हीरो बनण्यासाठी UPSC सोडली, एका अपघाताने उद्धवस्त झालं करिअर; ऐश्वर्याचा 'हा' नायक आठवतोय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:07 IST2025-10-30T13:53:17+5:302025-10-30T14:07:44+5:30
एका अपघाताने उद्धवस्त झालं करिअर; ऐश्वर्याचा 'हा' नायक आठवतोय? आता काय करतो जाणून घ्या...

हीरो बनण्यासाठी UPSC सोडली, एका अपघाताने उद्धवस्त झालं करिअर; ऐश्वर्याचा 'हा' नायक आठवतोय?
Chandrachur Singh : चित्रपटसृष्टीत नशीब फार महत्वाचं आहे, असं म्हटलं तर वावगं ठऱणार नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर पहिलाच चित्रपट हिट झाल्यानंतर एका रात्रीत सुपरस्टार झालेले अनेक अभिनेते आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे चंद्रचूड सिंह. आपल्या मनमोहक हास्याने आणि दमदार अभिनयाने या नायकाने अनेकांची मनं जिंकली. 'तेरे मेरे सपने' आणि गुलजार यांच्या माचिस या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले. मात्र नियतीने घात केला आणि त्याचा कारकीर्दीला ब्रेक लागला. परंतु, तुम्हाला माहितीये का अभिनय क्षेत्रात येण्याआधी चंद्रचूड सिंहला आयएएस अधिकारी बनायचं होतं. पण, त्याने अभिनयाला पहिलं प्राधान्य दिलं.
अभिनेता चंद्रचूड सिंहचा जन्म ११ ऑक्टोबर १९६८ रोजी उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे झाला. समृद्ध वारसा असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या चंद्रचूड यांचे वडील कॅप्टन बलदेव सिंग हे लष्करी अधिकारी होते. तसेच सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी राजकारणाची वाट धरली. आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चंद्रचूड सिंह एका संगीत महाविद्यालयात शिक्षकाची नोकरी केली. मात्र, अभिनयाची आवड त्याला शांत झोपू देत नव्हती.
'तेरे मेरे सपने' नंतर पंजाबमधील खलिस्तान चळवळीत भरकटलेल्या तरुणांवर झालेल्या परिणामांवर प्रकाश टाकणाऱ्या गुलजार यांच्या 'माचिस' चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली. या भूमिकेमुळेच त्यांना सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.चंद्रचूड सिंहने आपल्या कारकिर्दीत ऐश्वर्या राय, प्रीती झिंटा या नायिकांबरोबर काम केलं आहे. एकेकाळी त्याची तुलना शाहरुख खानसोबत केली जायची.
मात्र, चित्रपटात आश्वासक भूमिका साकारणार्या या अभिनेत्याची करिअर बहरत असताना नियतीने घात केला. पाण्यावर स्कीईंग करत असतांना झालेल्या अपघातामुळे त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. अनेक दिवस बेडरेस्ट करावी लागल्याने त्याचा शरीरयष्टीवर परिणाम झाला. हातातील अनेक चित्रपट दुस-या कलावंतांकडे गेले. पुन्हा पदार्पण करण्याचा प्रयत्न केला पण मनासारख्या भूमिका मिळाल्या नाहीत. तरीही यानंतर 'बेताबी', 'शाम घनश्याम' , 'दिल क्या करे' , 'दागः द फायर', 'सिलसिला है प्यार का', 'आमदानी अठ्ठनी खर्चा रुपैया' अशा चित्रपटांमध्ये उत्तम काम केलं.
दरम्यान, चंद्रचूड सिंहच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर त्याने अवंतिका कुमारी यांच्याशी विवाह केला होता. या दाम्पत्याला २००७ मध्ये श्रानजाई सिंग हा मुलगा झाला. मात्र, नंतर दुर्दैवाने चंद्रचूड व अवंतिका यांनी वेगळं राहण्यास सुरुवात केली.पत्नीने साथ सोडल्यानंतर अभिनेता एकट्याने मुलाचा सांभाळ करतो आहे.