"खूप घाबरलेलो...; अहान शेट्टीने सांगितला 'बॉर्डर २' च्या सेटवरील अनुभव, असं काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:24 IST2025-12-17T13:13:28+5:302025-12-17T13:24:41+5:30
'बॉर्डर २' च्या सेटवर घाबरलेला अहान शेट्टी, म्हणाला...

"खूप घाबरलेलो...; अहान शेट्टीने सांगितला 'बॉर्डर २' च्या सेटवरील अनुभव, असं काय घडलेलं?
Ahan Shetty: देशभक्तीपर सिनेमा म्हटलं तर पहिल्यांदा आठवतो तो बॉर्डर चित्रपट. १९७१ च्या भारत-चीन युद्धावर आधारित हा सिनेमा आजही तितकाच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. आता जवळपास २८ वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. जबरदस्त संवाद,दमदार स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाबद्दल सगळ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.या चित्रपटात सुनील शेट्टीचा मुलगा अहानची सुद्धा प्रमुख भूमिका आहे.याचनिमित्ताने माध्यमांसोबत संवाद साधताना अहान शेट्टीने त्याचा चित्रपटातील अनुभव शेअर केला.
'बॉर्डर २'मध्ये सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. नुकताच या चित्रपटाचं टीझर रिलीज करण्यात आला. यावेळी संपूर्ण चित्रपटाची स्टारकास्ट हजर होती. त्यादरम्यान, अहान शेट्टीने वडील सुनील शेट्टीने त्याला चित्रपट साईन करण्यापूर्वी काय सल्ला दिला होता. याविषयी देखील सांगितलं. अहान म्हणाला, "मी सुरुवातीलाच चित्रपटाच्या सेटवर खूप घाबरलो होतो.एवढ्या मोठ्या चित्रपटाचा आपण भाग आहोत या विचारानेच माझे हात थरथरत होते. कारण,मी चार वर्षांपूर्वी 'तडप' सिनेमात काम केलं. त्यानंतर मी कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम केलं नाही. याची भीती होती."
वडिलांनी दिलेला सल्ला आला कामी...
या मुलाखतीत अहानने सांगितलं की, चित्रपटातील आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहण्याचा सल्ला त्याच्या वडिलांनी त्याला दिला होता. त्याविषयी तो म्हणाला,"
बाबांनी सांगितलं होतं,फक्त आपल्या कामाशी प्रामाणिक रहा. जसे आहात तसेच रहा. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या.इतर लोक काय म्हणतात याचा जास्त विचार करायचा नाही. "
अहान शेट्टी पुढे म्हणाला-"अशा भूमिका साकारताना एक विशिष्ट प्रकारचं प्रेशर असतंच. आणि ते कायम राहणार आहे. पण म्हणतात ना, बाप म्हणजे बापच असतो.त्यांनी 'बॉर्डर' चित्रपटात जे काही काम केलं होतं, त्यापैकी दहा टक्के जरी मी करू शकलो, तरी मला वाटेल की मी आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला."
दरम्यान, 'बॉर्डर २' हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंह यांनी केले आहे. येत्या २३ जानेवारी २०२६ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.