केवळ कोकणात नव्हे, तर निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या दिवे आगार सुवर्ण गणेशाच्या चोरीच्या घटनेने फार मोठी खळबळ उडाली होती. तिथे सुरक्षेसाठी असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांचे खून करून, भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इथल्या सुवर्ण गणेशाची चोरी झाली होती. यापूर्वी दानपेटी चोरीच्या घटनाही अनेकदा घडलेल्या आहेत. मात्र, थेट देवच पळवून नेल्याची घटना घडल्याने भाविकांच्या श्रद्धेलाच धक्का बसला होता. श्रद्धा आणि देवत्व या गोष्टी थेट कायद्यात बसत नसल्याने, कोर्ट-कचेरीत याचा निकाल कसा लागणार, याची चिंताही होती. मात्र, न्यायालयाने आरोपींना कायमची अद्दल घडवली. रायगड जिल्ह्यातील दिवे आगारमधील सुवर्ण गणेशाच्या मंदिरावर पाच वर्षांपूर्वी दरोडा टाकून, दोघा निष्पाप सुरक्षा रक्षकांचा अत्यंत निर्घृणपणे लोखंडी पहारींनी खून करून, सुवर्ण गणेशाची १ किलो ३२५ ग्रॅम सोन्याची प्राचीन मूर्ती व २२५ ग्रॅम वजनाचे अन्य सोन्याचे दागिने, असा ११ लाख २० हजार रु पये किमतीचा ऐवज लुटून नेणाºया १० दरोडेखोरांपैकी पाच जणांना आजन्म जन्मठेप आणि उर्वरित पाचपैकी तीन महिलांसह दोघांना सक्तमजुरीचा झालेली शिक्षा, ही त्या सुवर्ण गणेशानेच दिली असल्याची भावना दिवे आगारसह राज्यातील सर्व गणेशभक्तांची आहे. देव आणि भक्ती या संकल्पनेला जरी कायद्यात स्थान नसले, तरी सोन्याच्या गणपतीची चोरी करून, तो वितळवून त्यांची विक्री करणे, हा गुन्ह्याचा प्रकार केवळ नास्तिकता दर्शविणारा नाही, तर देव ही संकल्पना मानणाºया लाखो-करोडो लोकांच्या मनावर भावनिक वार करणारा असाच आहे. ‘रेअरेस्ट आॅफ द रेअरेस्ट’ अशा प्रकारच्या गुन्ह्यातच फाशीची शिक्षा देता येते आणि हा गुन्हा तसाच असल्याने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील यांनी न्यायालयाकडे केली होती. पोलीस तपास यंत्रणेने धार्मिक भावना कुठेही दुखावणार नाही, याची सतत काळजीही घेतली. प्रारंभी हे दरोडेखोर देव आणि भक्ती यावर मोठी श्रद्धा असणाºया महाराष्ट्रातील नसावेत, अशी भावना पोलीस तपास यंत्रणेची होती. परिणामी, दिवे आगारपासून तपासास प्रारंभ केल्यावर सापडलेल्या एका तपासाच्या दुव्यानुसार पोलीस तपास पथके शेजारील राज्यातदेखील पोहोचली होती, पण अखेर दरोडेखोर आपल्याच राज्यातील असल्याचे निष्पन्न झाल्यावर, पोलीस तपास यंत्रणादेखील थक्क झाली.श्रद्धेला तडा देणाºया या घटनेबरोबरच, खुनासारख्या कृत्याला अखेर योग्य ती शिक्षा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. शेवटी श्रद्धा एखाद्या मूर्तीमध्ये नसते, तर ती आपल्या मनातही असते. दिवे आगारच्या घटनेनंतर जो निकाल लागला, त्यामुळे श्रद्धेला बळकटी प्राप्त झाली. ही जनमानसात उमटलेली भावना आजच्या समाजमनाचे प्रतिबिंब व्यक्त करते.
श्रद्धेला मिळाला न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 03:31 IST