सासरचं आडनाव हटवलं, घटस्फोटाची चर्चा रंगली; पण बॉलिवूड अभिनेत्रीनं 'शाळा'च घेतली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 14:10 IST2025-12-05T14:08:05+5:302025-12-05T14:10:36+5:30
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री लग्नाच्या २० वर्षांनंतर घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. आता अभिनेत्रीनेच यावर स्पष्टीकरण दिलंय

सासरचं आडनाव हटवलं, घटस्फोटाची चर्चा रंगली; पण बॉलिवूड अभिनेत्रीनं 'शाळा'च घेतली!
एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने २००५ साली लग्न केलं होतं. पण आता लग्नाच्या २० वर्षांनंतर ही अभिनेत्री घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. अभिनेत्रीचा पती हा बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्माता आहे.
ही अभिनेत्री म्हणझे दिव्या खोसला कुमार. लग्नाच्या २० वर्षांनंतर दिव्या ही टी-सीरीजचे प्रमुख आणि तिचे पती भूषण कुमार यांच्यापासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा आहेत. दिव्याने नुकतंच सोशल मीडियावर 'आस्क मी एनीथिंग' सेशनमध्ये याविषयी भाष्य केलं. दिव्याने काही दिवसांपूर्वी सासरचं 'कुमार' हे नाव सोशल मीडियावरुन हटवल्याने या चर्चांना आणखी उधाण आलं.
'तत्त्वांवर तडजोड नाही'
आस्क मी एनिथिंग सेशनमध्ये एका नेटकऱ्याने दिव्याला विचारलं की, तुझा घटस्फोट झालाय का? यावर दिव्या हसत हसत म्हणाली, ''नाही, पण मीडियाला हेच हवंय. आमचा घटस्फोट होईल, याचीच जणू मीडिया वाट बघतंय.'' अशाप्रकारे दिव्याने घटस्फोट घेतला असल्याच्या अफवांवर पूर्णविराम दिला.
याच सेशनमध्ये बॉलिवूडमधील मानसिक तणावाला दिव्या कशी सामोरी जाते असं तिला विचारण्यात आलं. यावर दिव्या म्हणाली, ''मला असं वाटतं की, बॉलिवूड एक अशी जागा आहे जिथे चारही बाजूंनी मगरी आहेत. या मगरींचा सामना करुन तुम्हाला तुमचा रस्ता निवडायचा असतो. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहणं, ही महत्वाची गोष्ट आहे. काम मिळवण्यासाठी मी स्वतःच्या तत्वांशी कधीही तडजोड करणार नाही. वर जाऊन तुमच्या कर्माची पाटी साफ असली पाहिजे.''
दिव्या खोसलाने २००५ मध्ये टी-सीरिजचे भूषण कुमार यांच्याशी विवाह केला होता. दोन दशकांच्या वैवाहिक जीवनानंतर हे दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. परंतु या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं दिव्याने सांगितलं. दिव्या सध्या 'सावी' आणि 'यारियां २' नंतर पुढील प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. दरम्यान तिने सोशल मीडियावरुन आडनाव का काढलं, यावर मात्र काहीच सांगितलं नाही.