गजानन जानभोर -
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत वावटळ निर्माण केल्यानंतर ‘एमआयएम’ (आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन) हा राजकीय पक्ष विदर्भात आपली पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या दृष्टीने या पक्षाचे नेते, खासदार असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नागपुरात होण्याचे घाटत आहे.काँग्रेसपासून दुरावलेला मुस्लीम समाज आज आधाराच्या शोधात आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर चेकाळलेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या लव्ह जिहाद, घरवापसी अशा उपद्रवांनी या समाजाच्या मनात भीतीचे वातावरण आहे. ओवेसी याच गोष्टींचा गैरफायदा घेत आहेत. प्रवीण तोगडिया, योगी आदित्यनाथ हे हिंदुत्ववादी नेते जेवढी गरळ ओकतील तेवढे ओवेसींचे फावणारे आहे. भांबावलेल्या मुस्लीम मतदारांनी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची पाठ सोडली. विदर्भात काँग्रेसला सक्षम मुस्लीम नेतृत्व तयार करता आले नाही. विदर्भातील मुस्लीम काँग्रेस नेते केवळ निवडणुकीच्या प्रचारातच (आणि तेही फक्त स्टेजवरच) दिसतात. एरवी समाजात त्यांच्याबद्दल विश्वास उरलेला नाही. काँग्रेसने ज्या मुस्लीम नेत्यांना बळ दिले त्यांनी समाजापेक्षा स्वत:च्याच हिताचा अधिक विचार केला, हे वास्तव आहे. भंडाऱ्यात बशीर पटेल, नागपुरात अनिस अहमद, एस. क्यू. जामा, अकोल्यात अजहर हुसैन, नातिकोद्दीन खतिब ही नावे पुरेशी आहेत. यातील किती नेत्यांनी तळागाळातील मुस्लीम कार्यकर्त्यांना पुढे येऊ दिले? बायको-मुलांपलीकडे त्यांनी समाजाचा कधी विचार केला नाही. आज मुस्लीम तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही आपल्या समाजाला प्रगतीचा मार्ग सापडलेला नाही, ही या तरुणांच्या मनातील खदखद आहे. काँग्रेस असो की समाजवादी पक्ष या राजकीय पक्षांनी केवळ मतांसाठी आपल्याला वापरून घेतले, हा त्यांच्या मनातील संताप आहे. ओवेसी या संतापाला सराईतपणे कुरवाळतात. काँग्रेस-समाजवादी पक्षातील मुस्लीम नेते आपल्या बांधवांच्या हातात केवळ कुराण ठेवायचे. ओवेसी मात्र एका हातात कुराण तर दुसऱ्या हातात कॉम्प्युटर ठेवू पाहतात. मुस्लीम आरक्षणाबद्दल ते आक्रमक आणि आग्रही भूमिका घेतात. नेमक्या याच गोष्टी मुसलमानांना आज आश्वासक वाटतात. हिंदुत्ववाद्यांची आक्रमकता आणि पुरोगामी पक्षांची दुर्बलता हे ओवेसींचे बलस्थान आहे. आज ओवेसी मुसलमानांच्या प्रगतीबद्दल पोटतिडकीने बोलत असल्याचा आव आणत असले तरी त्यांचा छुपा अजेंडा मात्र वेगळा आहे. ओवेसी आणि तोगडिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांनाही विखार हवा आहे. तेच त्यांच्या धर्मकारणाचे आणि राजकारणाचे सूत्र आहे. परंतु बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर होरपळणारा देश बघून या देशातील सर्वसामान्य हिंदू जसा सावध झाला आणि हिंदुत्ववाद्यांना अव्हेरू लागला तेच परिवर्तन अलीकडच्या काळात मुस्लीम समाजात पाहायला मिळत आहे. दहशतवादाच्या नावावर होत असलेल्या समाजाच्या बदनामीला मुस्लीम तरुण विटला आहे. पेशावरच्या शाळेत मारली गेलेली १५० चिमुकली आपल्याच धर्माची होती आणि मारणाऱ्या सैतानांना धर्माच्या शिकवणीचा विसर पडला होता हे वास्तवही त्याला कळून चुकले आहे. त्यामुळे आता तो ओवेसीसारख्यांच्या जाळ्यात फसणार नाही. विध्वंसक वृत्तीचे ओवेसी आज मुसलमानांच्या हातात कुराणासोबतच कॉम्प्युटर ठेवू पाहतात तेव्हा या समाजाच्या बदलत्या विधायक मानसिकतेतून निर्माण झालेल्या दबावाचा तो परिपाक आहे, ही बाबही आपण समजून घेतली पाहिजे. ओवेसी आणि तोगडियांचा मार्ग विध्वंसाचा आहे. त्यांचा जेवढा प्रभाव वाढेल तेवढा हा देश दुभंगेल. त्यामुळे ओवेसींच्या गुंगी आणणाऱ्या भाषणांच्या प्रभावापासून समाजबांधवांना रोखण्याचे आव्हान आता मुस्लीम तरुणांनाच स्वीकारावे लागणार आहे. या देशात काँग्रेस पक्ष कमकुवत झाला असतानाच्या काळात पुरोगामी राजकीय पक्षांसमोरील हे मोठे आव्हान आहे.