शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

व्यासंगी व्रतस्थ!

By admin | Updated: January 20, 2016 02:55 IST

वर्तमानपत्राच्या संपादकाचे आसन म्हणजे निव्वळ सत्ताकेंद्र नसून ‘वृत्तपत्र’ नावाच्या लोकमाध्यमाबाबत समाजपुरुषाच्या मनात वसणाऱ्या विश्वासार्हतेची ती ठेव असते,

वर्तमानपत्राच्या संपादकाचे आसन म्हणजे निव्वळ सत्ताकेंद्र नसून ‘वृत्तपत्र’ नावाच्या लोकमाध्यमाबाबत समाजपुरुषाच्या मनात वसणाऱ्या विश्वासार्हतेची ती ठेव असते, याचे उचित भान मनीमानसी अष्टौप्रहर जागते राखणारे संपादक सदासर्वत्र दुर्मीळच असतात. डॉ. अरुण टिकेकर यांची गणना अशा मूठभरांमध्येच होत राहिली. ही जाणीव संजीवन असल्यामुळेच असेल कदाचित परंतु, हाताशी असलेले वृत्तपत्र हत्यारासारखे वापरण्याच्या सवंग मोहापासून टिकेकर आयुष्यभर अलिप्तच राहिले. संपादकपदाचा ज्वर मस्तकात कधीही न जाऊ देण्याच्या दक्षतेपायीच त्यांचे पाय सदैव जमिनीवर राहिले आणि त्यामुळेच संपादकपदावरील व्यक्तीच्या स्वातंत्र्याला व्यवहारात पडणाऱ्या मर्यादांचे अतिशय नेमके भान टिकेकर यांच्यापाशी उदंड होते. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेचा गौरव कोणी, कितीही केला तरी अखेर वृत्तपत्र हेही एक ‘प्रॉडक्ट’ आहे, हे डॉ. टिकेकर यांना फार अचूकपणे उमगले होते. केवळ इतकेच नाही तर, जनसामान्यांच्या पसंती-नापसंतीच्या काट्यावर प्रत्यही तोलल्या जाणाऱ्या या उत्पादनाकडून सगळ्यांच संबंधित घटकांच्या असणाऱ्या अपेक्षा सतत बदलत राहणार आणि अशा बदलत्या अपेक्षांच्या दबावाखाली प्रत्येकच संपादकाला सतत काम करावे लागणार आहे, हे प्रगल्भपणे हेरण्यात टिकेकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील व्यवहारतज्ज्ञ संपादकाचे व्यावसायिक यश सामावलेले होते. त्यामुळे संपादकाच्या स्वातंत्र्याला वृत्तपत्राचे मालक, जाहिरातदार आणि वाचक यांच्या अपेक्षांच्या सापटीतच काय तो अवकाश असणार हे टिकेकर उत्तमपैकी उमगून होते. परंतु, संपादकाला उपलब्ध होणाऱ्या या अवशिष्ट स्वातंत्र्याची चौकट चांगल्यापैकी लवचिक असून, संपादकाने वृत्तपत्राच्या व्यवस्थेत कार्यरत राहूनच ती चौकट आतून ढकलत तिचा पैस सतत विस्तारता ठेवायचा असतो, हे व्यवसायसूत्र टिकेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत विलक्षण प्रभावीपणे अनुसरले. टिकेकरांच्या पत्रकारितेमागील पे्ररणा आगरकरांच्या पंथांशी जवळीक साधणारी असली तरी, त्यांच्या भाषिक अभिव्यक्तीची जातकुळी मात्र न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या घराण्याशी मिळतीजुळती होती. ‘जोर भाषेत नव्हे तर विचारात असावा’, हे न्यायमूर्ती रानडे यांचे वाक्य टिकेकर यांनी जणू जीवनसूत्रासारखेच जपले. त्यामुळे समाजव्यवहारांतील अनिष्ट घटनांप्रवृत्तींवर भाष्य करतानाही, शब्दाचे आसूड ओढत संबंधितांना रक्तबंबाळ करण्याऐवजी अंतर्मुख होऊन विचारप्रवण बनवण्यावरच टिकेकर यांच्या विवेचक प्रतिपादनाचा भर राहत असे. टीका अथवा विरोध हा व्यक्तीला नव्हे तर प्रवृत्तीला करायचा असतो, ही टिकेकर यांची दृढ धारणा होती. प्रचलित वृत्ती-प्रवृत्ती या पूर्वापार चालत आलेल्या रूढी व परंपरांद्वारे समाजमनात रुजलेल्या असल्याने त्यातील कालबाह्य अंश हा प्रबोधनाद्वारेच काढणे शक्य आहे, ही खुणगाठ मनाशी पक्की बांधलेली असल्यामुळेच समाजाला क्रांतिप्रवण करण्यापेक्षाही उत्क्रांतीप्रवण करण्यावर टिकेकर यांच्या लेखन-चिंतन-मननाचा भर राहिला. मुळात टिकेकर हे इतिहासाचे विद्यार्थी आणि अभ्यासक. १९वे शतक आणि १९व्या शतकातील मुंबई इलाखा हे त्यांच्या खास आवडीचे आणि म्हणूनच व्यासंगाचे विषय. परंतु, इतिहासात रमत डोळ्यांवर भूतकाळाची पट्टी मात्र टिकेकर यांनी बांधून घेतली नाही. वर्तमानाकडे बघण्याची इतिहासदृष्टी इतिहासाच्या डोळस परिशीलनाद्वारे विकसित करणे, हा टिकेकर यांच्या इतिहासाभ्यासाचा अमोल पैलू ठरतो. प्रचलित वर्तमानातील अंगभूत गतिमानता जोखण्याची क्षमता टिकेकर यांच्या ठायी निर्माण झाली ती त्या इतिहासदृष्टीपायीच. बातम्यांची संख्या, वैविध्य आणि बातमी पोहोचविण्याचा वेग याबाबतीत दृकश्राव्य माध्यमांची बरोबरी करणे छापील वृत्तपत्रांना कधीच शक्य होणार नसल्याने, वृत्तपत्रांनी आता विविध प्रकारच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक विषयांवरील संशोधनपूर्ण व विश्लेषक मजकूर बातम्यांच्या जोडीनेच वाचकांना सादर करण्यावर भर द्यावयास हवा, ही भूमिका टिकेकर अलीकडच्याकाळात प्रकर्षाने मांडत राहिले. वृत्तपत्र हा कुटुंबाचा घटक असल्याने कुटुंबातील प्रत्येकाला त्याच्या त्याच्या अभिरूचीप्रमाणे काही ना काही वाचायला मिळावे, ही दृष्टी ठेवून विविधांगी पुरवण्यांची निर्मिती, अनेकविध रोचक विषयांवरील स्तंभलेखनास प्रोत्साहन यांसारखे उपक्रम त्यांनी हिकमतीने राबवले. समाजमनामध्ये वैचारिकतेची संस्कृती रुजावी, या उत्कट प्रेरणेने पत्रकारितेचे व्रत जीवनभर निष्ठेने निभावणाऱ्या डॉ. टिकेकर यांचा ‘लोकमत’ परिवाराशीही ‘समूह संपादक’ या नात्याने काहीकाळ अनुबंध जुळून आला. विश्वासार्हता, उदारमतवाद, जबाबदार स्वातंत्र्य, वैचारिक खुलेपणा यांसारख्या, प्रगल्भ व लोकाभिमुख पत्रकारितेची मूलद्रव्य समजल्या जाणाऱ्या मूल्यांचा आग्रह अखेरपर्यंत धरणाऱ्या या ज्येष्ठ आणि व्यासंगी संपादकाला ‘लोकमत’ परिवारातर्फे विनम्र आदरांजली.