शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
3
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
4
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
5
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
6
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
7
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
8
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
9
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
10
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
11
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
12
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
13
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
14
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
15
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
16
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
17
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
18
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
19
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
20
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या

आधुनिक ‘विज्ञान’ सामान्यांना तुच्छ मानते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2023 08:07 IST

नवीन पुरावा समोर आल्यावरच आपले मत बदलू शकते, या वैज्ञानिक वृत्तीवर हल्ला करणारे तीन गट तयार झालेले आहेत. त्यापासून सावध राहिले पाहिजे!

डॉ. अतिश दाभोलकर, संचालक, इंटरनॅशनल सेंटर फॉर थिऑरॉटिकल फिजिक्स, इटली

शब्दांकन : राहुल विद्या माने

युरोपमधील प्रबोधन काळाने विज्ञानाच्या मार्गाने ज्ञान संपादन, ज्ञानाची उपासना आणि त्यामार्गाने आपण वैश्विक किंवा सार्वकालिक सत्य शोधू शकतो असा विश्वास दिला. धर्म आणि राजकारण यांची फारकत करणे, पोथीनिष्ठपणा सोडून देणे, व्यक्तीचे स्वातंत्र्य व त्यावर आधारित लोकशाही व्यवस्थांची उभारणी  या सर्व गोष्टी युरोपमधील प्रबोधन काळात साध्य झाल्या. हे सारे बदल आपल्याकडे झाल्याशिवाय ही प्रबोधन मूल्ये आपण साध्य करू शकणार नाही.

विज्ञानाची तत्त्वे एवढी सोपी, स्वाभाविक आहेत की जेवढा पुरावा तेवढा विश्वास ठेवायला पाहिजे; पण लोकांना याप्रमाणे वागणे अवघड जाते. याची उदाहरणे आपण कोविडकाळात पाहिली. प्रारंभी लसीबद्दल लोकांना खात्री नव्हती; पण जसजसे पुरावे उपलब्ध होत गेले, तसतसा औषधांवरचा विश्वास आणि वापर वाढत गेला.   

नवीन पुरावा समोर आल्यावरच आपले  मत बदलू शकते. या वैज्ञानिक वृत्तीवर (scientific temper) हल्ला करणारे तीन गट सध्या तयार झालेले आहेत. तुम्ही युरोप -अमेरिकेतील विद्यापीठात गेलात, तर उत्तर-आधुनिकतावाद विचारसरणी  असे मानते की विज्ञानाच्या संकल्पना  “सामाजिकदृष्ट्या निर्मित” आहेत. १९८० च्या काळात नवगांधीवादी विचारसरणीच्या लोकांनी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काही संशोधकांनी Statement on Scientific Temper हे एक निवेदन प्रसिद्ध केले होते. भारताच्या घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन  मानवतावादी असल्याचे सांगितले आहे; पण १९८० च्या दशकात आशिष नंदी यांच्यासारख्या काही तत्त्वज्ञ व्यक्तींनी मांडले की वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावादी नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये सामान्य माणसाबद्दल एक अर्वाच्य असा तुच्छतेचा भाव असतो, असे या गटाचे म्हणणे असते. 

एका बाजूला उत्तर-आधुनिकतावाद हा पाश्चिमात्य विज्ञानाच्या विरुद्ध केला गेलेला आक्रोश आहे, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विज्ञान हे भारताच्या परंपरेशी जोडलेले नाही, असे मानणाराही एक गट आहे. सामाजिक न्यायासाठी विवेकवाद वापरला जाणे आणि त्याचा नागरिकांमध्ये प्रसार करणे हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटनांचे काम आहे. या कामाबद्दलच शंका निर्माण करणारे अति-डावे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही पददलितांच्या बाजूने उभे आहोत असा अभिनिवेश असलेले पारंपरिक ज्ञानवादी विचारवंत सहभागी आहेत.

तिसरे आक्रमण विज्ञानावर होत आहे ते “स्वदेशी आणि हिंदुत्ववादी” लोकांकडून! काही वर्षांपूर्वी भारताच्या पंतप्रधानांनी  सायन्स काँग्रेसमध्ये “गणपतीचे डोके व तोंड म्हणजे भारतात प्लास्टिक सर्जरी आधीपासून होती याचा पुरावा आहे” अशा प्रकारचे विधान केले होते. अशा प्रकारचे विधान सायन्स काँग्रेसमध्ये करण्यामागची भूमिका काय आहे? तसे पाहता आशिष नंदी यांच्यासारख्या अभ्यासकांचा गट आणि हिंदुत्ववादी यांच्यात वैचारिक अंतर आहे; पण ‘स्वदेशीवाद’ या नावाखाली त्यांच्यात अभद्र युती आहे. वसाहतवादी आक्रमणाला गांधींनी विरोध केला होता.  ‘आमच्याकडे  पूर्वी विज्ञान होते तेच खरे’  या अभिनिवेशाखाली आधुनिक विज्ञानाला नाकारण्याचे प्रयत्न सामान्य माणसांनी करणे हा पश्चिमी आक्रमणाला (गांधींप्रमाणेच) केलेला विरोध आहे ही आक्रमक भूमिका सध्या समोर येत आहे. आपण सर्वांनी यात तथ्य काय आहे आणि मिथ्य काय आहे ते समजावून घेतले पाहिजे. 

विज्ञानावर होणाऱ्या या तीन हल्ल्यांमागे  वसाहतवादाला विरोध ही एक समान प्रेरणा आहे. त्यात काही अंशी तथ्यही आहे.  युरोपकेंद्रित इतिहास लिहिला गेल्यामुळे विज्ञान ही केवळ युरोपची देणगी आहे असे मानणाऱ्या आणि भारत व इतर पौर्वात्य देशांच्या मान-सन्मानावर हल्ला करणाऱ्या भूमिकेचा आपण निषेधच केला पाहिजे. स्वातंत्र्यापूर्वी  बिहारमध्ये भूकंप झाल्यावर गांधीजी म्हणाले होते, “आपल्याकडे अस्पृश्यता पाळली जात असल्यामुळे देवाने आपल्याला शिक्षा दिली.” त्यावर रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी आक्षेप घेतला होता, हे विसरता कामा नये!

विज्ञान हा सगळ्यांचा हक्क व वारसा आहे आणि तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले गेले पाहिजेत, अशी अंनिसची भूमिका आहे. त्यामुळे मी उत्तर-आधुनिकतावाद आणि आशिष नंदीसदृश्य तत्त्वज्ञांच्या विचारामागची प्रेरणा समजू शकलो तरी त्याच्यातील तथ्य एवढेच आहे की विज्ञानाची ओळख ही केवळ ‘अभिजन’ म्हणून नाही.  विज्ञानाची  सत्ये केवळ उच्चभ्रू आणि अभिजन वर्गासाठी/ वर्गासमान आहेत या विधानाला/आक्षेपाला आता आधार राहिलेला नाही.

“प्रत्यक्षात वैज्ञानिक सत्य अस्तित्वात नाही, ती केवळ एक सामाजिक संरचना आहे”, या विधानालाही आधार नाही. भारतीय विज्ञानाच्या इतिहासात ब्रह्मगुप्त आणि माधवाचार्य यांनी अतिशय मूलभूत योगदान दिले आहे. त्यासारख्या योगदानाबद्दल आपण जरूर बोलत राहिले पाहिजे; पण त्याचवेळी आपल्याकडच्या प्राचीन इतिहासात सर्वच क्षेत्रातील वैज्ञानिक प्रगती झालेली होती, या तर्कालाही आपण विरोध केला पाहिजे. 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वार्तापत्राच्या वार्षिक विशेषांक प्रकाशनप्रसंगी केलेल्या भाषणाचा सारांश. 

 

टॅग्स :scienceविज्ञान