टीएमसीवर टीका करताना भाजप नेत्याकडून अनुपम खेर यांच्या टकलाचा उल्लेख; अभिनेत्यानं दिलं मजेशीर उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 14:42 IST2026-05-06T14:38:54+5:302026-05-06T14:42:29+5:30
भाजप नेते सामिक भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका करताना अनुपम खेर यांच्या टकलाचा उल्लेख केला. ज्यावर आता खुद्द अनुपम खेर यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

टीएमसीवर टीका करताना भाजप नेत्याकडून अनुपम खेर यांच्या टकलाचा उल्लेख; अभिनेत्यानं दिलं मजेशीर उत्तर
Anupam Kher : पश्चिम बंगालमध्ये भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. राज्यात पहिल्यांदाच भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे. ९ मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. भाजपाने प्रचंड बहुमत मिळवत २०७ जागांवर विजय नोंदवला आहे, तर टीएमसी केवळ ८० जागांवर आहे. ममता बॅनर्जी यांना स्वतःची जागाही वाचवता आली नाही. भवानीपूरमध्ये त्यांचा मोठा पराभव झाला असून सुवेंदु अधिकारी यांनी त्यांचा १५,११४ मतांनी पराभव केला. बंगालच्या निवडणूक निकालांनंतर एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा रंगली आहे. ती म्हणजे अनुपम खेर यांच्या नसलेल्या 'केसां'ची. भाजप नेते सामिक भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका करताना अनुपम खेर यांच्या टकलाचा उल्लेख केला. ज्यावर आता खुद्द अनुपम खेर यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
सामिक भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार नाही, असा दावा करताना अनुपम खेर यांच्या केसांचा उल्लेख केला. ते म्हणाले, "आकाश पृथ्वीवर कोसळू शकतं, समुद्र आकाशात उसळू शकतो, अनुपम खेर यांच्या डोक्यावर पुन्हा केस उगवू शकतात… पण तृणमूल काँग्रेस सत्तेत येईल, हे अशक्य आहे". त्याच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनुपम खेर यांनीही त्यावर प्रतिक्रिया देत तो शेअर केला.
अनुपम खेर यांनी विनोदी अंदाजात लिहिलं, "अरे भावा, मी तुमचं काय बिघडवलंय? तुम्हाला माझ्या डोक्यावर केस उगवावेत असं का वाटतंय? मी शंभर जन्मांतही प्रार्थना करणार नाही. जय श्री राम!". अनुपम खेर यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, अनुपम खेर हे सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. ते शेवटचे 'तन्वी द ग्रेट'मध्ये दिसले होते. लवकरच ते 'खोसला का घोसला २' या चित्रपटांत झळकणार आहेत.
अरे भैया जी! मैंने आपका क्या बिगाड़ा है! क्यों आप चाहते हो कि मेरे सिर पर बाल आ जायें! मौजूदा हालात में जन्मों तक नहीं चाहूँगा! जय श्री राम! 🤪🤪🤣🤣🤣😂😂😂😂😂 pic.twitter.com/SoTQEYUGxy
— Anupam Kher (@AnupamPKher) May 5, 2026