अम्मांच्या (जे.जयललिता) पश्चात तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद बळकावण्याचा चिन्नम्मांचा (शशिकला) डाव सध्या तरी अडचणीत आला आहे. सारे आयुष्य अम्मांचा पदर धरून त्यांच्या मागे दासीसारख्या वावरलेल्या चिन्नम्मांच्या मनात एवढ्या जबर सत्ताकांक्षा दडल्या असतील, असे तेव्हा कुणाला वाटले नव्हते. मात्र अम्मांचा दफनविधी होताच या बाईंनी आपली नखे बाहेर काढून मुख्यमंत्रीपदावर आलेल्या पनीरसेल्वम यांना ओरबाडायला सुरुवात केली, तेव्हा त्या उघड झाल्या. अम्मांनी या चिन्नम्माला दोनदा घरातून, पक्षातून व राजदरबारातून बाहेर काढले होते. तिच्या घरातल्या कोणीही आपल्या अवतीभवती राहू वा येऊ नये असा आदेश बजावला होता.
मात्र त्या दोन्ही वेळी लाचारी पत्करून व अपमान गिळून चिन्नम्मा अम्मांचा पदर धरून पुन्हा त्यांच्या मागे उभ्या झालेल्या दिसल्या. या बाईंना राजकारण व सत्तापद यांचा जराही अनुभव नाही. मात्र अम्मांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्या शवाभोवती या चिन्नम्माचीच माणसे घेर धरून उभी असलेली देशाला दिसली. मुख्यमंत्री पनीरसेल्वमच त्यांच्यानंतरच्या वा खालच्या रांगेत उभे असल्याचे तेव्हा देशाने पाहिले. अम्मांच्या खऱ्या वारसदार आपणच असल्याच्या चिन्नम्माच्या नाटकाला तेव्हाच खरी सुरूवात झाली. नेमक्या त्याच सुमाराला तामिळनाडूच्या समुद्रतटावर उभ्या असलेल्या जहाजांमधून तेल गळती सुरू झाली आणि तिच्या बंदोबस्तासाठी पनीरसेल्वम त्या बाजूला गेले. त्यांच्या पश्चात चिन्नम्माने आपला राजकीय पट आखून तो अंमलात आणायला सुरुवात केली.
त्यासाठी पक्षाचे मंत्री व आमदार फितविले.पनीरसेल्वम यांच्यावर नाराज असणाऱ्या नेत्यांना त्यांच्यावर टीकास्र सोडायला लावले आणि मुख्यमंत्र्यांना पत्ताही लागू न देता रविवारी विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली. त्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवर मुख्यमंत्र्यांच्या निवडीचा विषय नव्हता. तो ऐनवेळी पुढे करून चिन्नम्मांनी त्या पदावर स्वत:ची निवड करून घेतली व ती जाहीर केली. पनीरसेल्वम यांनी आपली भूमिका चिन्नम्मांना ऐकविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जरब देऊन थांबविले गेले. पक्षाची शिस्त सांभाळून गप्प राहा आणि राजीनामा द्या, असेही त्यांना ऐकविले गेले. आपला राजीनामा जबरदस्तीने व सभोवती भयाचे वातावरण उभे करून घेतला गेला, असे आता त्यांनी जाहीर केले आहे. तसे करण्याआधी पनीरसेल्वम यांनी त्यांचे दैवत असलेल्या अम्मांच्या समाधीसमोर ४० मिनिटांची मौन धारणा केली. ‘अम्मांची खरी इच्छा त्यांच्या पश्चात मी मुख्यमंत्री व्हावे अशीच होती’ ही बाब त्यानंतर त्यांनी जाहीर केली.
याआधी अम्मांनी दोन वेळा त्यांचे पद सोडले तेव्हा ते त्यांनी पनीरसेल्वम यांच्याकडेच सोपविले होते हे येथे महत्त्वाचे आहे. थोडक्यात महाराणीच्या मृत्यूनंतर त्यांच्या दासीने कावा करून त्यांची गादी बळकावी, असाच प्रकार चिन्नम्मांनी केला आहे. त्यांचे कारस्थान उघड झाल्यानंतर अण्णा द्रमुक त्यांच्याविषयी कोणता निर्णय घेतो हे लवकरच दिसेल. घटनात्मक विचार केला तर हा प्रश्न अण्णा द्रमुकच्या विधीमंडळ पक्षालाच निकालात काढावा लागणार आहे. पनीरसेल्वम यांच्या ताज्या वक्तव्यावर चिन्नम्मांनी केलेले भाष्यही त्यांच्या आतापर्यंतच्या हालचालींना शोभणारेच आहे. सेल्वम यांच्या मागे द्रमुकचा हात असल्याचे व सेल्वम यांनी द्रमुकच्या पाठिंब्यामुळेच आताचा पवित्रा घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. पनीरसेल्वम हे अम्मांचे एकनिष्ठ व स्वच्छ राहिलेले अनुयायी आहेत. याउलट चिन्नम्माने अम्मांच्या आड दडत आपली संपत्ती अनेक पटींनी वाढवून घेतली आहे. अम्मांच्या वाढीवर संपत्तीविषयीचा वाद न्यायासनासमोर आहे. या वादात चिन्नम्माही एक सहयोगी म्हणून जोडीला आहेत.
न्यायालयाचा निर्णय येत्या १५ दिवसांत लागेल, हे दिसत असतानाही चिन्नम्माने मुख्यमंत्रीपदासाठी केलेली घाई त्यांना असलेल्या न्यायालयाविषयीच्या धास्तीपोटीच झाली असणार हे उघड आहे. चिन्नम्माची ही घिसाडघाई केंद्रालाही फारशी आवडली नसावी, अशी चिन्हे दिसत आहेत. तामिळनाडूच्या राज्यपालांनी मुंबईकडे नेमक्या याचवेळी घेतलेली धाव चिन्नम्माला काही काळ थोपवून धरण्यासाठीच असावी, असे जाणकारांच्या वर्तुळात म्हटले जाते.. थोडक्यात अण्णा द्रमुकच्या विधिमंडळ पक्षाला पनीरसेल्वम व चिन्नम्मा यातून एकाची नेतेपदी निवड करणे आता गरजेचे आहे. तामिळनाडूचे राजकारण साधे नाही. त्यात शांतपणे मतदानही सामान्यपणे होत नाही. हाणामाऱ्या व हमरीतुमरी असे सारे घडूनच ते पूर्ण होत असते वा अपुरे राहत असते. त्यातून द्रमुक राज्यातील विरोधी पक्ष अतिशय प्रबळ आहे.
तो या भांडणात कोणती भूमिका घेतो, हे पाहणेही आता महत्त्वाचे झाले आहे. राजकारण ही तशीही सरळ रेषेत चालणारी बाब नाही. तिच्या निकटस्थांनाच तिचे चालणे कळत असते. चिन्नम्मा त्या अर्थाने राजकारणाच्या मध्यवर्ती स्थानाजवळ होत्या. मात्र ते स्थानच त्या ताब्यात आणतील आणि त्यासाठी एवढे राजकारण अल्पावधीत उभे करतील, असे कोणाला वाटले नव्हते. आताच्या पनीरसेल्वम यांच्या उठावामुळे त्यांच्या शपथविधीवरच संशयाचे सावट आले आहे. शिवाय अम्मांच्या पश्चात त्यांचा पक्ष संघटित राहतो की नाही हाही प्रश्न आहेच.