"ते सेटवर थकलेले असायचे, पण..."; 'इक्कीस'च्या दिग्दर्शकाने धर्मेंद्र यांच्याविषयी केला भावुक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 16:41 IST2025-11-26T16:32:31+5:302025-11-26T16:41:57+5:30
धर्मेंद्र हे शेवटच्या सिनेमाचं शूटिंग करताना त्यांची अवस्था कशी होती, ते सेटवर कसे असायचे, याविषयी सिनेमाच्या दिग्दर्शकांनी खास खुलासा केला आहे

"ते सेटवर थकलेले असायचे, पण..."; 'इक्कीस'च्या दिग्दर्शकाने धर्मेंद्र यांच्याविषयी केला भावुक खुलासा
दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी नुकतंच दिवंगत दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्यासोबत काम करण्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ८९ व्या वर्षी धर्मेंद्र यांचे निधन झाले, त्यानंतर राघवन यांनी त्यांच्या आगामी 'इक्कीस' (ikkis) चित्रपटाच्या सेटवरील एक खास अनुभव सांगितला. 'इक्कीस' हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, तो धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला आहे.
श्रीराम राघवन आणि धर्मेंद्र यांनी यापूर्वी २००७ मध्ये आलेल्या 'जॉनी गद्दार' या हिट चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर आता युद्धपट असलेल्या 'इक्कीस'मध्येही धर्मेंद्र यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
'कॅमेरा ऑन होताच जादू व्हायची'
राघवन यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, धर्मेंद्र हे सेटवर कधीकधी थकलेले असायचे, पण 'इक्कीस'च्या सेटवर त्यांनी धर्मेंद्र यांच्या व्यक्तिमत्वाची जादू अनुभवली. राघवन म्हणाले की,"धर्मेंद्र जी सेटवर थोडे थकलेले यायचे, पण जसा कॅमेरा ऑन व्हायचा, तसं त्यांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू समोर यायची. त्यांच्यात ऊर्जा संचारली जायची. जणू काही जादूच व्हायची," असं राघवन यांनी नमूद केले. 'जॉनी गद्दार' आणि 'इक्कीस' या दोन्ही चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान त्यांना हा अनुभव आला होता.
'इक्कीस'मधील भूमिका खास
'इक्कीस' चित्रपटात धर्मेंद्र यांची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचे राघवन यांनी सांगितले. ते म्हणाले, "त्यांची भूमिका 'इक्कीस' चित्रपटाचा आत्मा आहे. ते खूप चांगले दिसले आहेत. हा चित्रपट त्यांच्यासाठी एक उत्तम कलात्मक श्रद्धांजली ठरेल, अशी मला आशा आहे."
या आठवणीत राघवन यांनी 'जॉनी गद्दार'च्या स्क्रिप्ट रीडिंगचा किस्साही सांगितला. २००७ मध्ये जेव्हा राघवन धर्मेंद्र यांना भेटायला गेले, तेव्हा ते खूप घाबरले होते. यावर धर्मेंद्र यांनी त्यांना स्मितहास्य करत "घाबरलेले असणे चांगले आहे, कारण त्यामुळे तुम्ही अधिक सतर्क राहता," असा सल्ला दिला होता.
'जॉनी गद्दार'मधील "शुरुआत मजबूरी से होती है, धीरे-धीरे मजबूरी जरूरत बन जाती है, फिर जरूरत आदत बन जाती है" हा गाजलेला संवाद देखील धर्मेंद्र यांनीच सुचवला होता, अशी आठवण राघवन यांनी सांगितली. 'जॉनी गद्दार'नंतर धर्मेंद्र नेहमी राघवन यांना 'बाळा, माझ्यासाठी एखादी भूमिका लिहिलीस का?' असे विचारायचे. जेव्हा 'इक्कीस'ची कथा तयार झाली, तेव्हा राघवन यांना खात्री होती की ही भूमिका धर्मेंद्र यांच्यासाठीच योग्य आहे.