शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

भारतीय नववर्ष कधी उजाडणार?

By admin | Updated: December 3, 2015 03:26 IST

भारताचे नवे वर्ष १ जानेवारीला नव्हे, तर २२ मार्चला सुरू होते. परंतु, या घटनात्मक राष्ट्रीय दिनदर्शिकेची सर्वत्र उपेक्षा सुरू आहे. कॅलेंडरचा मुद्दा कुणालाच अस्मितेचा वाटत नाही.

- विजय बाविस्कर

भारताचे नवे वर्ष १ जानेवारीला नव्हे, तर २२ मार्चला सुरू होते. परंतु, या घटनात्मक राष्ट्रीय दिनदर्शिकेची सर्वत्र उपेक्षा सुरू आहे. कॅलेंडरचा मुद्दा कुणालाच अस्मितेचा वाटत नाही.

स्वातंत्र्यानंतर आपली काही बोधचिन्हे बनली. कमळाला राष्ट्रीय फुलाचा दर्जा दिला गेला, मोर राष्ट्रीय पक्षी मानला जाऊ लागला, तशीच आपली एक राष्ट्रीय दिनदर्शिकाही स्वीकारली गेली. परंतु या दिनदर्शिकेबाबत आज फारसे कुणालाही काहीच सांगता येत नाही. आपला जन्म-मृत्यू, नवे वर्ष, जुने वर्षे हे सगळे काही इंग्रजी (गे्रगोरियन) कॅलेंडरच्या हवाली झाले आहे. भाषा व प्रांतवादाच्या लढाया लढल्या गेल्या; पण आपल्या देशाचे म्हणून जे खास कॅलेंडर तयार केले गेले, त्याचा वापर करा म्हणून राजकीय लढाई कधी लढली गेली नाही. कल्याणनिवासी हेमंत वासुदेव मोने हे एकांड्या शिलेदाराप्रमाणे या भारतीय दिनदर्शिकेसाठी लढा देत आहेत. ‘सौर कॅलेंडर’ म्हणजे ‘राष्ट्रीय दिनदर्शिका’च वापरली जावी, यासाठी त्यांनी सातत्याने जनजागरण केले. या कार्याबद्दल त्यांना या आठवड्यात पुण्यात ‘इंदिरा अत्रे पुरस्कारा’ने गौरविले गेले. निवृत्त शिक्षक असलेले मोने आकाशमित्र व खगोलशास्त्राचे अभ्यासक आहेत. राष्ट्रीय कॅलेंडरचा प्रसार करण्याबरोबरच त्यांनी खगोलशास्त्राच्या प्रचारासाठी अनेक व्याख्याने दिली, पुस्तके लिहिली. ‘नभांगणपत्रिका’ हे नियतकालिक संपादित करून ते त्यांनी शाळांमधून मोफत वाटले, इतके त्यांना या विषयाने झपाटून टाकले आहे. खरे तर आपली राष्ट्रीय दिनदर्शिका ही घटनात्मक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे १९५२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंचांग सुधारणा समिती (राष्ट्रीय कॅलेंडर समिती) या नावाने एक समिती नेमली होती. भौतिकशास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ साहा हे या समितीचे अध्यक्ष होते. या समितीने तयार केलेले राष्ट्रीय कॅलेंडर २२ मार्च १९५७ या दिवशी लोकसभेने स्वीकारले. भारताने स्वीकारलेली ही कालगणनासुद्धा सूर्यावर आधारित असली, तरी ती अधिक शास्त्रीय आहे. कारण, ती सूर्याची पृथ्वीच्या संदर्भातील स्थिती पाहून निश्चित करण्यात आली आहे. सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो त्या दिवशी जगात सर्वत्र १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र असते. म्हणून भारतीय कॅलेंडरप्रमाणे या दिवशी नवीन वर्ष सुरू होते. हा दिवस म्हणजे चैत्र १. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे ही तारीख २२ मार्चला येते. ‘लीप’ वर्षात हा दिवस २१ मार्चला येतो. आपण इंग्रजी नवे वर्ष १ जानेवारीला, तर मराठी नववर्ष गुढी पाडव्याला साजरे करतो; पण त्या दोघांच्या मध्ये जे भारतीय वर्ष सुरू होते, त्याची दखल कुणीच घेत नाही. भारतीय दिनदर्शिकेतील महिन्यांची नावे ही ‘चैत्र, वैशाख, ज्येष्ठ...’ अशीच आहेत. फक्त मार्गशीर्षऐवजी ‘अग्रहायण’ म्हटले जाते. या दिनदर्शिकेचा वापर करण्याबाबत इंडियन बँक असोसिएशनने तपशीलवार पत्रक काढले आहे. मोने स्वत: सर्व बँकांच्या धनादेशावर राष्ट्रीय कालगणनेतील तारखाच टाकतात. कुणी हरकत घेतली, तर सरळ रिझर्व्ह बँकेचा आदेश दाखवितात. शाळांच्या जन्मदाखल्यावरही भारतीय कालगणनेची तारीख नोंदविता येईल, अशी तरतूद आहे. परंतु आपल्याकडे अद्याप या तारखा वापरण्याचे धाडस दाखविले जात नाही. केंद्र वा राज्य सरकारांचा कारभार कधीही भारतीय कॅलेंडरनुसार चालत नाही. त्यामुळे घटनात्मक कॅलेंडरचे काय, हा मोठा प्रश्न आहे. सध्या तरी मोने यांच्यासारखी काही निवडक माणसे हा लढा देत आहेत. चीनची दिनदर्शिकाही चंद्र-सूर्याच्या गतीवर आधारित आहे. चिनी नववर्ष ‘चांद्रमासिक’ नववर्ष म्हणून ओळखले जाते. चीनचे आगामी वर्ष ८ फेब्रुवारीला सुरू होईल. नववर्षाच्या स्वागताचा उत्सव चीनमध्ये तब्बल १५ दिवस रंगतो. त्यांनी त्यांची अस्मिता जपली. आपण मात्र ‘थर्टी फस्ट’मध्येच मश्गुल आहोत. भारतात २२ मार्च कधी उजाडेल, याची राष्ट्रप्रेमी भारतीयांना प्रतीक्षा आहे. - विजय बाविस्कर