...तर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसला असता विकी कौशल, म्हणाला- "मी तयारीही केली होती, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 16:54 IST2025-02-21T16:53:44+5:302025-02-21T16:54:42+5:30
विकी कौशलला औरंगजेबाच्या भूमिकेची ऑफर मिळाली होती. अभिनेत्याने ही भूमिका साकारण्यासाठी संपूर्ण तयारीही केली होती. मात्र त्याला ही भूमिका साकारता आली नाही.

...तर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसला असता विकी कौशल, म्हणाला- "मी तयारीही केली होती, पण..."
विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. या सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अक्षय खन्ना 'छावा' सिनेमात औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. 'छावा' सिनेमातील विकी कौशलच्या अभिनयाचं तर कौतुक होतच आहे. पण, त्यासोबतच अक्षय खन्नाच्या भूमिकेलाही पसंती मिळत आहे. पण, तुम्हाला माहितीये का विकी कौशलही औरंगजेबाच्या भूमिकेत दिसला असता.
विकी कौशलला औरंगजेबाच्या भूमिकेची ऑफर मिळाली होती. अभिनेत्याने ही भूमिका साकारण्यासाठी संपूर्ण तयारीही केली होती. मात्र त्याला ही भूमिका साकारता आली नाही. विकी कौशल औरंगजेबाच्या भूमिकेत तर दिसला असता पण तो 'छावा' सिनेमात नाही. त्याला करण जोहरच्या एका सिनेमासाठी औरंगजेबाच्या भूमिकेची ऑफर मिळाली होती. या सिनेमाचं नाव 'तख्त' असं होतं. या सिनेमात मुघल साम्राज्य आणि त्याच्या गादीसाठी झालेल्या लढाया याचा इतिहास दाखविण्यात येणार होता.
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमात विकी कौशल औरंगजेब साकारणार होता. "ही भूमिका साकारण्यासाठी मी उत्सुक आहे. तख्त प्रोजेक्ट सुरू होण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. या भूमिकेसाठी मला खूप काही द्यावं लागणार आहे. या पात्राला जज न करणं हे खूप मोठं आव्हान आहे. शरीरयष्टी काम करावं लागेल. भाषेवर काम करावं लागणार आहे. त्या पात्राला जज न करता ते आहे तसं पडद्यावर उतरवणं आणि सारखं स्वत:ला समजावणं की हेच बरोबर आहे यासाठी कस लागणार आहे. मला या पात्राचे अनेक पैलू दाखवायचे आहेत", असं विकी म्हणाला होता.
पण, करण जोहरचा हा प्रोजेक्ट कधी सुरूच झाला नाही. त्यामुळे औरंगजेबाच्या भूमिकेत विकी कौशल दिसला नाही. या प्रोजेक्टमध्ये रणवीर सिंग, आलिया भट, करीना कपूर, भूमी पेडणेकर, अनिल कपूर, जान्हवी कपूर अशी स्टारकास्ट होती.