- डॉ. भारत पाटणकर१ मे १९६० रोजी १०५ - १०७ हुतात्म्यांनी बलिदान देऊन हजारोंनी लाठ्या खाऊन आणि जेलमध्ये जाऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविला. याचा ‘मंगल कलश’ मात्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांनी आणला. बेळगाव - कारवार - डांग - उंबरगाव आजपर्यंत बाहेर राहिले ते राहिलेच. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष अशा पक्षांच्या नेतृत्वाखाली हा रणसंग्राम लढविला गेला. संयुक्त महाराष्टÑ समितीने काँग्रेसचा दारुण पराभव केल्यामुळे अखेरचा टोला बसला आणि मागणी बहुतांशी मान्य झाली. ‘महाराष्ट्र आता बहुजन-दलित जनतेने चालवायचा’ अशा प्रकारची हुल उठवून यशवंतरावांनी समितीच्या रथी-महारथींच्या पाठीवर गोंजारले आणि या सर्व पक्षांमधून मोठमोठे नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले. महाराष्टÑ आता विकासाची नवी वाट चालू लागल्याचे चित्र उभे केले गेले; पण महाराष्टÑ आता एक नवा शोषक वर्ग आणि नव्या प्रकारचे आधुनिक जातवर्चस्व निर्माण करून विकासाचे सहकारी वळण घेऊ लागला.या पार्श्वभूमीवर १९६० पासून सुरू होणाऱ्या दशकाच्या अखेरीला महाराष्टÑाच्या जनतेतून तरुणांच्या बुलंद सहभागातून नव्या चळवळी आणि जनचळवळींच्या नव्या दिशा पुढे आल्या. या चळवळींनी खरे म्हणजे आजचा महाराष्टÑ घडविला आहे; पण हा इतिहास अंधारातच ढकलला गेला आहे. या दशकापासून ते १९७० ते ८० च्या दशकांपर्यंत महाराष्टÑाच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, जाती-अंत विषयक, स्त्री मुक्तीविषयक, कला-साहित्यविषयक क्षेत्रांमध्ये ऐतिहासिक बदल घडविणाºया चळवळी निर्माण झाल्या. या चळवळींनी आजच्या काळापर्यंतच्या पायाभूत बदलांना दिशा दिली, आकार दिला.या चळवळींपैकी सर्वांत पहिल्यांदा महाराष्टÑाच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनावर, साहित्यिक कलाविषयक जीवनावर परिणाम करणारी चळवळ ‘दलित पँथर’ या नावाने पुढे आली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिल्यांदाच स्वाभिमानाने, नव्या जाणिवेने, बिनतोड बाण्याने ही नवी चळवळ वादळी पद्धतीने उभी राहिली. आजच्या तरुण पिढीला या चळवळीचे एक खास आकर्षण आहे. याही पिढीवर तिच्या इतिहासाचा प्रभाव आहे. युवक क्रांतीदल, समाजवादी युवक दल अशा वेगवेगळ्या प्रकारे समाजवादी विचारांच्या वेगळ्या चळवळी याच काळात पुढे आल्या. त्यांनीही विद्यार्थी- युवकांमध्ये एक रसरशीत आंदोलन उभे केले. परंपरागत समाजवादी पठडीच्या बाहेर जाऊन उभे केले.
(श्रमिक मुक्ती दलाचे नेते)