चेन्नई या तामिळनाडूच्या राजधानीसह त्या राज्याच्या उत्तर भागात पाऊस, पूर आणि वादळ यांनी जो कहर केला त्यात मृत्यू पावलेल्यांचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर झाला नाही. मालमत्तेचे झालेले एकूण नुकसान स्पष्ट झाले नाही आणि साऱ्या देशभरातून आलेला मदतीचा ओघ छोटा वाटावा एवढे या आपत्तीचे स्वरुप विक्राळ आहे. रस्त्याच्या कडेने ठेवलेल्या मोटारी पाण्याच्या लोंढ्यातून वाहताना पाहाव्या लागल्या आणि विमानतळावरची विमाने पाण्यात नुसती अडलीच नाही तर तळाच्या कडेला वाहून जाऊन उलटीपालटी झालेली दिसली. मुंबईत झालेल्या पुराच्या आपत्तीला लहान ठरवील एवढा पाण्याचा हा आकांत चेन्नईच्या इतिहासातसुद्धा गेल्या सबंध शतकातला सर्वात मोठा ठरला. पाऊस अजून येत आहे, तो आणखी ४८ तास तसाच राहणार आहे आणि पाण्यात अडकलेल्या लोकांसमोरचे जीवनमरणाचे संकट अजून संपले नाही. याआधी जपानमध्ये आलेल्या समुद्री संकटात पाहावी लागली तशी मोटारींची व विमानांची वाहत जाऊन झालेली नासधूस परवा चेन्नईत पाहावी लागली. एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देता येईल एवढी समर्थ यंत्रणा देशात नाही. तिच्या अपुरेपणाचा अनुभव देशाने आजवर अनेकदा घेतलाही आहे. मात्र चेन्नईचे संकट आताच्या यंत्रणेचाही पुरता बोजवारा उडविणारे, सरकारची हतबलता उघड करणारे आणि सामान्य माणसांची अशा संकटकाळात प्रगटणारी इच्छाशक्ती व सामाजिक भावना स्पष्ट करणारे ठरले. सरकार थकले तेव्हा साधी माणसे उभी राहिली. त्यांच्या संघटनांनी घराघरात अडकलेली आणि गळ््याएवढे पाण्यात बुडालेली माणसे बाहेर काढण्याची शिकस्त केल्याचे दिसले. आपत्तीच्या काळात समाजात येणारे हे एकीचे बळ हाच त्याच्या संघटित वृत्तीचा व सामर्थ्याचा खरा साक्षात्कार असतो. चेन्नईच्या संकटात याच वृत्तीने अनेकांना बळ दिले व जगविले आहे. मात्र निसर्गाचा कोप म्हणून अशा आपत्तीकडे यापुढे नुसतेच पाहाता येणार नाही. मुंबईतील पुराचे संकट, तिथली मिठी नदी लोकांनी व बिल्डरांनी अतिक्रमण करून बुजविल्यामुळे मोठे बनले. कधीकाळी जिवंत व वाहत्या असणाऱ्या मिठीने आपल्यावरील अतिक्रमणाचा तेव्हा सूडच उगविलेला महाराष्ट्राला दिसला. चेन्नईतील संकटाचे असे मानवनिर्मित स्वरुपही यानिमित्ताने पाहावे असे आहे. त्या शहरातील व शहराभोवतीची ६०० हून अधिक तळी बिल्डरांनी आणि अतिक्रमकांनी त्यांच्या राक्षसी आकांक्षेपायी बुजवून त्यावर मोठाल्या इमारती आणि मॉल्स उभे केले. चेन्नईतून वाहणाऱ्या अड्यार या छोट्याशा नदीचे पात्रही या अतिक्रमकांनी संकुचित करून तिची अडवणूक करण्याचा मार्गही अवलंबिला. आताच्या पुराने या साऱ्या बुभुक्षितांच्या अतिक्रमणाचे पाप अधोरेखित केले असले तरी यापुढे ते कायमचे थांबेल याची शक्यता कमी आहे. बिल्डरांची भूक मोठी आहे आणि राजकारणी माणसांशी असणारे त्यांचे देशभरातील संबंध साऱ्यांना ठाऊक आहेत. मुंबईतील पुराने त्या शहराला व त्यातल्या कर्त्या माणसांना आजवर कितीसे व काय शिकविले? त्या शहरातील माणसांना दरवर्षी पावसाळी परीक्षा अजून द्यावी लागते. राज्याचे सरकार, महापालिका आणि नेत्यांचे वर्ग तेथे एकत्र असतानाही दरवर्षी येणाऱ्या या आपत्तीला त्यांनी कितीसे तोंड दिले? पाश्चात्त्य देशातही नद्यांना पूर येतात, वादळे होतात आणि त्सुनामीसारखी संकटेही येतात. पण त्यातली मोठी शहरे अशी सर्वतोपरी पाण्याखाली जात नाहीत. प्रत्येक मोठ्या शहरात अतिरिक्त पाण्याचा निचरा करता येणाऱ्या मोठ्या यंत्रणा कार्यरत असतात आणि त्या सुस्थितीत राहतील याची कायम तजवीज केली जाते. आपत्ती नियंत्रणाची यंत्रणा या नावाची बाब आपल्याकडेही आहे. मात्र ती असावी तेवढी सावध कधीच नसते आणि येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्याएवढी ती सक्षमही नसते. अशा संकटाच्या वेळी आपल्याकडे सरकारी मदतीचे आकडे जाहीर होतात. लष्कर, नाविकदल आणि हवाईदलाच्या तुकड्या मदतकार्यासाठी पाठविल्या जातात. आणि पुढारी? ते पूर ओसरू लागल्यानंतर हेलिकॉप्टरांमधून त्याची हवाई पाहाणी करतात. अगदीच काही न करण्यापेक्षा हे करणे बरे असले तरी ते पुरेसे नाही. चेन्नईत वीज पुरवठा बंद आहे. वाहतूक थांबली आहे. बाहेरची वाहने येऊ शकत नाहीत. विमानतळावरील उड्डाणेही थांबविली गेली आहेत. बाजार बुडाला आणि तळमजल्यावर राहणारी माणसे आपल्याजवळचे अन्नधान्य व सारे किडुकमिडुक गमावून बसली. सगळे मानवी प्रयास कुचकामी ठरावे आणि आकाशाचा कहर साऱ्यांहून मोठा ठरावा अशी ही स्थिती आहे. या स्थितीला काही स्वार्थी लोकांचा हातभारही लागला आहे. अशा आपत्तींचे निवारण करायचे तर राजकारणालाच आपला स्वार्थ बाजूला ठेवून बिल्डरांच्या मुसक्या आवळण्याची तयारी केली पाहिजे. शिवाय अतिक्रमण करणाऱ्यांचा आणि शहरात व गावात असणारी तळी वा नदीनाले बुजवून टाकणाऱ्यांचा कठोर बंदोबस्त केला पाहिजे. मुंबई आणि चेन्नईसारखी देशातली महत्त्वाची शहरे या आपत्तीतून मुक्त राहणार नसतील तर देशातील इतर लहानसहान शहरांची व खेड्यांची अवस्था अशावेळी कशी होऊ शकेल याचा भीषण धडाच या संकटाने साऱ्यांसमोर उभा केला आहे.
चेन्नईतील कहर व शासनाचे उत्तरदायित्व
By admin | Updated: December 4, 2015 02:12 IST