संसद असो की राज्यांची विधिमंडळे, तेथील गोंधळ, आरडाओरड, आरोप-प्रत्यारोप आणि क्वचितप्रसंगी होणाऱ्या मारामाऱ्या यामुळे अनेक तथाकथित उच्चभ्रूंचा लोकशाहीतील या मोलाच्या संस्थांकडे बघण्याचा दृष्टीकोन अत्यंत हिणकस आणि तुच्छतेचा असतो. तो प्रत्येक वेळी अगदी चुकीचाच असतो असेही नाही. पण जेव्हां केव्हां देशात एखादी अत्यंत अनुचित घटना घडते व तिची काही विशिष्ट परिसर वगळता देशभरात फारशी दखलही घेतली जात नाही, तेव्हां म्हणजे अशा समर प्रसंगांमध्ये लोकशाहीतील या संस्थांचे महत्व अधोरेखित होत असते. अन्यथा आठवडाभरापूर्वीच घडून गेलेल्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्रातील एका अमानुष आणि गलिच्छ प्रकाराची माध्यमांसकट साऱ्यांनी फारशी दखल घेतली नसताना जेव्हां संसदेत हे प्रकरण उपस्थित झाले तेव्हां मात्र पंतप्रधानांसकट साऱ्या राष्ट्रीय नेत्यांना या प्रकरणाची दखल घेणे भाग पडले. गेल्या अकरा तारखेला सौराष्ट्राच्या गिर-सोमनाथ जिल्ह्यातील उना येथे चार दलित युवकांनी म्हणे एक गाय मारली आणि तिचे कातडे सोलताना कुणा गोरक्षकांनी हे कथित अधम कृत्य पाहिले व संबंधित दलित युवकाना एका ओळीत उभे करुन त्यांच्या पाठीमागून त्यांना लाठ्या-काठ्या आणि लोखंडी कांबेने बेदम चोपून काढले. त्यांना एका मोटारीलाही म्हणे बांधून ठेवले होते. या पराक्रमाची चित्रफीतही तयार केली गेली आणि समाज माध्यमांवर ती टाकली. हा ‘पुरुषार्थ’ म्हणे प्रमोद गिरी गोस्वामी नावाच्या शिवसैेनिकाने केला. ज्याअर्थी त्याने आपणहून चित्रफीत काढून तिचा प्रसार केला त्याअर्थी त्याच्या नजरेत तो पुरुषार्थ तर होताच पण त्यामागे कदाचित गोरक्षणाचे महान पुण्यदेखील होते! मुळात संबंधित दलित युवकांनी ती गाय मारलीच नव्हती. मेलेली गाय आणून तिचे कातडे ते काढून घेत होते. वास्ताविक पाहात मेलेल्या जनावराचे कातडे काढण्यासारखे काम आजही देशातील काही युवकाना करावे लागत असेल तर त्यापरती लाजीरवाणी बाब अन्य कुठलीही असू शकत नाही. पण तसे असताना ते युवक जे सांगत होते त्याकडे गोरक्षकांनी साफ दुर्लक्ष केले. संबंधित घटनेची चित्रफीत सर्वदूर प्रदर्शित झाली आणि संपूर्ण गुजरात राज्यातील दलितांमध्ये तीव्र संतापाची आणि उद्वेगाची लाट उसळली. पण हा संताप व्यक्त करण्यासाठी काही दलितांनी मार्ग पत्करला तो चक्क आत्महत्त्येचा. त्या राज्याच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी रिवाजाप्रमाणे चौकशीचे आदेश आणि शांतता पाळण्याचे आवाहन वगैरे केले. पण बुधवारी हा विषय काँग्रेस आणि अन्य काही विरोधी सदस्यांनी संसदेत उपस्थित केला तेव्हां कुठे पंतप्रधानांना त्याची दखल घ्यावी लागली व मग कुठे त्यांनी खेद व्यक्त केला. आता काही राष्ट्रीय नेते गुजरातच्या दौऱ्यावर जातील व पाठोपाठ केन्द्र सरकारही हालचाल करेल. परंतु हे सारे घडून येऊ शकले ते हा विषय संसदेसमोर मांडला गेला तेव्हांच. याच गुजरात राज्यात हार्दिक पटेल नावाच्या युवकाच्या नेतृत्वाखाली मध्यंतरी आरक्षणासाठी पाटीदारांचे मोठे आंदोलन छेडले गेले होते व त्याला हिंसक वळणही लागले होते. नंतर हार्दिकला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली डांबून ठेवले आणि नुकतीच त्याची मुक्तता झाली. याचा अर्थ लवकरच त्याच्या आंदोलनाचा पुढचा अध्याय सुरु होईल आणि तो अहिंसात्मक असेलच असे नाही. तथापि परपीडेपेक्षा आत्मपीडेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या राज्यात आणि तेही थेट सौराष्ट्रातील दलितांमध्ये या शिकवणीचे अनुसरण दिसावे पण इतरांमध्ये ते दिसू नये हे विलक्षणच मानावे लागेल. त्याच महात्म्याने ज्या दलिताना वैष्णवजन म्हटले त्या वैष्णवांची झालेली हीन आणि दीन अवस्था पाहू जाता हेच का ते बापू गांधींचे राज्य असा प्रश्न इतरांना तर पडेलच पण कदाचित हेच का आपले राज्य असा प्रश्न खुद्द बापूंनाही पडू शकेल. अनेक कर्मठ हिंदूंना तेहतीस कोटी देवाना आपल्या उदरात सामावून घेणारी गाय हा एक अत्यंत पवित्र प्राणी वाटतो तर हिंदूंचेच दैवत असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना तो केवळ एक उपयुक्त पशु वाटतो. पण अलीकडच्या काळात आणि विशेषत: देशात आणि राज्यात हिन्दुत्वनिष्ठांचे राज्य आल्यापासून गाय हा प्राणी पवित्र तर नाही आणि उपयुक्त तर नाहीच नाही, पण एक अत्यंत उपसर्ग पोहोचविणारा, समाजात तेढ उत्पन्न करणारा आणि संघर्ष आमंत्रित करणारा प्राणी वाटू लागला आहे. हा प्राणी जिवंतपणी तर दंगली आमंत्रित करुच शकतो पण मेल्यानंतरदेखील ते काम करु शकतो हेच उना येथील घटनेने दाखवून दिले आहे. संसदेने जसे या उना प्रकरणाला त्याच्या तार्किक शेवटापर्यंत नेण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले तसेच महाराष्ट्र विधिमंडळाने अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी प्रकरण धसास लावून सरकारला जागे केले. या प्रकरणातील आरोपींना थेट फासावर लटकविण्याची मागणी करु असे जोरदार प्रतिपादनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. पण तसे खरोखरी व्हायचे असेल तर त्याआधी नीट तपास करुन पुरावे गोळा करावे लागतात हे त्यांना ज्ञात असेलच.
हेच का बापू गांधींचे राज्य?
By admin | Updated: July 21, 2016 04:07 IST