युरोप आणि आशिया यांच्यातील दरवाजा म्हणून जगाच्या नकाशात तुर्कस्तानला विशेष महत्वाचे स्थान आहे. एका बाजूस सीरिया, इराण आणि इराक यासारखे मध्य आशियातले देश आणि दुसऱ्या बाजूला ग्रीस आणि बल्गेरिया यांच्या रूपाने युरोपातले देश यांच्यातला तुर्कस्तान नेहमीच महत्वाचा राहिला आहे. इसिसच्या अतिरेक्यांविरोधातल्या लढाईत तुर्कस्तानची भूमिका हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या आठवड्यात फ्रान्सच्या नीसमध्ये एका अतिरेकी ड्रायव्हरने राष्ट्रीय उत्सवातली आतिषबाजी पाहाण्यासाठी जमलेल्या लोकांमध्ये ट्रक घुसवून त्यांना निर्घृणपणे चिरडले होते. ती घटना ताजी असतानाच तुर्कस्तानात लष्कराने उठाव करून तिथली सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. चौदा वर्षे त्या देशाच्या अध्यक्षपदावर असणारे अध्यक्ष रेसेप एर्दोगन यांच्याविरुद्ध उठाव का झाला, तो कुणी घडवून आणला, तो यशस्वी झाला असता तर त्याचे कोणते परिणाम झाले असते याची बरीच चर्चा झाली असून ती येथे करायची नाही. लष्कराचा उठाव यशस्वी झाला नाही हे खरे, पण त्यापेक्षाही एर्दोगन ज्या पद्धतीने उठावाला सामोरे गेले त्यात सोशल मीडियाची ताकद (पुन्हा एकदा) सिद्ध झाली. ‘व्होक्स’ वेबन्यूज पोर्टलवर ड्यूक विद्यापीठाच्या सोशिओलॉजी विभागातल्या केरन हिले यांनी केलेले एक विश्लेषण वाचायला मिळते. उठावात (कूप) जनतेचा फारसा सहभाग नसतो तर क्र ांतीमध्ये (रिव्होल्यूशन) जनता पुढाकार घेत असते असे सांगून एर्दोगन यांच्या विरोधात उठाव झाला असे ते सांगतात. शुक्रवारच्या रात्री परिस्थिती अतिशय अनिश्चित होती. अशा वेळी एर्दोगन यांनी त्यांच्या आयफोनवरून फेसटाईम या सोशल नेटवर्कींग साईटला मुलाखत देऊन लष्कराच्या बंडाची माहिती देत इस्तंबूल आणि अंकाराच्या रस्त्यावर येऊन या बंडाला विरोध करण्याचे आवाहन जनतेला केले. ‘सीएनएन’ सारख्या टीव्ही चॅनेलच्या सहाय्याने फोनच्या लहान पडद्यावरचे त्यांचे हे लहानसे भाषण अत्यंत अल्पावधीत तुर्कस्तानच्या लाखो लोकांपर्यंत जाऊन पोहोचले आणि तिथेच बंडाच्या विरोधात ठिणगी पडली. या घटनेची चर्चा करतांना केरन हिले यांनी १९८१ साली स्पेनमधल्या अशाच उठावाच्या वेळी तिथले राजे जुआन कार्लोस यांनी टेलिव्हिजनचा असाच वापर केला होता त्याचा संदर्भ दिला आहे. पण यावेळी बंडखोरांनी राष्ट्रीय चित्रवाणीचा ताबा घेतला आहे असे वाटायला लागले होते. काही तास प्रक्षेपण बंद होते. त्यामुळे एर्दोगन यांना लोकांशी संवाद करण्यासाठी ते उपयोगी ठरणार नव्हते. त्यावेळी फेसटाईम, फेसबुक आणि इतर सोशल मीडियाची साधने अतिशय उपयोगी ठरली हे त्यांनी मुद्दाम नमूद केले आहे. ‘फायनांशियल टाईम्स’ने मेहरूल श्रीवास्तव या त्यांच्या तुर्कस्तानातील प्रतिनिधीचे वार्तापत्र प्रकाशित केले आहे. बंडाच्या सुरुवातीच्या काळात एर्दोगन यांनी फेसटाईमच्या द्वारे सीएनएनच्या अँकरशी संपर्क साधून त्याच्याद्वारे जनतेपर्यंत आपले आवाहन पोहोचवले. आपण या बंडाचा बिमोड करू शकणार आहोत, रस्त्यावर उतरा आणि बंडखोरांना चोख उत्तर द्या, असे आवाहन त्यांनी केले. त्यांचे हे आवाहन ट्विटरवर त्यांना फॉलो करणाऱ्या ८५ लाख लोकांपर्यंत पोहोचवले गेले. त्यांच्या लोकांनी व्हॉट्स अॅपवरून ते लोकांपर्यंत पोहोचवले. इस्तंबुलच्या कादिर हास युनिव्हर्सिटीच्या एकीन उन्वर यांनी सांगितले की एर्दोगन यांनी जसा सोशल मीडियाचा वापर केला तसेच अतिशय हुशारीने त्यांनी वेगवेगळ्या इमामांशी संपर्क साधला आणि मशिदींच्या लाऊड स्पीकर्सवरून बंडखोरांना विरोध करण्याचे लोकाना आवाहन केले गेले. बंडखोर पारंपरिक पद्धतीने काम करीत होते. त्यांनी टेलीव्हिजनवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण सोशल मीडियावरच्या संवादावर त्यांना नियंत्रण आणता आले नाही. या उलट एर्दोगन आणि त्यांच्या समर्थकांनी मशिदीवरच्या कर्ण्यासारख्या पारंपरिक मार्गांबरोबरच सोशल मीडियासारख्या अत्याधुनिक मार्गांचे विलक्षण मिश्रण यशस्वीपणाने वापरले. फेसटाईम आणि ट्विटरचा वापर करून लोकांचा पाठिंबा मिळवून एर्दोगन बंडखोरांचे प्रयत्न हाणून पडतील असे आपल्याला कधीच वाटले नव्हते, असे समाज व तंत्रज्ञान यांच्यातल्या सबंधांचे अभ्यासक आणि नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठामधले असिस्टंट प्रोफेसर झायनेप तुफेकेई यांनी जे म्हटले, ते लक्षणीय आहे. ‘बीबीसी’ने थोम पूल यांचे ‘मोबाईल्सनी रणगाड्यांचा पराभव केलो आणि एर्दोगन यांना वाचवले’ या शीर्षकाखालीले वार्तापत्र प्रकाशित केले आहे. शुक्रवार संध्याकाळी बंडखोरांनी आपल्या योजनेनुसार आशिया आणि युरोपच्या सीमेवरचा बोस्फोरसच्या खाडीवरचा पूल तसेच इस्तंबुलचा विमानतळ ताब्यात घेतला, इस्तंबुल आणि अंकाराच्या रस्त्यावर आणि तिथल्या राष्ट्रपतींच्या प्रासादाच्या परिसरात रणगाडे धावायला लागले. महत्वाच्या वृत्तसंस्थांवर धाडीही घातल्या गेल्या. पण बंडखोरांना सोशल मीडियाच्या प्रभावाची कल्पना आली नाही. एर्दोगन यांनी जनतेला जे आवाहन केले ते काही एखाद्या रणगाड्यावरून केले नाही की टेलीव्हिजनच्या स्टुडीओतून केले नाही. बंड झाले त्यावेळी ते देशाच्या अगदी एका टोकाला असणाऱ्या दक्षिणेकडच्या मार्मारिसमध्ये सट्टीचा आनंद घेत होते. पण तिथून केवळ सोशल मीडियाच्या सहाय्याने त्यांनी सर्वसामान्य लोकाना रस्त्यावर उतरायला प्रवृत्त केले. २०१३ च्या जनतेच्या असंतोषानंतर हेच एर्दोगन ट्विटरवर बंदी घालायला निघाले होते, याची आठवणदेखील थोम पूल यांनी काढली आहे. पण त्याच ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमांचा वापर करून त्यांनी आपली सत्ता वाचवली असल्याचे ते सांगत आहेत. ‘बिझनेस एचटी’ या तुर्की नियतकालिकात महंमद अल एरिअन या इजिप्शियन अमेरिकन आर्थिक सल्लागारांनी असे म्हटले आहे की, रणगाड्यांवर चढलेल्या साधारण तुर्की माणसांची दृश्ये आता सोशल मीडियावर पसरायला लागली असून आपण लोकशाही वाचवू शकतो हा लोकांच्या मनातला विश्वास वाढायला लागला आहे. बंडाचा प्रयत्न सामान्य माणसांनी हाणून पाडला हे या घटनेचे वैशिष्ट्य आहे. अर्थात आपल्याला कसे शासन हवे आहे हे जनतेने याच वेळी सांगितले असे नाही. २०११ आणि २०१३ मध्ये इजिप्तमध्येही सर्वसामान्य लोकानी अशाच पद्धतीने त्यांचे मत प्रकट केल्याचा उल्लेख एरियन करतात. बंडाच्या काळात लोकाना एकत्र आणण्यात आणि त्यांना लष्करी बळाच्या विरोधात खंबीरपणाने उभे करण्यात सोशल मीडियाने अत्यंत प्रभावी भूमिका बजावली आहे. केवळ लष्करी ताकदीच्या बळावर राज्ये मिळवता किंवा राखता येत नाहीत हा काही पहिल्यांदा समजलेला धडा नव्हे. पण सोशल मीडियाकडे दुर्लक्ष केले तर कशी फसगत होते याचाही तो वस्तुपाठच आहे असे मानायला हरकत नाही.-प्रा.दिलीप फडके(ज्येष्ठ विश्लेषक)
सोशल मीडियाने फसवलेला तुर्की लष्करी उठाव
By admin | Updated: July 21, 2016 04:10 IST