-किशोर पाठकसूर्ये अधिष्ठीली प्राची जगा राणीव दे प्रकाशाचीतैसी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी सूर्याने प्राचीला अधिष्ठान दिलं म्हणून जगाला प्रकाशाचं वैभव लाभलं तसं श्रोत्यांनी ज्ञानाची संपदा उधळली की तीच त्यांची दिवाळी. श्रोता हा तेव्हाच अर्थपूर्ण होतो जेव्हा तो ज्ञानात अवगाहन करून आनंदात परिवर्तीत होतो. पण मुळात आपण ऐकत नाही. ऐकणे आणि श्रवण करणे यात फरक आहे. श्रवणात श्रुतींचा संबंध आहे.आज दिवाळीच्या पवित्र दिनी काय नवीन संकल्प करावयाचे ते ठरवले असेलच. पण झेपतील, करता येतील असेच संकल्प करा नाही तर आला पाडवा केला आडवा असे व्हायचे. बरेच जण बरेच काही ठरवीत असतात, पण ठरविणे आणि घडणे यात निश्चयाची अटळ रेषा असते. ती पुसट झाली की ठरविले जाते, पण ते घडत नाही.आजचा प्रमुख प्रश्न संवादाचा आहे. किमान संवादाचा नंतर सुसंवादाचा. तसे पाहिले तर माणूस मूलत: वाईट, भ्रष्ट, लोभी, संतापी, क्रूर वगैरे नसतोच. मूल जन्मताना कुठलेच गुण उधळीत नाही. त्याला समाज सांगत राहतो हे असे असते म्हणून तू असे कर. मग त्याला जात, धर्म, परंपरा, संस्कार चिकटविले जातात म्हणून या कोवळ्या गोळ्यावर काय संस्कार होतील त्यावर त्याचे भविष्य अवलंबून. आपण थोर व्यक्तींचे दाखले देताना त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या आईवडिलांचे, गुरुजनांचे आवर्जून उल्लेख करतो. एखादा सन्मार्गी असला किंवा कुमार्गी असला तरी त्याच्या खानदानाची चौकशी होते. माणूस एकाच वेळी प्रचंड संवेदनशील आणि बधिर दोन्ही असतो. कुठला काळ जास्त त्यावर त्याचे भवितव्य आकार घेते. म्हणूनच अशा सणासुदीला चांगले होण्याचे उपदेश हमखास मिळतात.अगदी पाच वर्षांचं मूल असेल वा पंचाहत्तरीचा वृद्ध प्रत्येकाला दिवाळीची पणती वेगळीच वाटते. लहान मूल ते कुतुहलाने, गंमतीने पाहते, वातीचा चटका बसतो हेही त्याला फारसे माहीत नसते, पण वयोवृद्ध माणूस पणतीकडे पाहताना त्याला आयुष्यातील कितीतरी त्या ज्योतीशी निगडीत असलेले प्रसंग आठवतात. सुखाचे, दु:खाचे, आधाराचे, एकटेपणाचे, वैराग्याचे, प्रेमाचे... पाडवा या सर्वांना सामावून घेतो. आजच्या या दिवाळीच्या शुभदिनी आहे ती नाती घट्ट जपण्याचे ठरवू या. झाला तेवढा ताटातुटीचा अनुभव खूप झाला. निदान माणूस म्हणून एकत्र येऊ या. विसरू या जो कुठून आला त्याचे मूळ काय, कूळ काय, ही धूळ खाली बसायलाच हवी. ठरवून एकमेकांच्या सुखदु:खांचा सन्मान करायला शिकूया हे वारंवार सांगण्याची, बोलण्याची गरज आहे. कारण विस्मृती हा माणसाला शाप आणि वरदानही आहे. शाप चांगले विसरतो हा आणि वरदानात नको तो गाळ जपतो आपण ! हे झाडूनपुसून साफ करायला हवे. असा पाडवा त्यातच गोडवा !
पाडवा
By admin | Updated: October 31, 2016 06:52 IST