अक्षय कुमारची सहा वर्षांनी 'या' अभिनेत्रीसोबत जमली जोडी; दोघांचा रिल व्हिडीओ व्हायरल, कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:41 IST2026-01-30T13:39:01+5:302026-01-30T13:41:52+5:30
अक्षय कुमार सहा वर्षांनी त्याच्या फेव्हरेट अभिनेत्रीसोबत दिसला. त्यामुळे अक्षयच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाला. कोण आहे ती?

अक्षय कुमारची सहा वर्षांनी 'या' अभिनेत्रीसोबत जमली जोडी; दोघांचा रिल व्हिडीओ व्हायरल, कोण आहे ती?
अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अक्षय कुमारने आजवर विविध अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. अक्षयचे आवडते दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा आज वाढदिवस. यानिमित्त लाडक्या दिग्दर्शकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अक्षयसोबत एक खास अभिनेत्री दिसली. सहा वर्षांनी अक्षय आणि या अभिनेत्रीला एकत्र पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. ही हिरोईन दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे 'मंजुलिका' अर्थात विद्या बालन.
आज प्रियदर्शन आपला वाढदिवस साजरा करत असून, या खास दिवशी अक्षय कुमारने हा क्षण आणखी संस्मरणीय केला आहे. अक्षयने एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत प्रियदर्शन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये 'भूल भुलैया' मधील त्याची सहकलाकार विद्या बालनही दिसत आहे. हा व्हिडिओ अक्षयपासून सुरू होतो, जो दिग्दर्शकाला त्यांच्या ६९व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यानंतर विद्या बालन तिच्या आयकॉनिक 'मंजुलिका' अंदाजात एंट्री घेते आणि प्रियदर्शन यांना शुभेच्छा देतानाच त्यांच्या आगामी 'भूत बंगला' चित्रपटासाठीही शुभेच्छा व्यक्त करते. हा व्हिडिओ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले, “मी ओळखत असलेल्या सर्वोत्कृष्ट माणसांपैकी एकाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. प्रियान सर, तुमचं येणारं वर्ष आनंदाने भरलेलं असो. वाढदिवसाच्या भूत-भूत शुभेच्छा...”
प्रियदर्शन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या दिग्दर्शकांपैकी एक असून त्यांच्या चित्रपटांनी प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटली तरीही प्रेक्षकांच्या मनात आजही खास स्थान टिकवून ठेवले आहे. दमदार कथा आणि भरपूर मनोरंजनासाठी ओळखले जाणारे प्रियदर्शन सध्या त्यांच्या आगामी चित्रपट ‘भूत बंगला’मुळे चर्चेत आहेत. हा हॉरर-कॉमेडी चित्रपट यंदाच्या मोठ्या आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल १४ वर्षांनंतर प्रियदर्शन आणि अक्षय कुमार ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र येत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांची जोडी भारतीय सिनेमातील सर्वात आयकॉनिक दिग्दर्शक-अभिनेता जोड्यांपैकी एक मानली जाते. 'हेरा फेरी', 'भूल भुलैया', 'भागम भाग' यांसारख्या अनेक कल्ट चित्रपटांद्वारे या दोघांनी प्रेक्षकांना अविस्मरणीय मनोरंजन दिले आहे. आजही हे चित्रपट प्रेक्षकांमध्ये तितकेच लोकप्रिय आहेत. त्यामुळे 'भूत बंगला' मधील त्यांची ही पुनर्भेट चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढवत आहे. या चित्रपटातून त्यांच्या वर्षानुवर्षांच्या घट्ट नात्याचीही झलक पाहायला मिळणार आहे.