अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती अन् नाना पाटेकरांसोबतही जोडलं गेलं नाव; आयेशा जुल्का म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:09 IST2025-04-02T16:08:29+5:302025-04-02T16:09:22+5:30
इतक्या वर्षांनी आयेशा झुल्काने लिंकअप्सच्या सर्व चर्चांवर खुलासे केले आहेत

अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती अन् नाना पाटेकरांसोबतही जोडलं गेलं नाव; आयेशा जुल्का म्हणाली...
'पहला नशा' गाणं ऐकलं की अभिनेत्री आयेशा झुल्का (Ayesha Jhulka) डोळ्यासमोर येते. आमिर खान आणि आयेशा झुल्काचं हे रोमँटिक गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. ९० च्या दशकात अभिनेत्री आयेशा झुल्का आघाडीवर होती. तेव्हा तिचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं. मिथून चक्रवर्ती, अक्षय कुमार, अरमान कोहली ते नाना पाटेकर या अभिनेत्यांसोबत तिच्या अफेअरची चर्चा झाली. आता नुकतंच अभिनेत्रीने इतक्या वर्षांनी सर्व चर्चांवर स्पष्टीकरण दिलं.
विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत आयेशा म्हणाली, "जर तुम्ही त्यावेळेसचे मॅगझीन पाहिले तर माझं नाव सर्वांसोबत जोडलं गेल्याचं तुम्हाला दिसेल. पण खरंतर माझी सर्वांसोबत मैत्री होती. आम्ही मजामस्ती करायचो. आता तुम्ही ६-७ सिनेमे करता, दर तिसऱ्या दिवशी सेटवर भेटता तेव्हा ओळखी होणारंच. तसंच त्या वयात हे सगळं नवीन होतं. आजही माझे गर्लफ्रेंड्सपेक्षा जास्त बॉयफ्रेंड्स आहेत. पण म्हणून माझं त्यांच्यासोबत रोमँटिक नातंच असेल हे हे गरजेचं नाही."
अक्षय कुमारसोबतच्या लिंकअपच्या चर्चांवर ती म्हणाली, "मला वाटतं आकर्षित होणं हे नॉर्मल आहे. तुम्ही जर शारिरीक आकर्षणाबद्दल म्हणत असाल तर ती गोष्ट वेगळी आहे. ते आकर्षण समजावून सांगता येत नाही. मी आणि अक्षय एकमेकांना कायम आवडायचो. पण आमच्यात शारिरीक आकर्षण होतं हे चूक आहे."
माझ्यामुळे नाना आणि मनिषाचं ब्रेकअप झालं नाही
आयेशा म्हणाली, 'ती अगदीच बेकार चर्चा होती. मी नानांसोबत एक फोटोशूट केलं होतं. नंतर आम्ही एका नाटकातही काम केलं. माझ्या वयाच्या अभिनेत्यांसोबत नाव जोडलं जाणं ठीक होतं पण नानांच्या वयाचा तरी आदर करायला हवा होता. मी नाना आणि मनिषाच्या ब्रेकअपचं कारण तर अजिबातच नव्हते."
ती पुढे म्हणाली, "मिथुन चक्रवर्तींसारख्या इतक्या सीनिअर अभिनेत्यासोबत नाव जोडलं जाणं हे फारच लज्जास्पद होतं. ते तर मला नेहमीच मुलीसारखं वागवायचे. अरमान कोहलीबद्दल सांगायचं तर मी तो चॅप्टर कायमचा संपवला आहे."