एखाद्या कथेतील नायकाच्या वाट्याला आलेली उपेक्षा, अवहेलना, त्याचा संघर्ष मांडणाऱ्या लेखकाच्याही वाट्याला यावेत, हा जसा मराठी साहित्यातील दुर्दैवी योगायोग आहे, तशीच ती आनंदाच्या शोधात निघालेल्या एका लेखकाच्या संघर्षाची कहाणीही आहे.मनोहर नरांजे नावाचा प्राथमिक शिक्षक पंढरीची वारी करावी तसा मेळघाटातील बैरागडला जात असतो. डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे या सेवाभावी दाम्पत्याचे जगणे तो समजून घेतो, त्यांच्यासोबत त्यांच्यासारखेच जगण्याचा प्रयत्न करतो. आसक्तीला त्यागणाऱ्या एका सेवाभावी दाम्पत्याचा अनासक्त प्रपंच आपण समजून घ्यावा आणि त्या प्रपंचाच्या अंतरीच्या कळा इतरांनाही समजावून सांगाव्यात, असे त्याला तीव्रतेने वाटू लागते. त्यातूनच मेळघाट या दुर्गम अरण्य प्रदेशातील तेवढ्याच उपेक्षित सेवाभावाची गाथा शब्दबद्ध होते. त्याचे पुस्तक व्हावे, ते प्रसिद्ध व्हावे, यासाठी मनोहर नरांजे हा लेखक पुण्या-मुंबईतील प्रकाशकांचे उंबरठे झिजवतो आणि शेवटी स्वत:च पदरमोड करून ‘बैरागड’ या नावाचे पुस्तक प्रकाशित करतो. एखाद्या कथेतील नायकाच्या वाट्याला आलेली उपेक्षा, अवहेलना त्याचा संघर्ष मांडणाऱ्या लेखकाच्याही वाट्याला यावी, हा मराठी साहित्यातील दुर्दैवी योगायोग जसा आहे तशीच ती आनंदाच्या शोधात निघालेल्या एका लेखकाच्या संघर्षाची कहाणीही आहे. मेळघाटातील आदिवासींना दारिद्र्याच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी ‘अनिवासी आणि प्रवासी’ सामाजिक कार्यकर्ते व्हायचे की तिथे राहून त्यांच्यासारख्याच हालअपेष्टा सहन करायच्या, असा प्रश्न एमबीबीएस करीत असलेल्या रवींद्र कोल्हे या तरुणाला अस्वस्थ करायचा. एके दिवशी एका स्कॉटिश मिशनऱ्याने लिहिलेले ‘व्हेअर-देअर इज नो डॉक्टर’ हे पुस्तक हातात पडले आणि पुढच्या जगण्याचे प्रयोजन सापडले.३५ वर्षांपूर्वी डॉ. रवींद्र कोल्हे धारणी या तालुक्याच्या ठिकाणापासून अतिदुर्गम भागात असलेल्या बैरागडला राहायला आले. माझ्या सोबतीने आयुष्य काढायचे असेल तर ४०० रुपयांत संसार करावा लागेल, ४० किलोमीटर पायपीट, स्वत:साठी नाही तर इतरांसाठी भीक मागायची तयारी आणि पाच रुपयांत लग्न अशा डॉक्टरच्या अव्यवहारी अटी स्मितातार्इंनी मान्य केल्या. स्वत:सोबतच आदिवासींचाही संसार उभारायची सुरुवात झाली खरी, पण पुढे आव्हानांचे भलेमोठे डोंगर उभे होते. जीवघेणे हल्ले, पदोपदी अपमान, ज्यांच्यासाठी आपले सुखासीन आयुष्य विस्कटून टाकायचे त्यांच्या मनात अविश्वास! पण कोल्हे दाम्पत्य मागे हटले नाही. कष्टाचे जिणे स्वत:हून पत्करले. आपण खूप मोठी समाजसेवा करतो, असा आव मात्र त्यांनी कधीच आणला नाही किंवा मेळघाटातील कुपोषण संपविण्याचे दावे करून सरकार आणि दानशूरांकडून अनुदानही लाटले नाही. त्यांना फक्त वंचितांच्या दु:खाचे कारण शोधायचे होते, त्याची तड लावायची होती.कोल्हे दाम्पत्याचा हा त्याग खूप उशिरा जगासमोर आला. ‘लोकमतने महाराष्ट्रीयन आॅफ दि इयर’ या पुरस्काराने उभयतांचा गौरव केला आणि त्यांचे कार्य जगासमोर आले. पण तत्पूर्वी आणि खरे तर त्यानंतरदेखील समाजाला वा माध्यमांना त्यांची दखल घ्यावीशी वाटली नाही. मनोहर नरांजेंना हे सलायचे. नरांजे बैरागडला गेले, कोल्हे दाम्पत्यासोबत राहिले, कुडाच्या भिंती सारवल्या आणि मगच त्यांनी पुस्तक लिहिले. ते लिहून नरांजेंना पैसे कमवायचे नव्हते. आपण या सामाजिक कार्यकर्त्यासारखे निरलसपणे जगू शकत नाही, याचे अपराधीपण प्रत्येक संवेदनशील माणसाला बोचत असते. अशा कामांना मदत करून त्याचे प्रायश्चित्त घेण्याचा आपला प्रयत्न असतो. नरांजेंनीही या पुस्तकाच्या माध्यमातून प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी साहित्यातील नामांकित प्रकाशकांना हे पुुस्तक महत्त्वाचे वाटले नाही. या पुस्तकातील नायकाला वलय, सेवेचा अहंकार, पाठीराखे आणि पिढीजात वारसा नसल्याने म्हणून असेल कदाचित, लेखकाला पावलापावलावर निराश होऊन परतावे लागले. ओढग्रस्तता पत्करून, स्वत:च्या पैशाने त्यांनी हे पुस्तक अखेर प्रकाशित केले. समाजसेवेच्या आणि साहित्याच्या क्षेत्राला या पुस्तकाची दखल घ्यावीच लागणार आहे. वंचितांच्या कल्याणासाठी आयुष्याचा होम करणारे निर्लेप कार्यकर्ते सापडेनासे झाले असताना आणि लेखकाचा प्रामाणिकपणाही साहित्यातून नष्ट होण्याच्या या काळात माणसाच्या आनंदाचा शोध साऱ्यांनाच खुणावणारा आहे.- गजानन जानभोर
आनंदाचा शोध
By admin | Updated: April 13, 2015 23:31 IST