सर्वोच्च न्यायालयाने फटाके म्हणजे शोभेच्या दारुच्या आतषबाजीवर बंदी लागू करण्याचे नाकारण्याचा जो निवाडा जाहीर केला आहे, तो तसा अपेक्षितच म्हणावा लागेल. राजधानी दिल्लीतील तीन अज्ञान बालकांच्या वतीने त्यांच्या वकील पित्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करुन फटाक्यांवर बंदी लागू करावी अशी मागणी केली होती. सामान्यत: अलीकडच्या काळात आवाजी फटाक्यांवर बंदी लागू करण्याची मागणी सर्वत्रच होत असते आणि सरकारदेखील आवाजाच्या विशिष्ट पातळीपेक्षा अधिक मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी लादत असते. तिचीही काटेकोर अंमलबजावणी होत नाही, हा भाग आणखीनच वेगळा. पण दिल्लीतील ज्या तीन वकिलांनी न्यायालयाकडे याचना केली, ती आवाजी नव्हे तर सरसगट सर्व प्रकारच्या शोभेच्या दारुविरुद्ध होती. कारण शोभेच्या दारुच्या आतषबाजीतून जो हानीकारक वायूमिश्रित धूर बाहेर पडतो त्याचा श्वसनक्रियेवर घातक परिणाम होऊ शकतो. याचिकाकर्त्या बालकांनी तर ‘आमची फुफ्फुसे अद्याप पूर्णपणे विकसित झालेली नसल्याने आतषबाजीतून निर्माण होणाऱ्या धुराचा त्यांच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो’ अशी भीती व्यक्त केली होती. मुळात दिवाळीचे काही दिवस आणि नंतर येणारा नाताळचा सण व नववर्षाचे स्वागत मिळून जेमतेम आठ-दहा दिवस शोभेच्या दारुपायी हवेचे प्रदूषण होत असते. पण वर्षाचे सर्वच्या सर्व दिवस विभिन्न प्रकारची, मोडकळीस आलेली वाहने प्रचंड मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित करीत असतात. दिल्लीसारख्या ठिकाणी अशा वाहनांकडून आता विशेष करदेखील सर्वोच्च न्यायालयाच्याच आदेशावरुन वसूल केला जाणार आहे. याचा अर्थ त्यांनाही रस्ता बंद केलाच जाणार नाही. फटाक्यांवरील बंदीस नकार देताना देशातील फटाका उद्योगावर आणि तदनुषंगिक व्यवसायांवर आज लाखोंची उपजीविका अवलंबून आहे. न्यायालयाने हा मुद्दाही कदाचित विचारात घेतलाच असणार. तसेही न्यायालयाने जे म्हटले ते म्हणजे याबाबतीत समाज प्रबोधन अगोदरपासूनच सुरु झाले असून त्याला हळूहळू का होईना प्रतिसाद मिळतोच आहे.
होऊ द्या आतषबाजी
By admin | Updated: October 28, 2015 21:28 IST