महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा सदस्य दौऱ्यावर असला की तो ज्या गावी सूर्यास्तापूर्वी पोहोचेल, त्या गावातील सरकारी डाग बंगल्यात मांडलेल्या चौरंगावर त्याला उभे करायचे आणि तिथे हजर असलेल्या दोन-चार पोलिसांनी त्याला सलामी द्यायची, अशी एक गावंढळ पद्धत अनेक वर्षे अस्तित्वात होती. विद्यमान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी ती तर बंद केलीच पण मुख्यमंत्री या नात्याने जाता-येता आपल्याला कडक सॅल्यूट ठोकत राहण्याची गरज नाही, असेही निक्षून सांगितले. देशाच्या पारतंत्र्यातील या ‘राज’ व्यवस्थेच्या खुणा जितक्या लवकर पुसल्या जातील तितके ते बरे. पण देशातील नोकरशाही मात्र आजदेखील त्याच अवस्थेत आणि मन:स्थितीत वावरत असल्याने छत्तीसगड राज्यातील अमित कटारिया आणि के. सी. देवसेनापती या दोन तरुण कलेक्टरांना सरकारी भाषेतील ‘मेमो’चा सामना करणे भाग पडले आहे. या दोघांकडे त्या राज्यातील नक्षलग्रस्त अशा बस्तर आणि दंतेवाडा जिल्ह्यांचा कार्यभार आहे. अगदी अलीकडे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी या जिल्ह्यांचा दौरा केला तेव्हा प्रथेप्रमाणे पंतप्रधानांचे स्वागत करतेवेळी उभयतांनी बंद गळ्याचा जोधपुरी कोट घातला नव्हता आणि कटारिया यांनी तर डोळ्यावर काळा चष्मा चढविला होता व त्याद्वारे त्यांनी शिष्टाचाराचा भंग केला असा त्यांच्यावर ठपका आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा वारंवार बराक असा उल्लेख करून अनौपचारिक संबंधांवर अधिक विश्वास असणाऱ्या मोदींना कदाचित कटारिया आणि देवसेनापती यांचे वर्तन खटकलेही नसेल, पण राजापेक्षा राजनिष्ठ असणाऱ्या वा तसे भासवित राहणाऱ्या वरिष्ठ पातळीवरील बाबूंना मात्र ते खटकलेले दिसते. मुळात त्रेचाळीस अंश सेल्सिअस तपमानात बंद गळ्याचा कोट घालून व डोळे भाजून काढणाऱ्या सूर्यप्रकाशात डोळे तसेच उघडे ठेवून वावरणे वा तशी सक्ती करणे निव्वळ अमानुष. त्यातून या तरुण अधिकाऱ्यांनी ज्या राजशिष्टाचाराचा भंग केल्याचे म्हटले गेले आहे, त्यात विशिष्ट पोषाखाचा उल्लेखही नाही. एक मात्र बरे झाले, अनेक माजी सनदी अधिकाऱ्यांनी मात्र या कारवाईचा उघड निषेध केला आहे.
स्वराज से राजतक
By admin | Updated: May 18, 2015 00:38 IST