शर्टलेस झाला होता. त्याच्यानंतर अजूनपर्यंत त्याने असे सीन दिलेले नाहीत.

Mahesh Babu: 'या' कारणामुळे शर्टलेस सीन करण्यास महेश बाबू देतो नकार
टॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे महेश बाबू (Mahesh Babu). दाक्षिणात्य कलाविश्वातील नावाजलेल्या कलाकारांमध्ये महेश बाबूचं आवर्जुन नाव घेतलं जातं. सरकारु वाटी पाटा या चित्रपटातून महेश बाबूने दमदार कमबॅक केलं असून सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे. उत्तम अभिनयासह महेश बाबू त्याच्या फिटनेसमुळेही कायम चर्चेत येत असतो. विशेष म्हणजे फिटनेस फ्रिक असलेल्या महेश बाबूने एका तरी चित्रपटात शर्टलेस व्हावं अशी निर्मात्यांची मागणी असते. मात्र, त्याने असे सीन देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. एका मुलाखतीत त्याने शर्टलेस न होण्यामागचं कारणही सांगितलं.
महेश बाबू कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा तो त्याच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफमधील अपडेटही चाहत्यांना देत असतो. यात बऱ्याचदा तो फोटो, व्हिडीओ शेअर करतो. मात्र, अद्यापही त्याने कधी शर्टलेस फोटो शेअर केलेले नाहीत. याविषयी एका मुलाखतीत त्याला प्रश्न विचारण्यात आला होता.
२०१४ मध्ये 'नेनोक्कादीन' या चित्रपटात महेश बाबू एकदाच शर्टलेस झाला होता. त्याच्यानंतर अजूनपर्यंत त्याने असे सीन दिलेले नाहीत. "कोणत्याही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी माझ्या शरीराचा अशा प्रकारे वापर करणं मला पटत नाही. त्यामुळे केवळ मार्केटिंगसाठी जर माझ्या शरीराचा वापर केला जात असेल तर मला तो मान्य नाही. त्यामुळे असे सीन देत नाही", असं महेश बाबूने सांगितलं.
दरम्यान, महेश बाबू मध्यंतरी एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आला होता. त्यानंतर आता लवकरच तो दोन मोठ्या प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याचं सांगण्यात येतं.