13 वर्षांचा अक्षत बनला स्वयंउद्योजक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 17:06 IST
शाळकरी मुलाच्या या कर्तृत्वाने प्रभावित होऊन ‘ओराही डॉट कॉम’ या कंपनीने अक्षतची वेबसाईट खरेदी केली आहे
13 वर्षांचा अक्षत बनला स्वयंउद्योजक
आजची पिढी ही देशाचे भविष्य असते. असे असेल तर आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल आहे असेच म्हणावे लागेल. दिल्लीचा अक्षत मित्तल त्याचे सार्थ उदाहरण आहे. नववीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय अक्षतने ’आॅडईव्हन डॉट कॉम’ नावाने एक वेबसाईट सुरू केली होती.जानेवारी महिन्यात दिल्लीमध्ये प्रदुषणाला आळा घालण्यासाठी एक दिवसाआड सम-विषम क्रमांकाच्या गाड्या चालविण्याचा प्रयोग करण्यात आला होता. या धर्तीवर अक्षतने ही वेबसाईट बनविली होती.सम-विषम नियमामुळे ज्या लोकांना स्वत:ची कार नेता येत नसेल त्यांना राईड शोधण्यासाठी या वेबसाईटचा वापर केला जात असे. अक्षतच्या या अभिनव प्रकल्पाला दिल्लीकरांनी उत्तम प्रतिसादही दिला.शाळकरी मुलाच्या या कर्तृत्वाने प्रभावित होऊन ‘ओराही डॉट कॉम’ या कंपनीने अक्षतची वेबसाईट खरेदी केली आहे. या डीलनुसार तो कंपनीच्या तांत्रिक सल्लागार बोर्डाचा सदस्य म्हणूनही काम करणार आहे.‘ओराही’चे सीईओ अरुण भारती यांनी सांगितले की, ‘अक्षतच्या वेबसाईटचे नाव चटकन लक्षात राहण्यासारखे आहे. या वयात त्याने दाखविलेली चुणूक खूप प्रशंसणीय आहे.’दिल्लीच्या ‘अमिटी इंटरनॅशनल स्कूल’चा विद्यार्थी असलेल्या अक्षतने सांगितले की, ‘वेबसाईटचा अल्गोरिदम मी स्वत: बनविला होता. आता एक वर्षासाठी ‘ओराही’ कंपनी मला विशेष प्रशिक्षणही देणार असल्यामुळे मला खूप काही शिकायला मिळणार आहे.’ आॅड-ईव्हन डॉट कॉमला भेट देणारे यूजर्स यापुढे आपोआप ओराही वेबसाईटकडे वळविण्यात येतील.