शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

घट्ट झाकणं काढावीत, बंद दरवाजे उघडावेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 05:45 IST

पोट भरलं, तरी हवा भरून आणखी फुगवण्याचा सोस संपत नाही. संपत्ती, कीर्तीची भूक वाढतेच आहे. अशाने आनंद कसा मिळणार?

- आरती अंकलीकर-टिकेकर, प्रख्यात शास्त्रीय गायिका‘न्यू नॉर्मल’ काळातल्या जगण्याच्या विलंबित ख्यालाचा तुमच्यावर काय परिणाम झाला? स्वत:ला बंदिस्त करण्याचा असा अनुभव याआधी नव्हताच. आम्ही स्वत: सुरक्षित असलो तरी भवतालच्या माणसांच्या वेदना, दु:ख, मृत्यू यांची प्रचंड भीती वाटायची. मात्र हळूहळू  रोजच्या कामांत स्वावलंबनाची सवय लागली. रियाझ, संगीत शिकवणं पूर्वपदावर आलं. मनाचा निर्धार पक्का झाला, संपूर्ण जगावर आलेली ही नैसर्गिक आपत्ती आहे, आपण स्वत:ला शिस्त लावत यशस्वीपणानं बाहेर येऊ शकतो. तितकंच आपल्या हातात आहे, हे उमजलं! रागसंगीत सादरीकरणासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म सोयीचा वाटला का?रागसंगीताच्या सादरीकरणातला जिवंतपणा समोर बसलेल्या दर्दी श्रोत्यांशिवाय साधता येत नाही. ती एक देवाणघेवाण असते. ती एकतर्फी कशी होणार? मी एखाद्या रागाच्या सफरीवर निघते तेव्हा स्वैरपणे मुक्त संचार करीत असते व मला दिसलेली सौंदर्यस्थळं, मिळालेले अनुभव, अनुभूती माझ्या श्रोत्यांबरोबर वाटून घेत असते.  श्रोत्यांनाही ते दिसतं व दाद मिळते तेव्हा आनंदाचं वर्तूळ पूर्ण होतं. प्रेक्षागृहात श्रोत्यांनी जीवाचे कान करून तो अनुभव घेतलेला असतो. ऑनलाइनमध्ये असं शंभर टक्के अवधान नसल्यामुळे अनुभव पातळ होऊन जातो. माझ्यावर दोन-तीन पिढ्यांची जबाबदारी आहे असं मी मानते. पुढचा श्रोता तयार करणं अथवा त्यांना वाईट सवयी लावणं दोन्ही माझ्या हातात आहे. त्यामुळे असा अनुभव घ्यायचा नाही व द्यायचाही नाही हे मी ठरवलं आहे.

नियमबद्ध जीवन अत्यंत महत्त्वाचं असं तुम्ही मानता, ते कोरोनाने उधळून लावलं...आयुष्य हे सतत बदलणारं असतं, त्यामुळं त्यात काहीच बदल होऊ नयेत असं मला वाटत नाही.  अपरिहार्य असेल तर मी त्याचं स्वागत करून स्वत:त बदल घडवायला नेहमीच तयार असते. नियमही काळानुरूप नवं रूप घेऊ शकतात. त्यामुळं लवचीकपणा ठेवत बदल सकारात्मक स्वीकारले नाहीत तर नुसताच त्रागा होतो. जगाच्या लयीबरोबर चालणं सुखावह वाटतं मला. परफॉर्मर म्हणून आम्हाला ठिकठिकाणी जाऊन कार्यक्रम करावे लागतात, कधी स्थिती हवी तशी असते, कधी नसते.  एकदा कोलकात्यातील दुर्गापूर या ठिकाणी रात्रभर चालणाऱ्या संगीत सोहळ्यात मला गायचं होतं. तिथं पोहोचल्यावर विचारलं, तानपुरा कुठाय? त्यांनी बोट दाखवलं ते सगळे पुरुषांच्या स्वराचे तानपुरे होते. तो काळ इलेक्ट्रॉनिक तंबोरे ताबडतोब उपलब्ध होण्याचा नव्हता. मी त्यांना म्हटलं, तानपुऱ्याशिवाय मी गाऊ शकत नाही. माझी गाण्याची वेळ झरझर पुढे येत होती, मी रंगमंचावर जाऊन बसले. तितक्यात प्रेक्षागृहाच्या दोन्ही दारांमधून चार-चार तानपुरे येताना दिसले. त्यातले दोन जुळवून मी कार्यक्रम सुरू केला. दुर्गापूरला पोहोचण्याआधी प्रवासात मानसिकता अशी होती की सगळं सुरात लावेन, रागसंगीताच्या विश्‍वात विहार करेन. तिथं जाण्याआधी मनानं पोहोचून मी समाधी लावली होती. हे चित्रं भंगलंच होतं ना! असं असतानाही रागाच्या सादरीकरणाच्या मानसिकतेतून पूर्णतेकडे प्रवास करणं ही सकारात्मकता बाळगायलाच लागते. अशा अनुभवांमुळं ‘लाइव्ह’ कार्यक्रम करणाऱ्यांना बदल व आव्हानं स्वीकारणं जास्त सोपं जातं असं मला वाटतं.
समाजचित्र बदलतंय, दबाव वाढताहेत..?तुम्ही कुठल्याही दबावाला बळी पडता; कारण तुम्हाला कशाचीतरी लालूच असते. जी माणसं लौकिक अर्थानं स्थिरस्थावर आहेत त्यांनी भौतिकतेच्या मर्यादा ओलांडायला हव्यात. ज्यांची हातातोंडाशी गाठ आहे, जगण्याचा झगडा मोठा आहे त्यांना आपण काही सांगावं हा आपला अधिकार नाही. त्यांचा अपवाद वगळता इतर सगळ्या पातळ्यांवर पोट भरलं की हवा भरून ते आणखी मोठं करायचं आणि पुन्हा भरायला घ्यायचं असं चाललं आहे. संपत्ती, कीर्ती यांची भूक वाढतेच आहे. अतृप्तीचा हा प्रवास संपतच नाही. कोविडकाळामुळे आर्थिक पातळीवर देशासमोर खूप आव्हानात्मक परिस्थिती आहे. अशावेळी समाजातल्या स्थिर घटकांनी आपल्या कुवतीप्रमाणे १० कुटुंबांचा आधार बनावं. सगळं सरकार करू शकत नाही. तक्रारी करीत राहण्यापेक्षा स्वत:च्या परिघात जरी सक्रिय मदत करीत राहिलो तरी चित्र वेगळं असेल.गुरू-शिष्य परंपरेबद्दल आणि घराण्यांच्या सीमा वितळण्याबद्दल काय सांगाल?माझे पंचाऐंशी वर्षांचे वडील जीन्स, टीशर्ट, कॅप, नायकीचे शूज घालायला लागले. आईला म्हटलं कधी की संध्याकाळी काय खाऊया, तर ती ‘पिझ्झा’ असं उत्तर देते. आपल्या सगळ्यांच्याच जीवनशैलीत काळानुरूप प्रचंड बदल होत गेला आहे. जग किती जवळ आलं आहे! तो बदल संगीताच्या क्षेत्रात होणार नाही असं कसं होईल? पूर्वी गुरूजी आपल्या शिष्याला शेजारच्या गल्लीत वेगळ्या घराण्याचं संगीत शिक्षण घेणाऱ्याजवळ फिरकू द्यायचे नाहीत. त्याचं गाणं कानावर दुरूनही पडता कामा नये, असं सगळं घट्ट व बंद असायचं. आपापल्या घराण्याचं संगीत लोक गायचे. आज घट्ट झाकणं उघडली आहेत, दरवाजेही बंद नाहीत! या बदललेल्या जगात  वेगवेगळ्या घराण्यांचं संगीत सहज ऐकायला उपलब्ध असताना त्याचा परिणाम होऊ न देणं मुश्कील आहे. आज माझं यमन होणं हे कालच्यापेक्षा वेगळं आहे असं म्हणता, ते कसं सांगाल?शास्त्रीय संगीत ते अत्यंत सखोल आहे. आपल्या संपूर्ण मेंदूतील अनेक केंद्रे रागसंगीतामुळे कामाला लागतात. माझ्या कंठातून आलेला स्वर श्रोता म्हणून आधी मला मोहिनी घालत असतो व माझ्या आतल्या कठीण श्रोत्याला प्रसन्नता लाभली तर माझ्यासमोरचा श्रोता समाधान पावतो. यासाठी मनोवस्था सर्वोत्तम असणं जरुरीचं. तर संवाद जुळतो. सर्वोत्तम विचार निवडण्याचा मेंदूतला प्रोग्राम गडबडला की सुमार विचार निवडून मांडला जातो. विचार निवडीवर तुमचं नियंत्रण राहावं यासाठी मन:स्थितीवर काबू हवा. मनोवस्थेवर विजय मिळवला की एकाग्रता येते. ती विविध कारणांमुळे एकसारखी नसते त्यामुळेच कालचा यमन आजच्या यमनपेक्षा निराळा होतो. तो अधिक प्रगल्भ असावा असाच प्रयत्न असतो.मुलाखत : सोनाली नवांगुळ