कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' सिनेमा मृणाल ठाकूरला कसा वाटला? म्हणाली- "तुझं धाडस... "
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:07 IST2025-02-12T12:00:27+5:302025-02-12T12:07:54+5:30
"उत्तम दिग्दर्शिका म्हणून स्वत:ला...", कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' पाहून मृणाल ठाकूरची लक्षवेधी प्रतिक्रिया

कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' सिनेमा मृणाल ठाकूरला कसा वाटला? म्हणाली- "तुझं धाडस... "
Mrunal Thakur On Emergency: अलिकडेच बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (kanagana Ranaut) तिच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटामुळे चर्चेत आली होती. कंगनाच्या या चित्रपटातील काही दृश्यावर आक्षेप घेतले गेल्यामुळे अनेक काळापासून हा चित्रपट रखडला होता, परंतु बऱ्याच प्रतीक्षेनंतर 'इमर्जन्सी' चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला. दरम्यान, कंगना रनौत आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांना कायम काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतात. कायमच अभिनेत्री हटके भूमिका आणि चित्रपटांमुळे लाईमलाईटमध्ये येते.अशातच कंगनाचा 'इमर्जन्सी' पाहून अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) सोशल मीडियावर सुंदर शब्दांत पोस्ट लिहून तिचं कौतुक केलंय.
अभिनेत्री मृणाल ठाकूरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलंय, "मी नुकताच माझ्या वडिलांसोबत थिएटरमध्ये जाऊन 'इमर्जन्सी' पाहिला आणि मी अजूनही त्यातून बाहेर आलेली नाही. कंगना राणौतची खूप मोठी फॅन असल्याने मोठ्या पडद्यावर हा चित्रपट पाहण्याची मी आतुरतेने वाट पाहत होते आणि हा चित्रपट एक उत्कृष्ट नमुना होता."
पुढे कंगना रनौतचे कौतुक करताना अभिनेत्रीने लिहिलंय, 'गँगस्टर'ते 'क्वीन', 'तनु वेड्स मनू' ते 'मणिकर्णिका', 'थलैवी' आणि आता 'इमर्जन्सी', कंगनाने सातत्याने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिच्या काम करण्याच्या अनोख्या शैलीने मला कायम प्रेरित केलं आहे. या चित्रपटासाठी केलेलं कॅमेरा वर्क, कलाकारांची वेशभूषा आणि परफॉर्मन्स या सर्व गोष्टी लक्ष वेधून घेत आहेत. कंगना, तू एक उत्तम दिग्दर्शिका म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहेस. या चित्रपटातील माझा आवडता सीन म्हणजे आर्मी ऑफिसरची दुर्बीण घेऊन नदीच्या पलीकडे जाऊन आणि ते दृश्य उत्तम प्रकारे टिपलेली ती दृश्ये, हा होता. दरम्यान, 'इमर्जन्सी'ची पटकथा, संवाद, संगीत आणि एडिटिंग सर्व काही उत्तम आणि लक्षवेधी आहे. त्याचबरोबर मला श्रेयस जी, महिमा जी, अनुपम सर आणि सतीश जी, मिलिंद सरांनी साकारलेल्या भूमिका खूप आवडल्या. 'इमर्जन्सी'साठी प्रत्येक कलाकाराने त्याचं सर्वोत्तम दिलं आहे. कंगना, तू फक्त अभिनेत्री नाहीस; तू उत्कृष्ट कलाकार आणि प्रेरणा देणारी आहेस. आव्हानात्मक भूमिका साकारण्याचे तुझे धाडस वाखाणण्याजोगे आहे आणि आपल्या कामाप्रती तुझे समर्पण यातून दिसून येतं."
प्रेक्षकांना केलं आवाहन
दरम्यान, मृणालने प्रेक्षकांना पोस्टद्वारे आवाहन करत म्हटलंय, "तुम्ही अजून 'इमर्जन्सी' पाहिला नसेल, तर एक कृपा करा आणि शक्य तितक्या लवकर हा सिनेमा थिएटरमध्ये पाहा. हे प्रत्येक भारतीयासाठी आवश्यक आहे आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही प्रेरित, उत्साहित आणि थोडेसे भावूक व्हाल याची मला खात्री आहे. ही कलाकृती बनवल्याबद्दल कंगना आणि 'इमर्जन्सी'च्या संपूर्ण टीमचे आभार. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहून मी खूप कृतज्ञ आहे. माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी या भारतीय इतिहासातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक आहेत आणि आता मिस कंगना रणौत ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात हुशार, प्रतिभावान आणि धाडसी अभिनेत्रींपैकी एक आहे." असं म्हणत मृणााल ठाकूरने ही पोस्ट शेअर केली आहे.