शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

तात्या कोठेंचा दरबार विसावला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2016 02:36 IST

सकाळी ७ पासूनच घरासमोर माणसांची गर्दी. कोणाच्या हातात कागदाचे भेंडोळे तर कोणाच्या डोळ्यांत काम व्हावे ही लागलेली ओढ

सकाळी ७ पासूनच घरासमोर माणसांची गर्दी. कोणाच्या हातात कागदाचे भेंडोळे तर कोणाच्या डोळ्यांत काम व्हावे ही लागलेली ओढ ! सकाळी आठ-साडेआठपर्यंतच ही गर्दी २००-३०० लोकांपर्यंत पोहोचायची आणि पूजा-अर्चा आटोपून तात्या दिवाणखान्यात दाखल व्हायचे... तिथेच भरायचा तात्यांचा दरबार ! तब्बल ३५ वर्षांपासून सोलापूरकरांच्या अंगवळणी पडलेला तात्यांचा दरबार आता विसावला आहे.विष्णुपंत तथा तात्या कोठे यांचे निधन झाले आणि सोलापूरकरांना या विसावलेल्या दरबाराची मनाला चटका लावणारी जाणीव झाली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर ज्यांनी-ज्यांनी राज्य केले त्यांच्या आपापल्या गावात आणि मतदारसंघात त्यांचा व्याप सांभाळणारी ‘कारभारी’ मंडळी राज्याला नवी नाहीत. विष्णुपंत कोठे यांनीही सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘कारभाऱ्या’ची भूमिका मोठ्या खुबीने आयुष्यभर यशस्वीपणे वठविली. पण ते केवळ राजकारणापुरते ‘कारभारी’ न राहता स्वत: शिंदे आणि सोलापूरकरांचे लाडके तात्या कधी बनले हे कळलेही नाही. राजकारण्यांच्या संपर्क कार्यालयाची संकल्पना ८०च्या दशकापासून यशस्वीच नाही तर लोकप्रिय करून दाखविण्याची किमया तात्यांनी केली. गावात नेता नाही म्हणून कोणाचे काम अडले असे त्यांनी या कार्यालयाच्या माध्यमातून कधीच घडू दिले नाही. बहुभाषिक सोलापुरातील पद्मशाली समाजातील गिरणी कामगाराचा हा मुलगा आपली कारकीर्द जुन्या मिल चाळीतील दोन खोल्यांच्या घरापासून सुरू करतो काय आणि पाहता पाहता जिल्ह्याच्या राजकारणात आपली मांड पक्की करतो काय ! विष्णुपंत कोठे यांचा प्रवास अनेकांना अचंबित करणारा असाच. सुशीलकुमार शिंदे १९७४ साली करमाळा मतदारसंघातून विधानसभेत दाखल झाले. त्यानंतर १९७८साली उत्तर सोलापूर मतदारसंघात त्यांचे आगमन झाले. १९८० पासून त्यांच्या संपर्कात आलेल्या कोठे यांनी त्यांच्या स्थानिक राजकारणाची संपूर्ण सूत्रे आपल्या हाती घेतली. सर्व जाती-धर्मांची व गटा-तटांची मोट बांधून शिंदेंचे राजकारण बळकट करण्याचे काम केले. मोठ्या नेत्यांचा शिलेदार म्हणून काम करणाऱ्या माणसांचे विश्व राजकारणापुरतेच मर्यादित राहते हा दंडक त्यांनी फोल ठरविला. शिंदेंचे सोलापूर जिल्ह्यातील राजकारण सांभाळत असताना खुद्द शिंदेंशी मैत्री पक्की राखत त्यांनी सर्वच क्षेत्रात जिवाभावाच्या मित्रांचा गोतावळा तयार केला. त्यात अगदी स्व. निर्मलकुमार फडकुलेंपासून ते थेट रामदास फुटाणे, फ. मुं. शिंदेंसारख्या साहित्यिकांबरोबरच बाबूराव मैंदर्गीकर यांच्यासारख्या प्रकाशकाचाही समावेश होता. आपल्या दरबारात येणाऱ्यांचे काम मार्गी लागणे हे त्यांचे पहिले ध्येय असायचे आणि नंतर ती व्यक्ती कोण हा विचार असायचा. सोलापूरच्या साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीला पडद्यामागे राहून भक्कम बळ देण्याचे काम त्यांनी केले. स्व. निर्मलकुमार फडकुले यांना अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले नाही, ही खंत सोलापूरकरांना नेहमीच वाटायची. फडकुलेंच्या निधनानंतर त्यांच्या नावाचे प्रतिष्ठान स्थापन करून विविध उपक्रम आणि आलिशान फडकुले सभागृहाच्या माध्यमातून आगळी आदरांजली वाहण्याचे काम तात्यांनी केले. राजकारणात कोणीही कायमचा मित्र नसतो अथवा शत्रूही नसतो, या पारंपरिक नियमाशी बंड करण्याचा त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला. मागील पाच वर्षे शिंदे व कोठे परिवाराची पुढची पिढी राजकारणात गतीने सक्रिय झाली. प्रणिती शिंदे यांच्या विरोधातच तात्यांचे चिरंजीव महेश कोठे विधानसभा निवडणूक लढले ! असे घडत असले तरी तात्यांचा जीव मात्र शिंदेंच्या मैत्रीपाशात अडकून राहिला. सोलापूरच्या राजकारणावर दीर्घकाळ हुकूमत राखलेल्या तात्यांनी आपला दरबार विश्वास, जिव्हाळा आणि निष्ठेने जपला होता. आज तो दरबार विसावला आहे. तो दरबार फुलवित ठेवण्याची जबाबदारी आता त्यांचे चिरंजीव महेश आणि नातू डॉ. सूरज व देवेंद्र यांच्यावर आली आहे.- राजा माने