गडचिरोली जिल्ह्यातील महादेव आत्राम हा आदिवासी वैदू वनौषधींवर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेत आपल्या रुग्णसेवेबद्दल सांगत होता, तेव्हा जगभरातील २० देशांतील संशोधक थक्क होऊन त्याला ऐकत होते़ हे सर्व संशोधक जगविख्यात आणि वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक ज्ञान अवगत केलेले तज्ज्ञ. ज्यांची आपण गावंढळ, अडाणी म्हणून हेटाळणी करतो, ज्यांच्या निरपेक्ष सेवेला उपेक्षित ठेवतो त्या ग्रामीण भागातील वैदूंच्या वैद्यकीय ज्ञानाची उशिरा का होईना जगाला गरज वाटावी हा पिढ्यान्पिढ्या उपेक्षित ठेवलेल्या सर्वच घटकांचा विजय आहे.नागपुरात अलीकडेच ही आंतरराष्ट्रीय परिषद झाली़ नागपूर विद्यापीठाच्या औषधीशास्त्र विभागाने ती आयोजित केली होती़ खरं तर अशा परिषदांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तज्ज्ञ मार्गदर्शन करीत असतात़ इथे मात्र या तज्ज्ञांसोबत गडचिरोली, मेळघाटातील वैदूदेखील होते. त्यांच्या ज्ञानाची आता जगानेही दखल घेतल्याचा हा पुरावा आहे़ एरवी शहरी माणसे ज्यांच्याकडे थट्टेने पाहतात तेच वैदू आज आदिवासी आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत़ गडचिरोली, मेळघाटातील आदिवासी जेव्हा आजारी पडतो तेव्हा किती एमबीबीएस डॉक्टर त्याच्या मदतीला तत्परतेने धावून जातात? निसर्गाकडून आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग करून हे वैदू रुग्णांवर उपचार करतात़ या वैदूंना सरकारकडून मदत नाही, प्रोत्साहन नाही आणि कौतुकाची थापही कधी मिळत नाही़ त्यांच्याकडे जाणारा वर्ग आता केवळ ग्रामीण राहिलेला नाही़ शहरातील डॉक्टरांनी हात टेकल्यानंतर हतबल झालेला उच्च मध्यमवर्गीय रुग्णसुद्धा शेवटचा पर्याय म्हणून वैदूंकडे जातो़ त्यांची फी किती? तर तुम्ही द्याल तेवढी! तीही दिली नाही तरी ते तुम्हाला अडवत नाहीतवा वेठीसही धरत नाहीत. उलट बाहेरगावाहून आलेल्या रुग्णाला दोन घास खाऊन जाण्याचा आग्रह करतात. यालाच खरी ‘रुग्णसेवा’ म्हणतात आणि शहरात जे दिसते त्याला ‘धंदा’ म्हणतात. शहरात त्यांच्या नावाच्या पाट्या दिसत नाहीत. हृदयरोग तज्ज्ञ, मधुमेह तज्ज्ञ, किडनी तज्ज्ञ अशी जाहिरातबाजीही ते करीत नाहीत. पण रुग्णाला आजारातून बरे करण्याचा ते निष्ठेने प्रयत्न करतात़ एखाद्या वृद्ध सामाजिक कार्यकर्त्याचे डोळे दुखतात म्हणून त्याला मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा सल्ला ते देत नाहीत़ किंवा साध्या तापाची तक्रार घेऊन आलेल्या रुग्णाला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये अॅडमिटही करून घेत नाहीत़ जंगलात सापडणारी फळे, वनस्पती हेच त्यांचे औषध. निसर्गाकडून काही घेत असताना त्यालाही आपण काही दिले पाहिजे, त्याचे संरक्षण करायला हवे, हे मूल्य जपण्यासाठी त्यांना एमबीबीएसची पुस्तकं वाचण्याची गरज पडत नाही़ या उपेक्षित वैदूंच्या दुर्लक्षित ज्ञानाला जगाची कवाडे उघडून देणे ही खरंच अभिनंदनीय बाब आहे़ वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी संशोधने सुरू आहेत व त्याच वेळी गंभीर आजारांचे आव्हानही उभे आहे़ अशा परिस्थितीत या वैदूंचे ज्ञान गरजेचे वाटत असेल तर त्यातून सर्वसामान्य रुग्णांचे भलेच होणार आहे. काही गंभीर आजारांची उत्तरे आधुनिक विज्ञानात मिळणार की नाही, अशी शंका निर्माण झाली असताना आपल्या प्राचीन वैद्यकीय ज्ञानात त्यांचा शोध घेण्याचा हा आश्वासक प्रयत्नदेखील आहे़ असे जर झाले तर आज निसर्गाचा दुष्टावा करणारा माणूस त्याचा मित्र होईल आणि तोच त्याच्या संगोपनासाठी पुढाकार घेईल. रुग्णाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्याला लुटण्याचे सध्या सुरू असलेले घाणेरडे प्रकार थांबतील, शिवाय अल्पदरात उपचार उपलब्ध होण्यास मदत होईल.वैद्यकीय शास्त्रात रोज नवी संशोधने होत आहेत. पंचेवीस वर्षांपूर्वी असाध्य असलेल्या अनेक रोगांचे कोडे आज उलगडले आहे. तरीही समाज चिंतामुक्त झाल्याचे दिसत नाही. आजारांबद्दलच्या एका अनामिक भयाखाली आपण वावरत असतो. आपल्याला ते सतत जाणवत राहावे, असेच या क्षेत्रातील काही डॉक्टरांना वाटते. यावर महत्त्वाचा उपाय म्हणजे, ‘रुग्ण साक्षरता’. ती निर्माण करण्यासाठी ग्रामीण भागातील वैदूंची मोलाची मदत होऊ शकेल. नागपुरातील परिषदेच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. साऱ्या समाजाने त्याचे स्वागतच करायला हवे.- गजानन जानभोर
वैदूंची दखल
By admin | Updated: March 2, 2015 23:37 IST