"माझ्याकडे इतके पैसे नाहीत..."; 'धुरंधर' पाहून पाकिस्तानमधील 'जमील जमाली' काय म्हणाला? व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 09:57 IST2025-12-19T09:56:46+5:302025-12-19T09:57:49+5:30
'धुरंधर'मधील राकेश बेदींनी साकारलेलं जमील जमाली हे पात्र ज्या नेत्यावर आधारीत आहे त्याने प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाला?

"माझ्याकडे इतके पैसे नाहीत..."; 'धुरंधर' पाहून पाकिस्तानमधील 'जमील जमाली' काय म्हणाला? व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडचा बहुचर्चित चित्रपट 'धुरंधर' सध्या भारत आणि पाकिस्तानात मोठ्या चर्चेचे कारण ठरला आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांनी जमील जमाली या नेत्याची भूमिका साकारली. 'धुरंधर'मधली ही भूमिका पाकिस्तानातील नेते नबील गाबोल यांच्यावर आधारीत आहे. 'धुरंधर'बद्दल जेव्हा नबील यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा ते काय म्हणाले? जाणून घ्या
माझी प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवली
नबील गाबोल यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते चित्रपटातील त्यांच्या पात्राबद्दल भाष्य करत आहेत. गाबोल यांच्या मते, चित्रपटात त्यांचे चित्रण एका 'दबंग' नेत्यासारखं दाखवण्यात आलं. पण हे चित्रण चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर आलं. तसेच कराचीतील लियारी या भागाला दहशतवादाचा केंद्रबिंदू म्हणून दाखवल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
'धुरंधर' या चित्रपटावर जागतिक स्तरावर बंदी घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद का मागत नाही, असा प्रश्न विचारला असता गाबोल यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. "आंतरराष्ट्रीय स्तरावर लढा देण्यासाठी खूप मोठ्या निधीची गरज असते आणि माझ्याकडे एवढे पैसे नाहीत," असं विधान त्यांनी केलं.
'धुरंधर' हा चित्रपट राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याचे सांगत पाकिस्तानसह सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि कुवेत यांसारख्या आखाती देशांनी यावर आधीच बंदी घातली आहे. या बंदीबद्दल गाबोल यांनी संबंधित देशांचे आभार मानले असले, तरी पाकिस्तानात अनेक ठिकाणी हा चित्रपट बेकायदेशीररीत्या पायरेटेड प्लॅटफॉर्मवर पाहिला जात असल्याचेही समोर आले आहे.
रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर' चित्रपट भारतीय गुप्तचर संस्थेच्या मोहिमेवर आधारित आहे. यामध्ये २००८ चा मुंबई हल्ला आणि कराचीतील गुन्हेगारी विश्व उध्वस्त करण्याऱ्या कथानकाचा समावेश आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच पाकिस्तानातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, त्यातच आता नबील गाबोल यांच्या विधानामुळे या चर्चांना एक नवी कलाटणी मिळाली आहे.