शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

संयत राष्ट्रभावाचे दर्शन घडविण्याची गरज

By admin | Updated: October 1, 2016 02:16 IST

उरीच्या सैन्य तळावर १८ सप्टेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर वैश्विक स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडण्याचे व त्याच्यावर दबाव वाढवण्याचे प्रयत्न सरकारने चालवलेच होते

- सुरेश भटेवरा(राजकीय संपादक, लोकमत)

उरीच्या सैन्य तळावर १८ सप्टेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर वैश्विक स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडण्याचे व त्याच्यावर दबाव वाढवण्याचे प्रयत्न सरकारने चालवलेच होते, पण देशभर खदखदणारा असंतोष अशा प्रयत्नातून शांत होणार नाही, याचा अंदाज सरकारला होता. दहा दिवसात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला अनेक इशारे दिले. कोझिकाडच्या जाहीर सभेत ते म्हणाले, ‘भारत कमजोर नाही, उरीच्या सैन्य तळावरील १८ जवानांच्या प्राणांचे बलिदान वाया जाणार नाही’. आकाशवाणीवरील ‘मन की बात’ प्रसारणात पंतप्रधान म्हणाले, ‘सैन्यदल बोलत नाही, पराक्रम करून दाखवते’. पाणी वाटपाबाबत सिंधू कराराच्या पुनर्विलोकन बैठकीनंतर ते म्हणाले, ‘एकाच वेळी रक्त व पाणी बरोबर वाहू शकत नाही’. संयुक्त राष्ट्र संघाच्या ७१ व्या संमेलनात, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी उरी व पठाणकोटच्या हल्ल्याचा उल्लेख करीत, दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानच्या धोरणावर कडाडून हल्ला चढवला. १९ वे सार्क संमेलन येत्या नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानात भरणार होते. भारत, अफगाणिस्तान, भूतान, बांगला देश अशा आठपैकी चार देशांनी या संमेलनात भाग घेण्यास स्पष्टपणे नकार दिला. अखेर हे संमेलन बारगळले. सैन्य कारवाईचे महासंचालक रणवीर सिंग यांनी दरम्यान स्पष्ट शब्दात इशारा दिला की, ‘भारतीय सैन्यदल उरी हल्ल्याचे जरूर प्रत्युत्तर देईल, मात्र केव्हा, कसे आणि कुठे ते आम्ही ठरवू’. या साऱ्या घटना भारताचा लवकरच कोणती तरी गंभीर कारवाई करण्याचा इरादा आहे, याच्या निदर्शक होत्या. बुधवारी मध्यरात्री अखेर भारताच्या सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेच्या पलीकडे घुसून पाच तासांच्या अवधीत ३८ पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार केले. त्यांच्या आठ छावण्याही उद्ध्वस्त केल्या. ‘सर्जिकल स्ट्राईक’असे या कारवाईला संबोधण्यात आले. या कारवाईत पाकिस्तानचे दोन जवान ठार व नऊ जखमी झाले, याची कबुली पंतप्रधान नवाझ शरीफांनी दिली. भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्याचा मात्र त्यांनी साफ इन्कार केला. सीमेवर नेहमी घडणाऱ्या गोळीबाराचीच ही घटना आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तानी नेतृत्व व सैन्य दलाने स्वत:च्या बचावासाठी दिलेली ही प्रतिक्रिया आहे, असे मानले तरी आपल्या सैन्य दलाने अपूर्व धाडसाने या कारवाईत गाजवलेले शौर्य आणि पराक्रमाचे महत्व कमी होत नाही. १९७१ च्या युध्दानंतर प्रथमच भारतीय सैन्य दलाने नियंत्रण रेषा ओलांडली. आक्रमक दहशतवादी हल्ले चढवणाऱ्या पाकिस्तानला एक जोरदार झटका दिला, ही बाब निश्चितच गौरवास पात्र आहे. म्हणूनच सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेससह देशातल्या प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी सैन्य दलाचे अभिनंदन केले आणि देशाच्या संरक्षणासाठी सरकारने घेतलेल्या तमाम निर्णयांना पाठिंबा दिला.चार युध्दात सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानने वेळोवेळी भारतात दहशतवादी घुसवले. संसदेसह ठिकठिकाणी हल्ले चढवून ‘प्रॉक्सी वॉर’चा धोरणात्मक आश्रय घेतला. ९0 च्या दशकापासून असे अनेक हल्ले भारताने सहन केले. तरीही प्रतिहल्ल्याचा मार्ग कधी पत्करला नाही. देशाच्या प्रत्येक नेतृत्वाने व आपल्या सैन्य दलाने कायम संयम पाळला. या सर्वांची ही काही कमजोरी नव्हती. आपल्या सैन्य दलात पाकिस्तानला त्याची जागा दाखवण्याची क्षमता कायमच होती. उरीच्या हल्ल्यानंतर मात्र देशभर संतापाच्या लाटा उसळत होत्या. आता खूप झाले. पाणी डोक्यावरून वाहून चालले आहे. केवळ इशारे देउन काम भागणार नाही, अशी संतापदग्ध प्रतिक्रिया जनमानसात उमटू लागली. अशा वेळी सरकार असो की सैन्यदल, संयम तरी किती पाळणार? त्यालाही काही मर्यादा आहेतच. पाकव्याप्त काश्मारात सैन्य दलाने किती दहशतवादी मारले, किती छावण्या उद्ध्वस्त केल्या, हा तपशील तितकासा महत्वाचा नाही. प्रतिपक्षाला अद्दल घडवणे गरजेचे होते. सांबा, कठुआ, गुरूदासपूर, पठाणकोट आणि उरी येथे आपल्या सैन्य तळांवर हल्ले चढवण्याचे जे दु:साहस पाकिस्तानने केले, त्याची पुनरावृत्ती करण्यापूर्वी यापुढे त्याला शंभरदा विचार करावा लागेल. जागतिक स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडण्याची भारताची कूटनीतीही बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे चित्र दिसते आहे. दक्षिण आशियातच नव्हे तर जगातल्या प्रमुख देशांच्या बदलत्या भूमिकेतूनही याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला ‘आपल्या मर्यादा सांभाळा, भारताशी असलेले मतभेद कूटनीतीच्या माध्यमातून मिटवा’, असा थेट इशारा दिला. अमेरिकेच्या ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या अग्रगण्य वृत्तपत्राने तर पाकिस्तानला कडक शब्दात सुनावले की ‘भारताच्या संयमाची अधिक परीक्षा पाहू नका, अन्यथा जगाच्या पाठीवर एक अस्पृश्य देश बनण्याच्या दिशेने तुमचे ते पहिले पाऊ ल ठरेल’ चीन सरकारची अधिकृत भूमिका स्पष्ट करताना सरकारी प्रवक्ते गेंग शुआंग यांनीही ‘पाकिस्तानच्या काश्मीरविषयक भूमिकेचे चीन समर्थन करीत नाही, भारत पाक दरम्यान युध्द झाले तर पाकिस्तानला चीन मदत करणार नाही, उभय देशांनी चर्चेतून काश्मीर समस्या सोडवावी’ असे बजावले. जगातले अन्य प्रमुख देशही पाकिस्तानकडे संशयी नजरेनेच पाहातात. सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईनंतर म्हणूनच जगातल्या कोणत्याही देशाने भारताच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. थोडक्यात दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या आरोपामुळे पाकिस्तान जगात दशदिशांनी घेरला गेला आहे. उरीच्या सैन्य तळावरील दहशतवादी हल्ल्यात आपले १८ जवान शहीद झाल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत नेमके काय करणार, याचे उत्तर भारतीय सैन्य दलाने ठोस कारवाई करून नुकतेच दिले आहे. ते जेथून दिले तो काश्मीरचा भूभाग पाकच्या नियंत्रणाखाली असला तरी भारताचा तो अविभाज्य भाग असल्याने आपल्या सैन्य दलाने पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला कोणतेही थेट आव्हान दिलेले नाही. भारताचा पुन्हा अशी कारवाई करण्याचा लगेच कोणताही इरादा नाही, असेही सैन्य दल कारवाईचे महासंचालक रणवीरसिंग यांनी स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर त्याची रीतसर कल्पनाही समकक्ष पाकिस्तानी अधिकाऱ्यांना दिली आहे. तरीही पाकिस्तानचे सैन्यदल, आयएसआय, सरकार आणि त्या देशाच्या अभयारण्यात मुक्तपणे वावरणाऱ्या दहशतवाद्यांमधे माथेफिरूंची कमतरता नाही. ते सारे गप्प बसतील, असा विचार म्हणूनच धोकादायक आहे. प्रत्येक स्तरावर यापुढे कमालीची सावधगिरी बाळगावी लागेल. भारताच्या संरक्षण सिध्दतेत भर घालण्याचे अनेक प्रयोग केंद्र सरकारने चालवले आहेत. तरीही पाकिस्तान आजवर आपल्या सैन्य तळांवर हल्ले चढवण्यात ज्या प्रकारे यशस्वी ठरला, त्यात आपल्याच अज्ञात घरभेद्यांचे सहकार्य त्याने नक्कीच मिळवले असणार. भारताच्या दृष्टीने ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. पराक्रमानंतर संयत राष्ट्रभावाचे दर्शन, ही भारताची आजवरची परंपरा. संयम हे कमजोरीचे लक्षण नव्हे तर जगात भारताची प्रतिष्ठा या गुणवत्तेमुळेच टिकली आहे. यशस्वी कारवाईबद्दल सैन्य दलाचे अभिनंदन करताना, म्हणूनच अतिउत्साहाचे प्रदर्शन नको, ते देशाला परवडणारे नाही.