केन्द्रामध्ये आलेल्या नव्या सरकारने महत्त्वाकांक्षी म्हणून जे काही प्रकल्प हाती घेतले आहेत, त्यातील ‘स्वच्छ भारत’ या प्रकल्पाची रास्त व्याख्या राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केली आहे आणि तीदेखील महात्मा गांधी यांचा आधार घेऊन. गांधीजींच्या व्याख्येतील स्वच्छतेमध्ये केवळ वातावरणीय आणि भोवतालीय स्वच्छतेचाच समावेश नसून मनाच्या स्वच्छतेचाही त्यात समावेश होतो, असे त्यांनी म्हटले आहे. भोवतालचे वातावरण स्वच्छ करतानाच मनदेखील स्वच्छ केले पाहिजे आणि या मनाला शांतता, सौहार्द आणि भ्रातृभावाची शिकवण देणे तितकेच अगत्याचे असले पाहिजे असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. गुजरात विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना बापूंच्या राज्यात जाऊन तिथेच त्यांनी हा उपदेश करण्याला एक वेगळे महत्व आहे. मोदी सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात साराच देश आज सहभागी झाला आहे. कुठेच काहीही घडत नसताना आज कुठेतरी काहीतरी नक्कीच घडते आहे. एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात हे काम चुटकीसरशी होण्यासारखे नाही, हे कोणीही समजू शकते. परंतु प्रयत्न होत राहणे महत्वाचे. पण राष्ट्रपतींचा रोख वेगळाच आहे. विद्यमान पंतप्रधान मूळ गुजरातचे आणि त्या राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले. महात्मा गांधीदेखील त्याच राज्याचे. परंतु आज मोदींच्या नावावर निवडून आलेले आणि त्यांच्या सत्तेत असण्याने चेकाळलेले अनेकजण आपल्या अस्वच्छ मनाचे दर्शन वारंवार घडवीत आहेत. समाजातील सलोखा बिघडविण्याचे काम नेटाने करीत आहेत. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांनी त्यांचे सारे आयुष्य समाजातील सलोखा अबाधित राहण्यासाठीच खर्च केले, असे राष्ट्रपतींनी सांगणे याला वेगळे महत्व आहे. आपण एका विद्यापीठाच्या समारंभात बोलत आहोत याची विशेष नोंद घेताना, विद्यापीठ आणि अन्य शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या मनात अहिंसेचे व परस्पर सामंंजस्याचे संस्कार केले पाहिजेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज संपूर्ण देशातील समाजजीवन एकप्रकारे विषयुक्त झाल्यासारखे असल्याने त्यावर कोणीतरी स्पष्टपणाने बोलणे गरजेचेच होते. राष्ट्रपती मुखर्जी यांनी ही गरज पूर्ण केली आहे.
नाही निर्मळ मन...
By admin | Updated: December 2, 2015 03:40 IST