दिल्लीत चांगल्या जागी बदली करून देतो असे आश्वासन देऊन अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मोठाल्या रकमा वसूल करणाऱ्या पंकजसिंग या गृहमंत्री राजनाथसिंगांच्या चिरंजीवांना १५ दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यालयात बोलावून ‘समज’ दिल्याची ‘अफवा’ राजधानीत व साऱ्या उत्तर प्रदेशात लोकांच्या तोंडी आहे. पंकजसिंग हे उत्तर प्रदेश भाजपाचे सरचिटणीस असून, त्यांनी नोएडा विधानसभा क्षेत्रातून दिल्लीचे तिकीट मागितले आहे. या आधी दोन वेळा अशी तिकिटे नाकारलेल्या पंकजला आता तिसऱ्यांदाही पक्षाने तिकीट द्यायला नकार दिला आहे. पंकजविषयीची चर्चा दिल्लीत शिगेला पोहोचल्यानंतर तब्बल १५ दिवसांनी राजनाथसिंगांनी पंतप्रधान व पक्षाध्यक्ष यांच्याकडे जाऊन आपले चिरंजीव, आपण व आपले सारे कुटुंब स्वच्छ आणि निरिच्छ असल्याचे सांगितले आहे. राजनाथसिंग हे एकेकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. पुढे ते संघाच्या कृपेने भाजपाचे अध्यक्षही झाले. आता ते गृहमंत्री तर आहेतच शिवाय त्यांची ओळख उद्याचे अटलबिहारी अशी करून देण्यात त्यांचा पक्ष धन्यता मानू लागला आहे. एवढ्या वजनदार माणसाच्या पोराविरुद्ध लाचखोरीची तक्रार येणे हा प्रकार सरकारच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारा असल्यामुळे त्यातून सावरण्यासाठी लागलीच सारे सज्ज झाले आहेत. प्रथम पंतप्रधानांच्या कार्यालयाने ‘या अफवांमध्ये काही एक तथ्य नसून सिंग यांचे सगळे कुटुंबच संशयातीत असल्याचा’ खुलासा एका पत्रकातून केला. त्या पाठोपाठ पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी आणखी एक लांबलचक पत्रक काढून राजनाथसिंग यांची देशसेवा कशी वादातीत व त्यांच्या पोराचे वर्तनही कसे संशयातीत आहे, हे देशाला ऐकविले. त्यावर कडी करताना खुद्द राजनाथसिंग यांनी ‘या आरोपात जराही तथ्य आढळले, तरी मी राजकारणातून संन्यास घेऊन घरी बसेन’ अशी तोंडपाठ झालेली जुनी प्रतिज्ञा केली. एवढ्यावर हे प्रकरण दबेल आणि विस्मरणात जाईल, अशी आशा त्या साऱ्यांनी बाळगली असली, तरी त्यामागचा इतिहास मोठा आहे. २००२ पासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय असलेल्या पंकजविषयी पक्षात व राज्यात नाराजी आहे. झालेच तर राजनाथसिंगांवर आलेला हा आळ काँग्रेसने वा दुसऱ्या कोणत्या विरोधी पक्षाने आणलेला नाही. ती भाजपाच्या अंतर्गत घमासानीची परिणती आहे. पोरांमुळे बापांनी अडचणीत यायचे हा प्रकार आपल्या राजकारणात नवा नाही. राजनाथसिंगांचे हे कुटुंबकल्याण दिल्लीत रंगत असतानाच दक्षिणेत सदानंद देवेगौडा या रेल्वेमंत्र्यांच्या पोराने त्यांना नव्या घेऱ्यात आणले आहे. एका सिनेनटीशी अवैध संबंध ठेवून तिची फसवणूक केल्याचा त्याच्याविरोधातला आरोप पोलिसांत दाखल झाला आहे. देवेगौडा यांनी राजनाथसिंगांच्या तडफेने त्याचा खुलासा केला नसला, तरी त्यांनाही तो करावा लागणार आहे. त्यांच्या पोराने झिडकारलेली ती नटीही फार काळ गप्प राहील, असे नाही. ‘कोणीतरी आमच्या पक्षाला व सरकारला आतून बदनाम करण्याचे व त्यात फूट पाडण्याचे काम करीत आहे’ या अमित शाह यांच्या खुलाशात बरेच काही वाचण्याजोगे आहे. केंद्रासह पाच राज्यांत भाजपाची सरकारे आहेत आणि त्या साऱ्यांच्या मंत्र्यांवर, मंत्रिपुत्रांवर, त्यांच्या कुटुंबीयांवर आणि झालेच, तर संघ परिवारातील बहुसंख्य संघटनांवरही मोदींना आणि शाह यांना यापुढे लक्ष ठेवायचे आहे व ते काम सोपे नाही. परवा पुण्याचे एक मंत्री विदेश दौऱ्यावर जाताना अंगात नुसताच टी शर्ट आणि जीन्स घालून विमानतळावर गेले. पंतप्रधानांच्या कार्यालयाने तेथेच त्यांची फोनवरून कानउघाडणी केली व मंत्र्याला न शोभणारा तो पोशाख त्याला बदलायला लावला. दुसरे एक मंत्री एका संशयित उद्योगपतीसोबत दिल्लीतल्याच एका पंचतारांकित हॉटेलात जेवत असताना पंतप्रधानांच्या कार्यालयाने त्यांना भर जेवणातून उठायला व घरी जायला लावले... पण पंतप्रधानांच्या कार्यालयाला असे डोळे किती आणि ते पाहणार कुठवर? त्यातून परवा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात, गुन्हेगारी इतिहास असलेल्या व डोक्यावर तशा आरोपांचे ओझे मिरविणाऱ्या मंत्र्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडू न देण्याचा सल्ला पंतप्रधानांना दिला आहे. आताच्या मोदी मंत्रिमंडळात असे ओझे माथ्यावर मिरविणाऱ्या मंत्र्यांची संख्या १४ आहे. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले नसले, तरी या मंत्र्यांची तत्काळ हकालपट्टी करा, असे पंतप्रधानांना सुचविलेच आहे. मोदी सरकार सत्तेवर येऊन अवघे तीन महिने झाले तोच त्याच्या वर्तमानाचे असे धिंडवडे निघताना देशाला दिसत आहेत. विरोधी पक्ष दुबळे असणे हेच तेवढे त्याच्या आताच्या स्थैर्याचे कारण आहे.
मंत्रिपुत्रांच्या लीला
By admin | Updated: August 30, 2014 05:15 IST