सहा वर्षांपूर्वीची गोष्ट़ आळंदीच्या पुलावर राजाचे दर्शन झाले़ काचेतूनच पाहिले, कारण कार एसी होती़ शेजारी बसलेल्या साहेबाला म्हणालो़ अहो! हा आमच्या गावचा पैलवाऩ जवळ जवळ ५१ वर्षांनंतर दिसला़ साहेबाने विचारले ‘खरेच, तुम्ही त्याला ओळखले’? माझा छातीठोक होकार ऐकल्यानंतर ते म्हणाले, ‘आधी माऊलीचे दर्शन घेऊ मग राजाला भेटू़’ माऊलीचे दर्शन घेतानाही डोळ्यापुढे राजाच होता़ माऊलीचे दर्शन घेऊन बाहेर पडलो़ आळंदीच्या बस स्टॅण्डवर उतरून सर्व गाड्या पाहिल्या़ म्हटले कुठच्या तरी गाडीत बसलेला असेल़ नंतर हॉटेल आणि चहाच्या टपऱ्या धुंडाळल्या़ एका हॉटेलच्या काऊंटरवर राजाभाऊ बिल देताना दिसले़ तो मला ओळखणे शक्यच नव्हते. कारण तो गावात कुस्त्या मारायचा त्या वेळी मी चौथी पाचवीत शिकत होतो़ मोठ्याने ओरडलो, ‘राजाभाऊ! नमस्काऱ’ राजाभाऊ म्हटल्याबरोबर मुंडी आमच्या बाजूला वळली़ मला आनंद झाला़ सोबत असणाऱ्या साहेबाला शंका होती की खरेच हा राजाभाऊ असेल का? वयाची ८० तरी ओलांडली असणार. पण तब्येत दृष्ट लागावी अशी़ हनुवटीचा भाग किंचित वाकडा दिसत होता़ ‘राजाभाऊ! हे कसे झाले’? या माझ्या प्रश्नाला ‘कुस्ती जिंकली पण धडकीत हनुवटीला मार बसला’, हे त्याचे उत्तऱ राजा लंगोट बांधून तालमीत उतरला की त्याच्या देहाकडे बघत राहावे वाटे़ पिळदार शरीर, भरदार मांड्या, मजबूत दंड ठोकला की त्याचा होणार आवाज़ सारं काही आकर्षक़ राजाभाऊचे आडनाव हरसूलकर हे मला आळंदीत समजले़ ‘आता पोरं तालमीत येत्यात का’? राजाभाऊ बोलू लागला. ‘पार समदं वाटोळं झालं बघा, कसली तालीम नि कसला व्यायाम़ शरीर कमवायचं त्या वयात पोरं गुटखा खात्यात, भांग पित्यात, सिगार फु कत्यात़ काय सांगावं रंडीबाजी करत्यात’, राजाच्या डोळ्यात हे सांगताना अश्रू दाटले होते़ राजा व्यायाम करताना मारुतीसारखा वाटायचा़ गळ्यात अलंकार घालावा तसे मोठेच्या मोठे लोखंडी १०-२० किलोचे कडे घाले़ त्या कड्यावर एखाद्या मुलाला बसवे व तालमीत फेऱ्या मारी़ त्या काळात दारासिंगच्या आंधी और तुफान, आया तुफान, दारासिंग, किंगकाँग या चित्रपटाचे पेव फुटले होते़ आम्हाला मात्र वाटे दारासिंगची आणि राजाची कुस्ती लागली तर राजाच बाजी मारेल़ तालमी संपल्या, हौदातील तामडी माती पोराटोरांनी चोरून नेली़ मोठाले आरसे कोणाच्या तरी घरी लागले, लाकडी विटा जळणात गेल्या़ ‘लंगोट’ हा शब्द नवजात बाळाशी जोडला गेला़ लाल मातीचा रंग उडून गेला आहे- राजाची खंत कोण ऐकणार? राजाबरोबरच ती संपणाऱ -डॉ.गोविंद काळे
राजाची खंत
By admin | Updated: July 20, 2016 04:43 IST