साहित्य संमेलन आणि ‘गोंधळ’ यांचे नाते बहुदा अतुट आहे. गोंधळाविना झालेली संमेलने सध्याच्या काळात दुरापास्त झाली आहेत. या वर्षी तर संमेलनाच्या स्थळापासूनच गदारोळाला सुरुवात झाली. ज्या पंजाबमध्ये संत नामदेवांनी संतविचारांचा आणि भागवत धर्माचा बहुमोल प्रसार केला, त्याच पंजाबमधील घुमान या गावाचे नाव साहित्यसंमेलनासाठी पुढे आले. संत नामदेवांचे पंजाबमधील कार्य, त्यांच्या अभंगांना गुरु ग्रंथसाहीबमध्ये मिळालेले स्थान हे सारे संदर्भ लक्षात घेता घुमानला साहित्यसंमेलन होणे हे समजून घेण्यासारखे आहे. त्याच व्यापक भूमिकेतून साहित्य महामंडळाने 'घुमानवारी'वर मान्यतेची मोहोर उमटवली. त्यानंतर घुमानविषयी, नामदेवांनी तिथे केलेल्या कार्याविषयी भरपूर माहिती समोर येऊ लागली आणि देशातील हे एक स्थान साहित्यसंमेलनासाठी किती उत्कृष्ट आहे आणि संतपरंपरेचा धागा आपण कसा पंजाबपर्यंत पुन्हा घेऊन जाऊ शकतो असा विचारही पुढे आला. तरीही 'घुमान'च्या निवडीविषयी शंका व्यक्त करणारा आणि नाराजी व्यक्त करणारा एक वर्ग होताच. त्यात अधिक भर पडली ती प्रकाशकांमुळे. सुरुवातीपासूनच घुमानला जाण्यास प्रकाशकांनी ठाम विरोध दर्शविला व घुमानवरील बहिष्कार कायम ठेवला. पुस्तके नेण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करू अशी घोषणा करणारे आयोजकही आता याविषयी बोलेनासे झाले आहेत. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी एखाद्या मुरब्बी राजकारण्याप्रमाणे नुसतीच सारवासारव केल्याचे दिसते. साहित्य सोहळ्यात विचारांचे मंथन जितके महत्त्वाचे असते तितकाच साहित्य प्रसारही मोलाचाच. पण सद्यस्थितीत तरी साहित्यप्रेमींना तिथे साहित्यकृतीच दिसणार नसल्याने 'रिक्तहस्ते' परतावे लागेल की काय अशी चिन्हे प्रकाशकांनी उगारलेल्या बहिष्काराच्या अस्त्राने निर्माण झाली आहे. प्रकाशकांची भूमिकाही आडमुठेपणाची आहे. स्वत:ला सरस्वतीचे उपासक म्हणवणारे हे प्रकाशक 'लक्ष्मी'चे दर्शन होणार नसल्याने नकार देत असतील आणि केवळ विक्री होणार नाही या व्यावसायिक व व्यावहारिक संकुचित दृष्टिकोनातून नकार देत असतील तर तोही समर्थनीय नाही. प्रकाशक संघटनेच्या भूमिकेला विरोध करून ''ही सर्व प्रकाशकांची भावना नाही, आम्ही घुमानला जाणारच'' असे जाहीर केले आहे. प्रकाशकांची भूमिका पटो किंवा न पटो परंतु साहित्यातील महत्वाचा घटकच जर यामुळे दूर जात असेल तर संमेलनासाठी ते गालबोट ठरेल. कोल्हापुरी ‘धुलाई’हिसका आणि ठसका तो कोल्हापूरीच खरा. असाच एक दणका देऊन कोल्हापूरच्या रणरागिनींनी जणू आदिशक्ती महालक्ष्मीचे रुप धारण केले. रस्त्यावर रोडरोमिओगिरी करणाऱ्या टोळक्याला महिला पोलिसांच्या पथकाने भर रस्त्यात बडवून काढले. त्यांची पुरती खोड जिरवली. पुन्हा कुठल्या चौकात उभे राहून माय-भगिनींची छेड काढण्याचे त्यांचे धाडस होणार नाही आणि अशाप्रकारच्या प्रवृत्तीही धडा घेतील. कोल्हापूरवासीयांनी घालून दिलेल्या पायंड्याचे अनुकरण करून राज्यभर रोडरोमिओंच्या मुसक्या बांधण्याची ही मोहीम हाती घ्यावी आणि गावागावातील रोडरोमिओंना जरब बसवावी. ‘बामणी’भूषण हिंदकेसरीसोलापूर जिल्ह्यातील बामणी गावचा २५ वर्षीय तरणाबांड युवक सुनील सदाशिव साळुंखे याने महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या मल्लाने देशाच्या कुस्ती क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावला. त्याने घेतलेली ही झेप निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. विशेष म्हणजे, केवळ तांत्रिक गुणावर बाजी न मारता सुनीलने प्रतिस्पर्धी मल्ल हरियाणाच्या हितेशकुमारला चितपट करून कुस्तीचा फड खऱ्या अर्थाने जिंकला आहे. त्याच्या या यशामुळे खेड्यापाड्यातील खेळाडूंना ‘सुनीलप्रमाणे आपणही यश मिळवू शकतो,’ असा आत्मविश्वास आणि प्रेरणा नक्कीच मिळेल. मात्र, महाराष्ट्राचा खेळाडू असूनही सुनील ‘हिंदकेसरी’ स्पर्धेत कर्नाटककडून का खेळला? त्याच्यावर ही वेळ का आली? यावर क्रीडाक्षेत्रातील दिग्गजांनी आत्मचिंतन करायची गरज आहे. - विजय बाविस्कर
प्रकाशकांचे बहिष्कारास्त्र
By admin | Updated: February 4, 2015 23:50 IST