शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

जाहिरा वसीमच्या निमित्ताने काश्मीरातील वास्तव

By admin | Updated: January 18, 2017 23:58 IST

‘दंगल’ चित्रपटात जाहिरा वसीम या काश्मीरी युवतीने केलेल्या गीता फोेगटच्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेतले.

‘दंगल’ चित्रपटात जाहिरा वसीम या काश्मीरी युवतीने केलेल्या गीता फोेगटच्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेतले. ‘हमारी छोरीयाँ क्या छोरो से कम है’? हा डायलॉग आता देशभरात एव्हाना घरोघरी पोहोचू लागला आहे. कुस्तीसारख्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रातही मुली प्राविण्य मिळवू शकतात आणि तेही हरयाणासारख्या पुरुषप्रधान जाट संस्कृतीत, हा संदेश केवळ मुलींसाठी नाही तर त्यांच्या पालकांसाठीही प्रेरणादायी ठरत असतानाच जाहिरा वसीम स्वत: मात्र तिने केलेल्या या भूमिकेमुळे वादात सापडली आहे. खरे तर हा वादाचा विषय असू शकत नाही, असे जे जावेद अख्तर म्हणाले, ते बरोबरच आहे आणि ही काही काश्मीरमधील अशा प्रकारच्या वादाची पहिलीच वेळ नाही. मात्र गेल्या सव्वीस वर्षांहून अधिक काळ हिंंसाचारामध्ये आणि दहशतग्रस्त वातावरणामध्ये जगणाऱ्या व चित्रपटगृहे नसणाऱ्या काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या या सोळा वर्ष वयाच्या मुलीने धर्म अथवा परंपरा झुगारल्या आणि चित्रपटात भूमिका केली व तीदेखील एका कुस्तीपटूची, यामुळे कट्टरतावादी दुखावले. ‘पॅलेट’मध्ये (छऱ्याच्या बंदुकीतील छर्रे) जखमी झालेल्या अथवा अंध झालेल्या काश्मीरी युवकांचा तिने अपमान केला, असा तिच्यावर आरोप सुरु झाला आणि तिने मुस्लीम महिला मुख्यमंत्री असणाऱ्या मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली. त्यावेळी जाहिरा काश्मीरी मुलींची ‘रोल मॉडेल’ आहे असे मेहबूबा म्हणाल्या. ही बातमी आणि नंतर पुन्हा आपण काश्मीरी तरुणांचे रोल मॉडेल नसल्याचा खुलासा जाहिराने फेसबुकवर टाकला तेव्हा चर्चेला पुन्हा पेव फुटले. ‘काश्मीरी छोरीयाँ छोरोसे कम है’ असं म्हणणारे कट्टरवादी लोक प्रसिद्ध गायिका पद्मश्री राज बेगम, दिद्दा राणी, इंदिरा गांधी, मेहबूबा मुफ्ती इतकेच काय बराक ओबामा यांच्या सहकारी फराह पडत, डॉ. रुवेदा या काश्मीरी महिलांनी केलेली कामगिरी मात्र विसरले.चित्रपटातून दिसणारे काश्मीरी तरुणींचे सुंदर, नाजूक आणि संवेदनशील असे मनमोहक दर्शन केव्हाच मागे पडले असून आता हातात दगड घेणारी, सत्तेशी संघर्ष करणारी पुरुषी कुस्ती खेळणाऱ्या गीता फ ोगट ची भूमिका करणारी जाहिरा वसीम हेच काश्मीरी स्त्रीचे खरे रुप आहे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र काश्मीरचा निसर्ग जसा कधी खेळकर तर कधी खोडकर असतो आणि कधी कधी अक्राळ विक्राळ स्वरुप धारण करतो तशीच या स्त्रीची प्रतिमा असल्याचे इतिहास सांगतो. ती आपल्या मुलांना वाचविण्यासाठी कधी रणरागिणी होते तर कधी आपल्या मुली शिकाव्या, त्यांनी आकाशाला गवसणी घालावी यासाठी ती आपल्या मुलींना शिकायला भारतातल्या कडक उन्हाळा असलेल्या इतर शहरांमध्येही पाठवते. सरहद संस्थेत पंचवीस पेक्षा अधिक काश्मीरी मुली चौदा वर्षापेक्षा अधिक काळ पुण्यात राहत आहेत. काश्मीरी मुलांपेक्षा काश्मीरी मुलींमध्ये कष्ट करण्याची आणि पुढे जाण्याची तीव्र इच्छा असते. त्याचवेळी कुटुंबाचे नेतृत्व करण्याची उपजतच क्षमताही असते, हे अनेक उदाहरणांमधून वेळोवेळी दिसून येते. सनातनी धर्मवाद्यांनी जेव्हा जेव्हा काश्मीरी महिलांवर दबाव आणण्याचा अथवा आपले विचार लादण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्यांनी तो झुगारून लावला, हेही काश्मीरचा इतिहास सांगतो. मग तो बुरख्याच्या सक्तीचा विषय असो, की स्त्री शिक्षणाला विरोधाचा. काही वर्षांपूर्वी मुलींनी कपडे काय घालावे, चित्रपट पाहावे की नाही, यापासून वाहन चालवायचे की नाही यासाठी अतिरेकी संघटनांनीही फ तवे काढले. एक दोन तरुणींच्या चेहऱ्यावर अ‍ॅसीडही फे कले. मात्र काश्मीरी युवतींनी फ तवे पाळले नाही. आज काश्मीरी युवती भारतातील पुणे, बेंगळुरु, हैदराबाद, लखनौ, दिल्ली, जम्मू इतकेच काय तर कोलकाता आणि चीनपर्यंत शिक्षणासाठी जाऊन पोहोचल्या आहेत. त्यांनी बँकांचे कर्ज काढले तर कधी जमिनी विकल्या, केवळ आपले भविष्य नीट व्हावे म्हणून.मूलत: अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या या युवतींना काश्मीरमध्ये पुरेशा संधी नाहीत म्हणून जेथे आणि जशी संधी मिळेल तेथे या तरुणींनी स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे. जाहिरा वसीम अशा तरुणींचे प्रतिनिधित्व करते. काश्मीरी तरुणींना अपमान, दहशतवाद आणि अशांततेपासून आझादी हवी आहे. मात्र आपण तिच्या भावना समजून घ्यायला नेहमीच कमी पडतो.गेल्या तीस वर्षातल्या त्या राज्यातील अस्थिरतेचा सर्वात जास्त परिणाम काश्मीरी महिलांवर झाला आहे. एकीकडे धर्मवादी आणि अतिरेक्यांचा धोका तर दुसरीकडे सरकारी यंत्रणांकडून सततचा घेतला जाणारा संशय, यामुळे काश्मीरमध्ये बलात्कार, खून, हुंडाबळी, छेडछाड, अशा गोष्टींचे प्रमाण जरी कमी असले तरी ‘हैदर’ चित्रपटात दाखवल्याप्रमाणे कुटुंबव्यवस्था विस्कळीत झाली आहे. घरातील कोणाचेही नुकसान झाले तरी त्याचा परिणाम स्त्रियांवरच होतो आणि म्हणूनच त्या प्रसंगी समोर कोण आहे याचा विचार न करता रस्त्यावर उतरतात. आजही जाहिरा वसीम हिच्या निमित्ताने काही लोक टीका करीत असले तरी त्यात राजकारणाचाच भाग जास्त आहे. ज्या वातावरणामध्ये जाहिरा राहते, त्या वातावरणात तिला धमक्या आल्यानंतर भीती वाटणे नैसर्गिक आहे. मात्र काश्मीरी समाज महिलांना सन्मान देत नाही, असे मानणे मात्र त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. उर्वरित भारतामध्ये महिला आपल्या अधिकारांबद्दल जितक्या जागृत नसतात तितक्या त्या काश्मीरमध्ये आहेत. एका बाजूला सुधारणांची ओढ आणि दुसऱ्या बाजूला सनातन्यांचा दबाव यामध्ये काश्मीरी महिला सतत संघर्ष करीत असतात. काश्मीरी मुली उपजतच बंडखोर असतात. त्या घरात बसून राहणे मान्य करत नाहीत. आजही काश्मीरी मुस्लीम महिलांचे नोकरीमधील प्रमाण लक्षणीय आहे. हळूहळू उद्योगधंद्यातही त्या पुढे येत आहेत. इतकेच काय बऱ्याचदा विवाहाच्या वेळी मुलगी नोकरी करत असेल तर मुलगा कसा असावा याचा निर्णय तीच घेते. विधवा पुनर्विवाहापासून घराच्या मालमत्तेपर्यंत अनेक निर्णयांमध्ये काश्मीरी महिला नेहमी काळाच्या बरोबर किंंवा पुढे राहिल्या आहेत व म्हणूनच जाहिरा वसीमच्या निमित्ताने काही मूठभर लोकांनी वादळ उभे केले असले तरी ते पेल्यातील वादळ ठरेल. काश्मीरी मुली अशाच स्वत:च्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे येत राहतील आणि जीवनाची ही कुस्ती जिंंकल्याशिवाय राहणार नाहीत याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही.-संजय नहार(संस्थापक अध्यक्ष, सरहद)