Video: अल्लू अर्जुन लवकरच घेणार श्रेयस तळपदेची भेट; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 17:39 IST2022-01-20T17:38:54+5:302022-01-20T17:39:39+5:30
Allu arjun: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा पुष्पा (Pushpa: The Rise) हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि संपूर्ण देशात त्याने धुमाकूळ घातला.

Video: अल्लू अर्जुन लवकरच घेणार श्रेयस तळपदेची भेट; कारण...
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (allu arjun) याचा पुष्पा (Pushpa: The Rise) हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि संपूर्ण देशात त्याने धुमाकूळ घातला. तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि हिंदी अशा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली. बॉक्स ऑफिसवर यशस्वीपणे घोडदौड करणाऱ्या या चित्रपटाच्या यशामध्ये अल्लू अर्जुनसोबतच एका मराठमोळ्या अभिनेत्याचाही वाटा आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून श्रेयस तळपदे (shreyas talpade)आहे. पुष्पाच्या हिंदी व्हर्जनला श्रेयसने त्याचा आवाज दिला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी श्रेयसवरही कौतुकाचा वर्षाव होत असतांना त्याला अल्लू अर्जुनने त्याच्या कामाची खरी पोचपावती दिली आहे.
सध्या सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने श्रेयसचे आभार मानले असून लवकरच तुला भेटेन असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
"श्रेयस, या चित्रपटासाठी तू जो छान आवाज दिलास त्यासाठी मनापासून तुझे आभार. लवकरच भेटुयात आपण. आज ऑन कॅमेरा मला तुझे आभार मानायचे आहेत. 'पुष्पा'साठी तुम्ही घेतलेल्या मेहनतीसाठी खूप आभार", असं अल्लू अर्जुन म्हणाला.
दरम्यान, हा व्हिडीओ श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत अल्लू अर्जुन आणि मनीष शाहचे आभार मानले आहेत. ''पुष्पासाठी माझ्या आवाजाची निवड केली यासाठी खूप धन्यवाद", असं त्याने म्हटलं आहे. या चित्रपटात अल्लु अर्जुनने पुष्पाराज ही भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना हिने श्रीवल्ली ही भूमिका वठवली आहे.