शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

(वि)संगीत भाऊबंदकीचा नवा खेळ!

By admin | Updated: October 30, 2015 21:26 IST

‘आपण दोघे भाऊभाऊ, गोळ्यामेळ्याने खाऊ खाऊ आणि झिंज्या उपटत परस्परांशी झोंबतही राहू’, असा एक नवाकोरा खेळ सध्या महाराष्ट्रभर धुमधडाक्यात सुरु आहे

‘आपण दोघे भाऊभाऊ, गोळ्यामेळ्याने खाऊ खाऊ आणि झिंज्या उपटत परस्परांशी झोंबतही राहू’, असा एक नवाकोरा खेळ सध्या महाराष्ट्रभर धुमधडाक्यात सुरु आहे. कोण थोरला आणि कोण धाकला, हा याच खेळातील एक उपखेळ. खेळाच्याच दरम्यान मग तद्दन फालतू सिनेमातील एक तितकाच फालतू डायलॉगदेखील बोलला जातो, ‘बरसों आपने हमारी दोस्ती देखी, अब वाघोबाके पंजे का ओरखडा भी देखो’. महाराष्ट्रदेशीच्या करमणोत्सुक जनतेची मन:पूत करमणूक या खेळातून होते आहे. दीर्घकाळ यातील कोणीतरी म्हणे एक मोठा भाऊ होता. अचानक तो म्हणे धाकला झाला. वाद तिथेच सुरु झाला. जन्मतारखांची शोधाशोध सुरु झाली. मधेच कोणीतरी बोलला, ‘भाऊ बिऊ कुछ नही, रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप होते है’! पण ही मांडणी कुणी फारशी मनावर घेतलेली दिसत नाही. त्यामुळे भाऊ-भाऊचा खेळ अव्याहत सुरु. त्यातील थोरला-धाकला या वादात कशाला पडा? त्यांचे ते काय ठरवायचे ते ठरवतील. पण सहोदरांमध्ये म्हणजे भावाभावांमध्ये कदाचित त्यांचा डीएनए सारखा असल्याने काही गुण नक्कीच समान असतात. ते इथे दिसतात, तेव्हां हे भाऊच. यातील तूर्तास मोठ्या भावाचाही आणखी मोठा भाऊ दिल्लीवरती राज्य करतो आहे. त्याचीही तिथे वेगळी भाचरं आहेतच. ही भाचरं मनाला येईल ते बोलत असतात. लहान मूल एकेक अक्षर बोलू लागलं की त्याला तोंड आलं असं आया मावशा कवतिकानं म्हणतात. तसंच या भाचरांनाही बहुधा तोंड आलंय. आपण कोण आहोत, आपण काय बोलतो, त्याचे काय परिणाम संभवतात या कशा कशाचा ताळतंत्र नाही. मधूनच मोठा भाऊ ‘चूप’ असं म्हणतो, पुन्हा कोशात जातो आणि भाचरांची तोंडं पुन्हा येतात. जे या मोठ्या भावाचं, तेच सध्याच्या धाकल्या भावाचं. शिवाजी पार्कात विचारांच्या (?) सोन्याची लुटालूट करताना या धाकल्यातल्या थोरल्यानी स्पष्ट बजावलं होतं की, जे काही बोलायचं ते आम्ही बोलू, इतरांनी फालतूची वटवट करायची नाय! अगदी कोण्या भाईचं नाव घेऊन ही दटावणी केली गेली. पण पार्कातल्या लुटालुटीच्या आवाजाचे डेसीबल्स मोजून होण्याच्या आतच धाकल्यातल्या थोरल्याच्या दटावणीचे तीन तेरा. आपण कोण, आपला अधिकार काय, कोणाला उद्देशून बोलतो, याचा काही धरबंद नाही. पण तरीदेखील थोरल्यातला थोरला आणि धाकल्यातलाही थोरला यांनी ऐकून न ऐकल्यासारखं. म्हणजे दोन्ही थोरल्यांचं दटावण म्हणजे मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखंही करु नकोस. भाऊबंदकी म्हटलं की ते चालायचंच म्हणतात. पण भाऊबंदकी म्हटलं की खरं तर द्विपात्री प्रयोग. पण या अत्याधुनिक भाऊबंदकीत एक तिसरं पात्रदेखील आहे. हे तिसरं पात्र बराच काळ तूर्तासच्या धाकल्या आणि तूर्तासच्याच थोरल्याच्या वळचणीला राहून आलेलं. पण दोघं तसे डांबीस. त्यांनी या तिसऱ्याला इस्टेटीचा वाटा तर सोडाच पण त्याच्या हातावर साधे साखरफुटाणेदेखील ठेवले नसावेत. त्यामुळे त्याची टिवटीवही जास्त, आकांडतांडवही अधिक आणि आदळआपटही मनसोक्त. हा तिसरा एकाचवेळी दोन्ही भावांना शाब्दिक बुकलून काढत असतो. त्याला फक्त इतकंच जमतं म्हणतात! दोघंही कसे बोगस, भ्रष्ट आणि कुचकामी आहेत व आपणच कसे लै भारी आहोत असे हा सांगत फिरत असतो. मध्यंतरी त्याच्याही हाती नाशिक महापालिका नावाचं एक घबाड लागलं. अगदीच काही नाही असं नाही. तिथं त्याला काहीही करता आलं नाही. पण हे सांगावं कसं आणि सांगितलं तर कोण मग दारात उभं करील? तेव्हां परवा या तिसऱ्यानी मोठी धमाल उडवून दिली. तुम्ही लोकाना फसवू शकता, पण स्वत:च स्वत:ला नाही असं म्हणत असले तरी या बहाद्दरानं जाहीरपणे स्वत:च स्वत:ला फसवलं. नाशकात यंव केलं आणि त्यंव केलं. चक्क वास्तुरचनाकारांनी रेखाटलेली संकल्पचित्रच लोकांसमोर आपल्या कर्तृत्वखुणा म्हणून पेश केली. तीदेखील कोणापुढे, तर कल्याण-डोंबीवलीकरांच्या पुढ्यात. या परिसराला महाराष्ट्राची प्रयोगशाळा म्हणून किमान वृत्तपत्रसृष्टीत तरी वेगळी मान्यता आहे. जे अस्सल तेच इथं टिकल आणि नक्कल ते अव्हेरलं जाईल असं म्हणतात. त्यांच्या पुढ्यातच ठोकाठोकी. पूर्वीचा काळ असता तर बात वेगळी होती. हल्ली मेडीसन स्क्वेअरात पंतप्रधानाला उचकी आली तरी ती त्याक्षणी सोनुशीकोनुशीच्या ग्रामस्थाला कळतं. पुन्हा ठोकाठोकी करताना रतन टाटा अमुक म्हणाले, मुकेश अंबानी (तसा मी त्याला मुक्याच म्हणतो व तो मला राज्या!) भारावून गेला इत्यादि इत्यादि. आचार्य अत्र्यांच्या ‘तो मी नव्हेच’मधल्या राधेश्याम महाराजांच्या ‘अरे काय पार्था, काय म्हणते उमरावतीची खबर’ या वाक्यावर डोलणारा समाज आज राहिलेला नाही. तुम्ही एक बोला, तो लगेच स्मार्ट फोनमध्ये गुगल सर्चमध्ये डोकं घालतो. पण ते काहीही असलं तरी अत्र्यांनाही जो प्लॉट लिहिता आला नसता तो प्लॉट कोणीही न लिहिता आज महाराष्ट्रासमोर रात्रंदिवस उलगडला जातो आहे. खऱ्या आणि खोट्या भावांमधली भाऊबंदकी नवनवे प्रवेश सादर करते आहे. तूर्तास लोक तिचा आनंद घेत स्वत:ची करमणूकही करुन घेत आहेत. परंतु अति झालं आणि हसू आलं व हसण्यानंतर रडू आलं हा काळ काही दूर नाही.