शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

बदलला तो माणूस, जंगल नव्हे!

By admin | Updated: February 26, 2017 23:32 IST

विंदा करंदीकर यांना मी आजपासून बरोबर १० वर्षांआधी भेटलो होतो.

विंदा करंदीकर यांना मी आजपासून बरोबर १० वर्षांआधी भेटलो होतो. त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या आठवणींनी मन गहिवरून येईल. झाडे, पाने, फुले, वन्यजीव, पशुपक्षी यांच्या प्रेमात पडलो, आयुष्यभर त्यांना जीव लावला; हा पुरस्कार त्या समर्पणाचा सन्मान आहे, असं मी मानतो.आता मी ८५ वर्षांचा झालो आहे; पण नवकोशनिर्मितीचा ध्यास काही सोडवत नाही. पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, घरट्यापलीकडे, पाखरमाया, चैत्रपालवी, केशराचा पाऊस, रानवाटा.. यांसारख्या विविध २१ पुस्तकांतून मी जंगलापलीकडचं अदृश्य जंगल वाचकांपुढे आणलं... ‘चकवाचांदणं : एक वनोपनिषद’ या आत्मकथनातून हा सगळा अरण्यप्रवास मांडला. आता पक्षिकोश पूर्ण झाला आहे. प्राणिकोश येत्या १५-२० दिवसांत छपाईला जाईल. त्यानंतर लगेच मत्स्यकोश आणि वृक्षकोशाची तयारी करायची आहे. डॉ. सलीम अलींचा हा वारसा मी पुढे चालवतोय. पण, मारुती चितमपल्लींच्या नंतर त्यांचं हे काम पुढे नेणारं दुसरं कुठलं नाव मला या क्षेत्रात दिसत नाही, याची खंत आहे.डॉ. सलीम अली शंभर वर्षे जगले. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा अभ्यास सुरू होता. आता तशी तपश्चर्या करायला कुणाकडेच वेळ नाही. किंबहुना तपश्चर्येचा अर्थच आजच्या पिढीला नीटसा कळत नाही. याचं एक उदाहरण सांगतो.एक तरुण मुलगा माझ्याकडे आला. त्याचा जंगलाचा अभ्यास होता. पक्षिनिरीक्षणाचा छंद होता. यात आणखी माहिती त्याला हवी होती. मी त्याला म्हटलं, तुला किती वेळात हे सर्व हवं आहे?तर तो म्हणाला, दोन महिन्यांत! आता सांगा. मी जे ३५ वर्षे अखंड अरण्यसाधनेतून मिळवलं, ते या तरुण मित्राला दोन महिन्यात अन् तेही बंद खोलीत कसं देणार? समर्पित वृत्तीने अभ्यास करण्याची कुणाचीच इच्छा नाही. अनेकजण तर यातही करिअरचा शोध घेत असतात. त्यांना पैसे कमवायचे असतात. जिथे लोक पैशांच्या अपेक्षेने येत असतील तिथे अरण्यतपस्वी कसे घडणार? ज्ञान आणि माहिती यातला फरक नवीन पिढीला कळत नाही, येथेच सगळा घोळ आहे. पण, मी निराश नाही. पक्षिमित्र संमेलनांनी आजही आस बांधून ठेवली आहे. मोजकेच; पण समर्पित वृत्तीचे लोक जंगलाबद्दल जाणून घ्यायला उत्सुक आहेत तोपर्यंत या निबिड अरण्यातील अनेक रंजक गोष्टी जगापर्यंत पोहोचत राहणार आहेत, हे नक्की! आज जग आधुनिक झालं आहे. इंटरनेटने जगाला अधिक जवळ आणलं आहे. पण, तिकडे जंगलात काहीच बदललं नाही. रानातून चालताना भुरळ घालणारी रुई, धोतरा, निवडुंग, बोरी, बाभळी, निंबाची काटेरी झुडपं होती तशीच आजही आहेत. वीण झाल्यानंतर सोडून दिलेली सुगरण पक्ष्याची घरटी, तळ्याकाठी सापडणारी पारी, पोपटी व उदी रंगाची पाखरांची पिसं, प्राण्यांची बोली, पक्ष्यांचे संकेत सगळं जागच्या जागेवर आहे. ...काहीच बदललेलं नाही!जो काही बदल झालाय तो इकडे माणसांच्या विश्वात झाला आहे. त्याचा थोडाफार परिणाम जंगलावर होत असतो. परंतु माझ्यासाठी आयुष्याचं विद्यापीठ असलेलं जंगल मात्र शाश्वत आहे. या क्षेत्रात आणखी बरंच काही करण्यासारखं आहे. जंगल जितकं अथांग आहे तितकी त्यात विषयमूल्यं दडली आहेत. पण, त्यांना शोधून काढणं सोपं काम नाही. त्यासाठी अंगी संन्यस्त वृत्ती लागते. ही वृत्ती नवीन पिढीच्याही अंगी रुजावी, या अपेक्षेसह मी हा पुरस्कार स्वीकारायला मुंबईला जाणार आहे.- मारुती चितमपल्ली(शब्दांकन : शफी पठाण)