जुनैद खानचा मोठा निर्णय; वडील आमिर खानसोबत पुन्हा काम करण्यास नकार, म्हणाला "ती माझी चूक होती..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 14:43 IST2026-05-13T14:42:18+5:302026-05-13T14:43:15+5:30
जुनैदने आता एक मोठा निर्णय घेतला. इथून पुढे वडील आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊससोबत काम करण्यास त्याने स्पष्ट नकार दिला.

जुनैद खानचा मोठा निर्णय; वडील आमिर खानसोबत पुन्हा काम करण्यास नकार, म्हणाला "ती माझी चूक होती..."
बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमिर खानचा मुलगा जुनैद खानने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'एक दिन' या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात जुनैदच्या विरुद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी मुख्य भूमिकेत होती, तर दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केले होते. मात्र, मोठी अपेक्षा असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नाही. या अपयशानंतर जुनैदने आता एक मोठा निर्णय घेतला. इथून पुढे वडील आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊससोबत काम करण्यास त्याने स्पष्ट नकार दिला.
एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जुनैदने 'एक दिन'च्या अपयशावर आणि आमिर खान यांच्यासोबतच्या कामाच्या अनुभवावर मोकळेपणाने भाष्य केले. जुनैद म्हणाला, "निर्माता म्हणून आमिर खान यांच्यासोबत काम करणं ही माझी चूक होती. त्यांना कथा ऐकवली आणि त्यांनी भावनिक होऊन या चित्रपटाच्या निर्मितीचा निर्णय घेतला. ते एक उत्कृष्ट निर्माते आहेत, यात शंका नाही, पण त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे".
आमिर खान प्रॉडक्शन्स (AKP) मध्ये एका चित्रपटासाठी लागणाऱ्या वेळेबद्दल बोलताना जुनैदने आपली चिंता व्यक्त केली. तो म्हणाला, "आमिर खान प्रॉडक्शन्समध्ये एक चित्रपट बनवायला पाच वर्षे लागतात. बाबा त्यांच्या करिअरच्या अशा टप्प्यावर आहेत की ते पाच वर्षांतून एक चित्रपट करू शकतात, पण माझी नुकतीच सुरुवात झाली आहे. मला आता सातत्याने काम करण्याची गरज आहे. जर मी पुन्हा बाबांकडे गेलो आणि त्यांना कथा आवडली, तर तो चित्रपट प्रदर्शित व्हायला पुन्हा पाच वर्षे लागतील, जे माझ्या करिअरसाठी परवडणारे नाही".