"मी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये बसले, सीटबेल्ट लावला, अन्..."; विमान दुर्घटनेच्या चार दिवसांनी अभिनेत्रीने सांगितला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 16:54 IST2025-06-15T16:54:14+5:302025-06-15T16:54:56+5:30
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या चार दिवसांनी बॉलिवूड अभिनेत्रीने एअर इंडियामध्ये विमान प्रवास करण्याचा अनुभव सांगितला आहे. काय म्हणाली अभिनेत्री? जाणून घ्या

"मी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये बसले, सीटबेल्ट लावला, अन्..."; विमान दुर्घटनेच्या चार दिवसांनी अभिनेत्रीने सांगितला अनुभव
गुरुवारी १२ जून रोजी दुपारी १.३० च्या सुमारास संपूर्ण देशाला एका धक्कादायक घटनेचा सामना करावा लागला. अहमदाबाद येथे विमान दुर्घटना झाली ज्यामध्ये अनेक प्रवाशांना त्यांचा जीव गमवावा लागला. इतकंच नव्हे ज्या हॉस्टेलवर हे विमान जाऊन आदळलं त्या हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचाही या हल्ल्यात बळी गेला. या विमान दुर्घटनेनंतर चार दिवसांनी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये बसताना बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी त्यांच्या अनुभव सांगितला आहे.
अहमदाबाद दुर्घटनेनंतर झीनत यांनी सांगितला अनुभव
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्या फ्लाइटमध्ये बसलेल्या दिसत आहेत. झीनत यांनी हा फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलंय की, "आज सकाळी मी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये प्रवास करण्यासाठी बसले आहे. यावेळी सीट बेल्ट लावताना मी खूप भावुक झाले आहे. या विमान दुर्घटनेत ज्या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रिय व्यक्तींना गमावलं आहे, त्यांच्याविषयी मी माझं दुःख व्यक्त करुन त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करते." अशाप्रकारे अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या चार दिवसांनी झीनत अमान यांनी मनातील भावुक अवस्था सर्वांना सांगितली.
अहमदाबाद विमान दुर्घटना
गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद विमानतळाजवळ जो विमान अपघात झाला, त्यावेळी एअर इंडियाच्या विमानातील फक्त एकच प्रवासी या भयानक घटनेतून वाचला. त्याच्यावर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. विश्वकुमार रमेश नावाचा हा प्रवासी बोईंग ७८७ ड्रीमलायनरच्या 'ए११' सीटवर होता, ज्यामध्ये २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला. याशिवाय अनेक कुटुंबांनी त्यांच्या प्रियजनांना गमावलं.