- कुलदीप नय्यर, वरिष्ठ पत्रकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कमी होत आहे असे दिसते. त्यांच्या भारतीय जनता पक्षाने चार राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये मार खाल्ला. पंजाब, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि बिहार या राज्यांतील १८ जागांपैकी फक्त सात जागांवर भाजपा जिंकू शकला. अवघ्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने सार्यांच्या चिंधड्या उडवल्या होत्या. लोकसभेत त्याने स्वबळावर बहुमत कमावले होते. भाजपाला डोक्यावर घेणारे मतदार अवघ्या चार महिन्यांत कसे बदलले? मतदारांचा मोहभंग का झाला याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. पूर्ण करायला कठीण अशी ढीगभर आश्वासने भाजपाने दिली होती हे खरे आहे. पण वेिषणाचा हा एक भाग झाला. पूर्ण वेिषण हे आहे की, दिलेली आश्वासने पूर्ण करता येतील की नाही याचा कुठलाही विचार केला गेला नाही.
निवडणुका आल्या की, मोठमोठी आश्वासने द्यायची, सत्ता मिळाली तर त्यातली थोडीफार पूर्ण करायची. एवढी वर्षे हेच चालत आले. राजकीय पक्षांना निवडणुका जिंकायच्या असतात. त्यासाठी ते वाट्टेल ते करतात. लोकांपुढे सत्य येते तोपर्यंत सारा खेळ संपलेला असतो. चांगल्या कारभाराच्या आशेने मतदार दुसर्या पक्षाला संधी देतात. त्यांच्या परीक्षेत पास होत नाही त्या पक्षांना मतदार फेकूनही देतात.
राजकीय पक्षांनी आपली चकाकी घालवली, हेही पोटनिवडणुकांनी दाखवून दिले. लोकसभा जिंकणार्या भाजपाला पुन्हा जमिनीवर आणले. दोष पक्षांचा आहे. धडा शिकायची त्यांची तयारी नाही. एकापाठोपाठ एक निवडणुकांमध्ये मतदारांचा मोहभंग स्पष्ट झळकतो आहे. विद्यमान व्यवस्था मतदारांना आकर्षित करीत नाही हे उघड आहे. लालुप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, नितीशकुमार यांचा जनता दल युनायटेड आणि काँग्रेस यांची नवी आघाडी या पोटनिवडणुकीत दिसली. भाजपा आणि या नव्या आघाडीसाठी ही पोटनिवडणूक एका अर्थाने अग्निपरीक्षाच होती. धर्मनिरपेक्षतेचा दावा करणार्या पक्षांची ही आघाडी होती. लोकसभा जिंकल्याने मनोबल वाढलेल्या भाजपाशी दोन हात करून या धर्मनिरपेक्ष आघाडीने मोठा डाव खेळला. पोटनिवडणुकांचे निकाल खास करून काँग्रेसचे मनोबल वाढवायला मदतीचे ठरणार आहेत. दुसर्या बाजूला भाजपाच्या छावणीत निराशेचे वातावरण आहे. भाजपाला एवढय़ा खराब कामगिरीची अपेक्षा नव्हती. भाजपाच्या नेत्यांनी मोठय़ा धडाडीने हा पराभव स्वीकारला. पण असल्या निकालांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर भाजपाला ठोस रणनीती आखावी लागेल. कारण आता वेळ कमी आहे. लगेच उत्तर प्रदेशमध्ये ११ जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत. त्यानंतर लागोपाठ चार राज्यांच्या निवडणुका आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासाठी उत्तर प्रदेशचे निकाल महत्त्वाचे राहणार आहेत. शहांनी आल्या आल्या बरेच बदल केले आहेत. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांसारख्या वयोवृद्ध नेत्यांना घरी बसवले आहे. ‘आपल्याला अकराच्या अकरा जागा जिंकायच्या आहेत’ असे शहांनी म्हटले आहे. ते आवश्यकही आहे. कारण उत्तर प्रदेशच्या निवडणुका २0१७ मध्ये आहेत. त्याआधीचे हे एक मोठे शक्तिप्रदर्शन असेल. सेमिफायनल म्हणा ना. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सोप्या नाहीत. घाम काढतील. कारण या वेळी तिरंगी सामने होणार आहेत. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. शहांची कसोटी लागणार आहे. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या ८0 पैकी ७0 जागा जिंकून दिल्याने शहांना पक्षाचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले. आता त्यांना पुन्हा एकदा चमत्कार दाखवावा लागणार आहे. त्यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. मध्य प्रदेशातील पोटनिवडणुका गमावल्याने शहा आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण या दोघांसाठी धोक्याची घंटा आहे. पक्षाचे धोरणात्मक निर्णय करणार्या सर्वोच्च मंडळात शिवराज यांना नुकतेच घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या राज्यात निवडणूक हरणे हा त्यांना मोठा झटका आहे. लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील एकूण २९ जागांपैकी फक्त दोन जागा काँग्रेस जिंकू शकली होती. या पार्श्वभूमीवर हा पराभव भाजपाला अधिक बोचणारा आहे. बिहारमध्ये लालू-नितीश आघाडीचा विजय या दोघा नेत्यांसाठी संजीवनीसारखा आहे. लोकसभा निवडणुकीत या दोघांच्याही पक्षांना दणकून पराभव पाहावा लागला. त्यानंतर त्यांनी खेळलेला हा राजकीय जुगार फायद्याचा ठरला. बिहारमध्ये जातीच्या राजकारणाला महत्त्व आहे. जातीचे गणित या दोघांनाही चांगले अवगत आहे. सोबत मिळून लढलो तरच काही धडगत आहे, हे या नेत्यांनी ओळखले होते. हा प्रयोग मोठा साहसाचा होता. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपाविरोधी सर्व पक्ष एकत्र येण्याची शक्यता या प्रयोगामुळे वाढली आहे. उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकांसाठी बिहारचा प्रयोग रंगवण्याचा प्रयत्न झाला. समाजवादी पक्षाचे सुप्रिमो मुलायमसिंह यांनी दिलेली ऑफर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी फेटाळून लावली; पण भविष्यात हे दोघे एकत्र येणारच नाहीत असे नाही. राजकारणात काहीही होऊ शकते. आत्मविश्वास बळावला तर मायावती मैत्रीचा हात पुढे करू शकतात. एक गोष्ट स्पष्ट आहे. या पोटनिवडणुकांनी भाजपाविरोधी नेत्यांची हिंमत वाढवली आहे. लालू-नितीशकुमार यांसारखे अनेक प्रयोग भविष्यात होऊ शकतात. धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आल्याने हे शक्य झाले, असे मार्क्सवादी नेते प्रकाश करात यांनी म्हटले आहे. भाजपाशी लढण्यासाठी समविचारी पक्षांसोबत बसायला करात यांचा पक्ष तयार आहे. काँग्रेससोबत जाण्यामध्ये माकपाच्या काही अडचणी आहेत. काहीही असो, एक गोष्ट आहे. या पोटनिवडणुकांनी सार्या राजकीय पक्षांना एक धडा शिकवला. मतदारांना पर्याय हवा आहे. लोकांना एक धर्मनिरपेक्ष आणि लोकतांत्रिक शासन पाहिजे.