केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांत राबविण्याचा विचार असलेल्या महाकाय जलपुनर्भरण योजनेची हवाई पाहणी केली. योजनेसंंबंधी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेशदेखील दिले गेले आहेत. दोन मंत्री ही पाहणी करीत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात निवृत्त शासकीय भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांनी राबविलेली जलसंधारणाची तंत्राधारित प्रणाली प्रत्यक्ष पाहिली. तब्बल पाच तास त्यांनी भाटपुरा, अजनाड-बंगला, वाडी, बोराडी या गावात जाऊन नाल्यावर राबविलेल्या साखळी सीमेंट बंधाऱ्याचा प्रयोग पाहिला. बंधाऱ्यांमुळे साठलेले पाणी, शेतकऱ्यांनी पिकविलेली बागायती शेती पाहिली. हंगामात दोन-तीन पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.महाकाय जलपुनर्भरण योजनेविषयी गेल्या दहा वर्षांपासून चर्चा सुरू आहे. राज्याचा जलसंपदा विभाग जळगावच्या गिरीश महाजन यांच्याकडे, तर केंद्रातील जलसंपदा विभाग मध्य प्रदेशातील उमा भारती यांच्याकडे असल्याने आता योजनेला पुन्हा चालना मिळाली. मे महिन्यापर्यंत प्रकल्प अहवाल तयार होईल आणि वर्षभरात कामाला सुरुवात होईल, अशी जलसंपदा मंत्री महाजन यांची अपेक्षा आहे. एकीकडे वाघूर धरण, प्रकाशा, सारंगखेडा बॅरेजचे पाणी पाटचाऱ्यांअभावी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचलेले नाही. निधीअभावी पाडळसरेसह काही धरणांची कामे बंद असताना महाकाय पुनर्भरण योजनेच्या भवितव्याविषयी साशंकता असणे स्वाभाविक आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांनी ‘शिरपूर पॅटर्न’ची प्रत्यक्ष पाहणी करण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसचे आमदार अमरीशभाई पटेल यांनी प्रियदर्शनी सूतगिरणी आणि शिक्षणसंस्थेच्या निधीतून ‘शिरपूर पॅटर्न’साठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. खानापूरकर यांनी शिरपूर तालुक्यातील डोंगराळ भागातील नाल्यांची निवड करून उगमापासून संगमापर्यंत विशिष्ट अंतरावर टप्प्याटप्प्याने सीमेंट बंधारे बांधले. त्यासाठी नाले ४० फूट रुंद आणि ३० फूट खोल केले. एका नाल्यावर तब्बल १६ बंधारे बांधण्याचा प्रयोग त्यांनी दहिवद, गरताड येथे केला. असे तब्बल १३५ बंधारे त्यांनी बांधले आहेत.या जलसंधारण प्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही भूसंपादन करावे लागलेले नाही. बंधाऱ्याची देखभाल-दुरुस्ती करावी लागत नाही. कोणत्याही प्रकारचे स्थलांतर होत नाही. ‘शिरपूर पॅटर्न’चा परिणाम आता या तालुक्यात दिसून येत आहे. सरासरी ६०० मि.मी. पर्जन्यमान असताना या तालुक्यातही यंदा पाऊस कमी झाला. परंतु तरीही १३५ बंधाऱ्यांमुळे या परिसरात ठिकठिकाणी जानेवारीअखेर जलसाठे कायम आहेत. शंभर फुटावर गेलेल्या विहिरी आणि ८०० फुटापर्यंत पोहोचलेल्या कूपनलिकांचे पुनर्भरण झाले आहे. पावसाचा थेंब अन् थेंब वाचविला आणि साठविला जात आहे. जलसाठे तयार आहे; पण विजेअभावी ते पाणी उपसता येत नसल्याची समस्या लक्षात घेऊन अमरीशभाई पटेल यांनी शेतकऱ्यांना डिझेल पंप व पाइप दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा या प्रयोगात सहभाग वाढला. नाला रुंदीकरणासाठी शेतकरी स्वत:हून जमिनी देऊ लागले.धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यात जलयुक्त शिवार योजनेची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी शिरपूर पॅटर्नची पाहणी केलेली नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि कृषिमंत्री एकनाथराव खडसे हे खान्देशचे असूनदेखील अद्याप याठिकाणी आलेले नाहीत. काँग्रेसच्या आमदाराने केलेल्या या रचनात्मक कार्याची दखल भाजपाच्या मंत्र्यांनी घेतली नसली तरी सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली आहे. या दौऱ्यानंतर सरकारच्या सिंचन धोरणावर ‘शिरपूर पॅटर्न’चा काही प्रभाव जाणवतो काय, हा औत्सुक्याचा विषय राहील.- मिलिंद कुलकर्णी
शिरपूर पॅटर्नची संघाकडून दखल
By admin | Updated: January 23, 2016 03:47 IST