- डॉ. बाळ फोंडके(लेखक ज्येष्ठ विज्ञानलेखक आहेत.)
बुलेटिन आॅफ अॅटॉमिक सायन्टिस्ट्सचं कामही समांतर चालूच होतं. या नियतकालिकातर्फे डूम्स डे क्लॉक ही योजना राबवली जाते. दरवर्र्षी ३१ डिसेंबरला त्या वेळची महासंहारक अस्त्रांच्या बाबतीतल्या जागतिक परिस्थितीचं चिकित्सक अवलोकन करून जग विनाशापासून किती दूर आहे हे या घड्याळातली वेळ दर्शवते. १९५३ साली यातली वेळ रात्री ११ वाजून ५८ मिनिटं म्हणजे मध्यरात्रीला केवळ दोन मिनिटं असल्याची वेळ दाखवत होती.हिरोशिमा आणि नागासाकी इथल्या नरसंहाराच्या आठवणी भीषण आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. त्यांचे भीषण परिणाम ज्यांनी भोगले त्या जपानी नागरिकांनीही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे त्या तिथल्या राखेतून पुनर्भरारी घेतली आहे. आता त्या संहाराची आठवण मनात ठेवायची ती परत तसा अमानुष हल्ला कोणी करू नये यासाठीच. पण त्याचवेळी त्याच घटनेतून उभ्या राहिलेल्या पगवॉश आणि बुलेटिनशी आपली नाळ जोडून घेणं तितकंच, किंबहुना त्याहीपेक्षा, अधिक मोलाचं ठरावं. १६ जुलै १९४५. अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्यातल्या अॅलॅमोगॉर्डोजवळच्या वाळवंटात पहाटेच्या अंधारात दोघे जण कसली तरी प्रतीक्षा करत होते. पुढच्याच क्षणी कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाबरोबरच क्षितिजाजवळ महाभयानक स्फोट झाला. त्यातून उसळलेल्या आगडोंबाकडे पाहता पाहता जे रॉबर्ट ओप्पेनहायमरच्या तोंडून उत्स्फूर्तपणे गीतेतला श्लोक बाहेर पडला. ‘दिवि सूर्यसहस्त्रस्य भवेत्युगपद्युत्थिता यदि भा सदृशी स्यात सा भासस्तस्य महात्मन:, कालोस्मि लोकक्षयकृतप्रवृत्तो.’ ‘जर सहस्रसूर्यांचं तेज एकवटून आकाशात झळकलं तर ती आभा त्या परमात्म्याची असेल. मी काळ आहे, लोकसंहार करायला प्रवृत्त झालो आहे.’ ओप्पेनहायमरच्या नेतृत्वाखालीच बनवल्या गेलेल्या अणुबॉम्बची ती चाचणी होती. तोवर त्या अस्त्राच्या प्रचंड संहारक्षमतेची जाणीवच त्याला आणि त्याच्या इतर सहकारी वैज्ञानिकांनाही झाली नव्हती. आपण कोणत्या भस्मासुराला जन्म दिलाय याची प्रचिती मिळताच मात्र त्यापैकी अनेकांचं हृदयपरिवर्तन झालं. या महाविध्वंसक अस्त्राचा प्रत्यक्ष प्रयोग कोणाहीवर केला जाऊ नये अशीच त्यांची धारणा बनली. त्यांनी त्या वेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांची गाठ घेऊन जपानबरोबरच्या युद्धात त्याचा वापर केला जाऊ नये, अशी विनंती केली. जर्मनीनं तोवर शरणागती पत्करली होती. पण जपाननं मात्र अजूनही शस्त्रसंधी केली नव्हती. आपण हवंतर जपानी सेनानींना या अस्त्राच्या विध्वंसक शक्तीचं प्रात्यक्षिक देऊन त्यांनी जर युद्धविराम केला नाही, तर त्या अण्वस्त्राचा वापर करू असा इशारा देऊ या, असंही सुचवलं. पण राजकीय प्रशासनानं त्यांची ती विनंती अमान्य केली. त्यानंतर आॅगस्ट १९४५च्या पहिल्या आठवड्यात हिरोशिमा आणि नागासाकी इथं काय घडलं त्याचा इतिहास साक्षी आहे. तिथल्या नरसंहारानं मात्र त्या वेळच्या अनेक वैज्ञानिकांच्या सद्सद्विवेकबुद्धीला टोचणी लागली. ‘आपल्या संशोधनाच्या परिणामांपासून आम्ही अलिप्त राहू शकत नाही,’ असं म्हणत त्यांनी ‘बुलेटिन आॅफ अॅटॉमिक सायन्टिस्ट्स' या चळवळीची स्थापना केली. त्याच नावानं त्यांनी एक नियतकालिक प्रकाशित करायला सुरुवात केली. त्या नियतकालिकामधून शांततेचा उद्घोष करत त्यांनी अण्वस्त्रनिर्मितीबाबत चिकित्सक चर्चेलाही सुरुवात केली.खुद्द ओप्पेनहायमरनं त्या अणुबॉम्बच्या कित्येक पटीनं संहारक शक्ती असलेल्या हायड्रोजन बॉम्ब बनविण्याच्या प्रकल्पात सहभागी होण्याचं तर नाकारलंच; पण तो प्रकल्प हाती घेतला जाऊ नये असाही प्रचार करायला सुरुवात केली. त्याचे परिणामही त्याला भोगावे लागले. त्याचं सिक्युरिटी क्लिअरन्स काढून घेण्यात आलं आणि त्याच्यावर देशद्रोहाचा महाभियोग रचला गेला. तो कम्युनिस्ट असल्याचा आरोपही त्याच्यावर केला गेला. दुर्दैवानं वैयक्तिक महत्त्वाकांक्षेनं पछाडलेला त्याचाच सहकारी मूळचा हंगेरीनिवासी एडवर्ड टेलर त्याच्यावर उलटला. त्यानं ओप्पेनहायमरच्या विरोधात साक्ष दिली. ओप्पेनहायमरला अमेरिकन सरकारनं वाळीत टाकलं. त्याच्या अनेक वैज्ञानिक सहकाऱ्यांनी मात्र त्याची साथ सोडली नाही. त्यानंतर अनेक वर्षांनी त्याचं निर्दोषत्व मान्य करून अमेरिकन सरकारनं त्याला फर्मी मेडलही बहाल केलं. पण ‘बुँदसे गयी वो हौदसे नही आती' याच जातकुळीतला तो प्रकार होता. मध्यंतरीच्या काळात बुलेटिन आॅफ अॅटॉमिक सायन्टिस्ट्च्या चळवळीचं रोपटं चांगलंच रुजलं होतं. फोफावलं होतं. तोवर ज्यानं राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांना पत्र लिहून अमेरिकेनं अणुबॉम्ब तयार करण्याचा प्रकल्प हाती घ्यावा असा आग्रह धरला होता त्या अल्बर्ट आईन्स्टाईनलाही आपण घोडचूक केली असं वाटायला लागलं होतं. त्यानं आणि बर्ट्रान्ड रसेल यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध करून महासंहारक अस्त्रांच्या निर्मितीपोटी उद्भवणाऱ्या धोक्यांचं परिशीलन करण्याचं आवाहन केलं. त्यासाठी एक आंतरराष्ट्रीय परिषद भरवावी असाही प्रस्ताव त्यांनी मांडला. तेवढ्यात सुवेझ कालव्यावरून पडलेल्या ठिणगीचा भडका उडाला. आणि त्या काळी विमानप्रवास इतका प्रचलित झालेला नसल्यानं समुद्री प्रवासी वाहतुकीवर संकट आलं. त्यामुळं मग परत पगवॉशचं आमंत्रण स्वीकारलं गेलं. तिथंच पहिली बैठक झाली आणि या मोहिमेलाही पगवॉश कॉन्फरन्स असंच नाव मिळालं. त्या मोहिमेत अनेक शांतताप्रेमी वैज्ञानिक सहभागी झाले. त्यांनी सातत्यानं आपल्या ध्येयाचा पाठपुरावा केला. त्याच सुमारास अमेरिका आणि रशिया यांच्यात शीतयुद्ध खेळलं जात होतं. अण्वस्त्रांचा वापर करणारा एकमेव देश म्हणून अमेरिकेकडं संशयानं पाहिलं जात होतं. त्यातच तिथल्या कम्युनिझमची कावीळ झालेल्या सिनेटर मॅक्कार्थींनी उदारमतवादी बुद्धिमंतांना एकामागोमाग एक देशद्रोही ठरवण्याचा सपाटाच लावला होता. त्यात ओप्पेनहायमरचाही बळी दिला गेल्याचं पाहिल्यावर साहजिकच पगवॉश कॉन्फरन्समधील वैज्ञानिकांनी अमेरिकेच्या धोरणांवर टीका करायला सुरुवात केली होती. त्यामुळं तिलाही कम्युनिस्टधार्जिणं ठरवून बदनाम करण्याचे प्रयत्न केले गेले. अनेक देशांमधील वैज्ञानिक, दार्शनिक, समाजशास्त्रज्ञ संस्थेला येऊन मिळत होते. सातत्यानं त्यांनी शांततेचा उद्घोष चालवला होता. त्याचीच परिणती १९९५ सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार पगवॉश कॉन्फरन्सला प्रदान करण्यात झाली. त्या वेळी स्टॉकहोमला परिषदेच्या वतीनं उपस्थित असलेल्या मंडळात गतवर्षीच्या अखेरीस निवर्तलेले प्राध्यापक भालचंद्र उदगावकर यांचाही समावेश होता. किंबहुना पगवॉश कॉन्फरन्सची ध्येयधोरणं निश्चित करणाऱ्या धोरणपत्राचं लेखन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. महासंहारक अस्त्रं, वेपन्स आॅफ मास डिस्ट्रक्शनला अटकाव करणं हे या संस्थेचं प्रमुख ध्येय होतं. सुरुवातीला यामध्ये केवळ अण्वस्त्रांचाच समावेश केला गेला होता. पण आता त्यात रासायनिक, जैविक अस्त्रांचाही समावेश केला गेला आहे. कालांतरानं जागतिक हवामान बदलाचा धोका अण्वस्त्रांच्या धोक्याइतकाच गंभीर असल्याचं वाटून त्याविषयीही जनमत तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलं.