अयाझ मेमन, (संपादकीय सल्लागार)प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे यंदाची आयपीएल स्पर्धा यशस्वी ठरते की नाही, ही भीती गुंडाळून या स्पर्धेने यशस्वीतीकडे वाटचाल सुरू केली आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याने दर्शकांचा उच्चांक नोंदवला आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी वैयक्तिक आणि सांघिकपणे चमकदार कामगिरी केली आहे. पण, या आनंद सोहळ्याचा गालबोट लागले आहे, ते खराब पंचगिरीचे. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक चुकीचे निर्णय दिले गेले. जवळपास प्रत्येक सामन्यात एक किंबहुना एखाद्या सामन्यात दोनपेक्षा अधिक चुकीचे निर्णय झाल्याने चाहते, खेळाडू निराश तर आहेतच, शिवाय क्रिकेटच्या भवितव्याच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय ठरू शकतो. काही निर्णय तर अवमानकारक ठरावेत, असे आहेत. एका सामन्यात पंचांनी क्षेत्ररक्षकांचे अपील उचलून धरले. उदाहरण पहायचे झाल्यास, पंचांच्या निर्णयामुळे फलंदाज तंबूकडे परत जात असताना पंचांनीच आपल्या निर्णयाची तिसऱ्या पंचाकडे समीक्षा करण्याची मागणी केली. जर पंचांना पहिल्यांदा शंका वाटत होती तर फलंदाजाला बाद दिलेच कसे, असा प्रश्न चाहत्यांना पडू शकतो.या गोष्टीवर सध्या खेळाडू, संघ व्यवस्थापन यापैकी कोणीच उघड बोलत नसले तरी पडद्यामागे बरीच खदखद आहे. दोन संघमालकांनी खासगीत पंचगिरीच्या खराब दर्जाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. काही खेळाडू तर याच्याविरोधात सावधपणे चर्चा करीत असले तरी चिंताग्रस्त आहेत. अजूनही उघडपणे कोणी याला वाचा फोडलेली नाही. खेळाडू आणि संघमालकांची निराशा समजण्यासारखी आहे. आयपीएलसारख्या स्पर्धेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे, त्यामुळे तेथे उच्च दर्जाचा खेळ अपेक्षित आहे. फ्रॅन्चाईजींनी संघ खरेदी करण्यासाठी, खेळाडू निवडण्यासाठी प्रचंड पैसा ओतला आहे. कारण स्पर्धेत जगभरातील क्रिकेटची प्रतिभा या स्पर्धेत दाखवली जाते. या स्पर्धेतून एखाद्या खेळाडूचे करिअर घडवू किंवा बिघडवू शकते. इतक्या मोठ्या टप्प्यावर ही स्पर्धा येऊन पोहचली आहे. परंतु पंचांच्या चुका या सहजासहजी होत नाहीत, हे समजून घेण्याची गरज आहे. आयपीएल ही स्पर्धा खेळाडू आणि पंचांसाठीसुद्धा मोठ्या दबावाची स्पर्धा आहे. ट्वेंटी-२० क्रिकेट हे जसे बेधडकपणे खेळले जाते, तसे प्रेक्षकही बिनधास्तपणे आनंद घेत असतात. प्रेक्षकांचा आवाज, शिट्या, बाज्या, मैदानावरील म्युझिक सिस्टिम यामुळे भल्या भल्यांच्या एकाग्रतेचा कस लागू शकतो. मानवी चुका या अरिहार्य असल्या तरी क्रिकेटसारख्या खेळात, जेथे पंचांचा प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप अनिवार्य असतो, अशा ठिकाणी या चुकांची शक्यता कमीत कमी असायला हवी. स्पर्धेचे प्रशासन सांभाळणाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष्य द्यायला हवे. हे टाळण्यासाठी सध्या सर्वात जवळचा मार्ग म्हणजे पंच समीक्षा प्रणाली अर्थात ‘डीआरएस’चा वापर. परंतु सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच ट्वेंटी-२० प्रकारात ‘डीआरएस’ला बाजूला ठेवण्यात आले असल्याने जगभरातील लीगमध्येही याचा उपयोग केला जात नाही. ही दोन कारणे असावीत, पहिले म्हणजे वेळेची उपलब्धता आणि दुसरे आर्थिक गणित. पण सध्या क्रिकेटच्या या छोट्या प्रकारातही ‘डीआरएस’चा वापर करणाची वेळ आता आली आहे. क्रिकेटमध्ये सध्या प्रचंड स्पर्धा असल्याने केवळ आर्थिक सबब सांगून ही गोष्ट टाळता येणार नाही, कारण ‘अशी’ पंचगिरी खेळात असंतुलन निर्माण करीत आहे. ज्या देशाची आर्थिक परिस्थिती सक्षम नाही, तेथेही आयसीसी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यासाठी तटस्थ पंच नेमणे बंधनकारक करतेच ना? मग त्याप्रमाणेच ‘डीआरएस’सुद्धा अनिवार्य करावे असे मला वाटते. सर्व जगाने ‘डीआरएस’चा अवलंब केला तरी बीसीसीआयने त्याला अगदी कालपरवापर्यंत विरोध केला होता. पण आता बीसीसीआयनेही याचे महत्त्व मान्य करून नुकत्याच झालेल्या मालिकेत ‘डीआरएस’चा वापर करण्यास मान्यता दिली. तत्पूर्वी, भारताची सहमती असेल त्याच मालिकेत ‘डीआरएस’चा वापर केला जात होता. हे म्हणजे असे होते की, टेनिसमध्ये फेडरर-नदाल यांच्यातील सामन्यात व्होक-आय तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल; पण फेडरर-जोकाविच यांच्यातील सामन्यात होणार नाही. ‘डीआरएस’चे तंत्रज्ञान हे शंभर टक्के परिपूर्ण नसले तरी ते मानवी डोळे सहजपणे शोधू शकणार नाहीत अशा किरकोळ चुकांमध्ये दुरुस्तीची संधी देतात. अधिक महत्त्वाचे म्हणजे यामुळे खेळाडूंना फायदा झाला आहे. शिवाय चाहत्यांच्या आनंदातही भर घातली आहे. सुदैवाने, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या फेब्रुवारीत झालेल्या बैठकीत डीआरएसचा वापर क्रिकेटच्या सर्व प्रकारात करण्याला सर्वांची तत्त्वत: सहमती मिळाली आहे. याची सुरवात कदाचित आॅक्टोबर महिन्यापासून होईल. तसे झाले तर पुढच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये ‘डीआरएस’ हा या स्पर्धेचा अविभाज्य घटक असेल.. अनंत काळासाठी..!
ट्वेंटी-२0 मध्येही आता हवाय ‘डीआरएस’चा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 01:32 IST