श्रीमती इंदिरा गांधी खऱ्या अर्थाने देशातील सर्वशक्तिमान सत्ताकारणी होत्या, त्याच काळात ‘किचन कॅबिनेट’ किंवा ‘कोटरी’ हे शब्द रुढ झाले होते. श्रीमती गांधी यांच्या सत्तेच्या आंतरवर्तुळात ज्यांचा समावेश होता किंवा ज्यांना तिथे प्रवेश करण्याची अनुमती होती, त्यांच्यासाठी ही संज्ञा वापरली जाई. इंदिरा गांधींच्या पडत्या काळात याचेच मग मराठीत ‘चांडाळ चौकडी’ असे नामकरण झाले. अशा चौकडीतील लोक श्रीमती गांधींचे अत्यंत विश्वासू सल्लागार म्हणून ओळखले जात असल्याने त्यांची पक्षावर तसेच सरकारवरदेखील जबर पकड होती. माखनलाल फोतेदार हे नाव याच चौकडीत समाविष्ट झालेले. इंदिरा गांधींच्या हत्त्येनंतर सत्तेवर आलेल्या राजीव गांधी यांनी आवर्जून अशा लोकाना दूर सारले आणि स्वत:चे वेगळे सल्लागार नियुक्त केले. याचा एक अर्थ असा की, इंदिरा गांधींच्या विश्वासातल्या लोकाना त्यांनी खड्यासारखे दूर सारले. (कारण इंदिरा गांधींची बदनामी होण्यात त्यांचा मोठा वाटा होता) त्याचा तेव्हां आलेला रागच बहुधा या फोतेदारांनी आपल्या आत्मचरित्रात काढला असावा असे दिसते. ज्यांनी देशाच्या मध्यवर्ती सत्तावर्तुळात दीर्घकाळ घालविला आणि तो काळ जवळून बघितला त्यांच्या आत्मचरित्रांना जिज्ञासू वाचकांच्या आणि इतिहासकारांच्या दृष्टीने निश्चितच महत्व असते. त्यादृष्टीने फोतेदार यांच्या ‘चिनार लिव्ह्ज’ (ते काश्मिरी असल्याने) या आगामी आत्मचरित्राकडेही तितक्याच उत्सुकतेने बघितले जाईल यात शंका नाही. अर्थात अशा आत्मचरित्रांमधून बऱ्याचदा आत्मप्रौढी आणि सत्यापलापही केलेला आढळून येत असतो. फोतेदार यांच्या आगामी आत्मचरित्राचे जे अंश प्रसिद्ध झाले आहेत, त्यातून दिसते ते असे की फोतेदार विद्यमान राजकारण आणि विशेषत: काँग्रेसची वाटचाल याची मीमांसा करीत आहेत. पण त्यात मीमांसा कमी आणि खदखद अधिक असल्याचे जाणवते. मुळात सोनिया गांधी म्हणजे इंदिरा गांधी नव्हेत आणि राहुल गांधी म्हणजे संजय गांधी नव्हेत हे त्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. पण ते सांगतानाच राजीव जसे राजकारणात येण्यास अनुत्सुक होते तसेच राहुल गांधीदेखील राजकारणाबाबत अनुत्सुक असून सोनिया त्यांना बळेच राजकारणात ओढत आहेत असे फोतेदार म्हणतात. राजीवना इंदिराजींनी राजकारणासाठी जसे तयार केले तसे सोनियांनी राहुलबाबत केलेले नाही, त्यामुळे आज ना उद्या दोहोंच्या नेतृत्वाला पक्षात आव्हान दिले जाईल हा माखनलाल यांचा होरा किंवा दावा ( की आशावाद?) आहे. सोनियांचा उमेदीचा काळ सरला आहे आणि राहुल यांचे नेतृत्व देश कदापि स्वीकारणार नाही, असेही फोतेदार यांना वाटते. फोतेदारांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर भविष्यकाळाच्या उदरात दडलेले असणारच. पण त्यांच्या या आगामी आत्मचरित्राचे आज सत्तावर्तुळात वावरणाऱ्यांना मोठे अप्रूप वाटेल व त्याचे सहर्ष स्वागत केले जाईल याबाबत मात्र शंका नाही.
मीमांसा की खदखद
By admin | Updated: October 26, 2015 22:56 IST