केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून बेरोजगारांसाठी नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अनेकदा आत्तापर्यंत दिले गेले आहे. पण ते पूर्ण किती प्रमाणात होते, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. बेरोजगाराची समस्या किती भीषण बनत चाललीये, हे एसटी महामंडळातील भरतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. एसटी महामंडळाकडून सुमारे १४ हजार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी जाहिरात काढून अर्ज मागविण्यात आले. बेरोजगारांचा तांडा त्यानंतर एसटीकडे वळला. या भरतीसाठी प्रचंड प्रतिसाद देत तब्बल चार लाख ९७ हजार अर्ज एसटी महामंडळात दाखल झाले. एसटीच्या आतापर्यंतच्या भरतीप्रक्रियेला मिळालेला हा सर्वाधिक प्रतिसाद आहे. पण हा प्रतिसाद दुसरीकडे मन सुन्न करणाराही आहे. एसटी महामंडळात गेल्या पाच वर्षांत दोन वेळा छोट्या स्वरूपाच्या भरतीप्रक्रिया पार पडल्या. या भरतीत अर्ज करणाऱ्यांची संख्याही प्रचंड होती. अर्ज करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने बीए, बीकॉम, एमए अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसह बारावी पास उमेदवारांचेही अर्ज होते. यंदाही भरतीतदेखील उच्च शैक्षणिक गुणवत्ता असलेले अर्जदार असल्याचेही सांगण्यात आले. मुळात एसटीकडून भरण्यात येत असलेली पदे चालक कम वाहक, लिपिक, वाहतूक निरीक्षक, लेखाकार, अंगरक्षक, भांडार पर्यवेक्षक अशी आहेत. त्यामुळे ही पदे आणि त्यासाठी अर्ज करणारे पाहिल्यास शासन बेरोजगारांसाठी खरोखर काही करते का? असा प्रश्न निर्माण होतो. यंदाच्या भरतीतही १४ हजार पदे असल्याने उर्वरित सुमारे चार लाख ८० हजार बेरोजगारांना दुसरीकडे नोकरी शोधण्याची वेळ येणार आहे. सध्या एसटीच्या कोकण विभागातील चालकांना मात्र या भरतीमुळे थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोकणात एसटीला स्थानिकांकडून चालक भरतीला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कोकणात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील चालकांना पाठविण्याशिवाय एसटी प्रशासनासमोर पर्याय नव्हता. कोकणात चालक भरती होत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून राज्यातील अन्य भागांमधील चालकांना कोकणात सेवा द्यावी लागत होती. पण आता भरती होणार असल्याने त्यांना पुन्हा आपल्या मूळ विभागांमध्ये जाण्याची संधी निर्माण होणार आहे.
बेरोजगार एसटीकडे
By admin | Updated: February 15, 2017 23:45 IST