डॉ. कुमुद गोसावी -सप्तरंगी इंद्रधनुष्यालाही स्वत: रंगवून घेण्याची भूल पडावी ! तशी माणसाला ‘सार्थक झाले जन्माचे’ असे स्वत:च स्वत:ला सांगता यावे! अशी आस सतत भूलभुलय्यात अडकवत असते. वास्तविक आपल्या जीवनध्येयाशी आपले तादात्म्य कमी पडलेले असते. त्यामुळे अपेक्षित यश माणसाला मिळालेले नसते.प्राचीन काळी बुधकौशिक ऋषींना ‘रामरक्षा स्तोत्र’ भगवान शिवाकडून स्वप्नात सांगितले गेले नि दुसऱ्या दिवशी त्यांनी ते लिहून काढताच त्यांना जीवनाचे सार्थक झाल्याचे वाटल्यास नवल ते काय? औरंगाबाद जिल्ह्यातील चापानेरच्या बाबासाहेब रिठ्ठे या ग्रामीण भागातील तरुणाने आपल्या कल्पकतेने हाताने वाजवले जाणारे वाद्य ‘कॅसियो’ चक्क डोक्याने वाजवण्याचा चंग बांधला. ज्या क्षणी तो पूर्णत्व पावला, त्यावेळी आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याचा या कलावंताचा आनंद म्हणजे ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ अशी अनुभूती देणारा. पद्मपुराणाच्या पातालखंडातील इच्छामरणी ‘जनका’च्या कथेत तो पुण्यात्मा स्वर्गाकडे निघाला. मात्र, त्याच्या अंगावरून जाणाऱ्या वाऱ्याच्या स्पर्शानेही वाटेतील यातनाग्रस्तांना दु:खमुक्तीचे समाधान लाभू लागले. ते जनकाच्या ध्यानी येताच त्याने यमराजाला ‘आपल्याला या दु:खी लोकांतच राहून माझे पुण्य त्यांच्या पापमुक्तीसाठी वाटायचेय, त्यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे,’ असे आवर्जून सांगितले नि त्याने त्या दु:खी-पीडितांना पापमुक्त केले! स्वत: नरकात राहून. स्वर्गातील ऐषआरामाचे जीवन न स्वीकारता जनकाने स्वेच्छेने दु:खीजनांच्या वेदनामुक्तीसाठी नरकात म्हणजे दु:खसंकटात राहण्यात जीवनाचे सार्थक मानावे, हे विलक्षणच! स्वामी विवेकानंदांनी तर कालिमातेकडे स्वत:च्या बहिणीच्या विवाहाची इच्छा पूर्ण व्हावी असे मागणे मागितले, ‘माते! मला ज्ञान दे! भक्ती दे! विवेक दे!’ स्वत:च्या आईच्या, लहान भावंडांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी शिरावर असताना विवेकानंदांनी योग्य वेळी योग्य गोष्ट करण्यातच जीवनाचे सार्थक आहे, हे जाणले नि त्यानुसार आराध्य दैवतांकडे योग्य तेच मागून घेतले.एकदा विश्वामित्रांनी वसिष्ठ ऋषींना आपल्या एक हजार वर्षांची तपस्या दान केली नि बदल्यात एक क्षण सत्संगाचे फळ दिले तेव्हा विश्वामित्रांना तो अपमान वाटला. मात्र, विश्वामित्रांना घेऊन शेषाकडे गेले. आपल्या वस्तुबळाने माझ्यावरील भार जो उचलू शकेल तो श्रेष्ठ ठरेल, अशी शेषाने जेव्हा परीक्षा घेतली, तेव्हा वसिष्ठांचे सत्संगाच्या एका क्षणाचे बळच श्रेष्ठ ठरले! जीवनाचे सार्थक सत्संग आहे हेसिद्ध झाले.
सार्थक झाले जन्माचे
By admin | Updated: February 9, 2015 01:33 IST