अक्षय कुमार अन् वीर पहारियाची भन्नाट जुगलबंदी; 'स्काय फोर्स'मधील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:26 IST2025-01-18T11:22:41+5:302025-01-18T11:26:29+5:30
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'स्काय फोर्स'मुळे चर्चेत आला आहे.

अक्षय कुमार अन् वीर पहारियाची भन्नाट जुगलबंदी; 'स्काय फोर्स'मधील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Sky Force Movie New Song:बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'स्काय फोर्स'मुळे चर्चेत आला आहे. नवीन वर्षात अभिनेता 'स्काय फोर्स' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'स्काय फोर्स'मध्ये अक्षय कुमारसह वीर पहारिया, सारा अली खान आणि निम्रत कौर यांसारखे तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. येत्या २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान, नुकतंच या चित्रपटातील नवीन गाणं रिलीज करण्यात आलं आहे.
'स्काय फोर्स' मधील 'रंग' हे गाणं प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरलं आहे. या गाण्यामध्ये अक्षय कुमार आणि वीर पहारिया यांच्या नृत्याची जुगलबंदी पाहून सिनेरसिक त्यांचं कौतुक करत आहेत. तर सारा अली खान आणि वीर पहारियाची केमिस्ट्री सुद्धा लक्ष वेधून घेत आहे. शिवाय गाण्यातील निम्रत कौरचा हटके अंदाज अनेकांना भावला आहे.
'स्त्री', 'मुंज्या' या सिनेमांचं हॉरर युनिव्हर्स तयार करणाऱ्या दिनेश विजन आणि मॅडॉक फिल्मसने सिनेमाची निर्मिती केलीय. 'स्काय फोर्स' सिनेमा १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धादरम्यान पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यावर आधारित आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक रोमांचकारी कथा बघायला मिळणार यात शंका नाही. या सिनेमात अक्षय कुमार एअर फोर्स अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.