राज्यपालांच्या दौऱ्यामुळे नाशिक व नंदुरबार जिल्ह्यातील नागलवाडी व पिंपळखुटा गावात घडून आलेल्या प्रासंगिकविकासाला यापुढील काळातस्थायित्व लाभू शकेल का?कर्तव्यदत्त कामात कसूर करणाऱ्या नोकरशाहीला हल्ली प्रासंगिक, तात्कालिक व पर्यायाने वेळकाढू उपाययोजनांवरच निभावून नेण्याची सवय जडल्याने शासनातील महनीय व्यक्तींचे दौरे अंशत: का होईना लाभदायी ठरत असतात. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी नाशिक व नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी गावांना दिलेल्या भेटीनिमित्त त्या-त्या गावांच्या झालेल्या कायापालटातूनही हीच बाब अधोरेखित होऊन गेली आहे.प्रशासकीय यंत्रणेने घातलेली हाता-पायांची घडी सोडवणे हे किती जिकिरीचे असते याबद्दल सविस्तर विवेचन करण्याची गरज नसावी. किरकोळ वा सहजशक्य म्हणवली जाणारी विकासकामे साकारतानाही त्यासाठी बनविली जाणारी ढीगभर कागदपत्रे व त्या कागदपत्रांचा या टेबलावरून त्या टेबलावरचा प्रवास अनेकांनी कधी ना कधी अनुभवून झालेला असतो. पण जेव्हा शासनातील एखादी महनीय व्यक्ती कुणा गावाला भेट देण्यासाठी येते, तेव्हा हीच यंत्रणा प्रचलित ‘अ’व्यवस्थांमधून मार्ग काढत अवघ्या दोन-चार दिवसांत वा प्रसंगी काही तासांत आपल्यातील कार्यक्षमतेचा असा काही परिचय घडवून देते की, कुणीही आश्चर्याने अवाक् व्हावे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या दौऱ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील नागलवाडी व नंदुरबार जिल्ह्यातील पिंपळखुटा या अतिदुर्गम आदिवासी गावांच्या बदललेल्या रंग-रूपाकडे याच संदर्भाने पाहता येणारे आहे. ते बघूनच दोन्ही ठिकाणी लगतच्या गावकऱ्यांनीही राज्यपालांना आपल्या गावी येण्याचा आग्रह धरल्याचे दिसून आले. त्यांच्या येण्याने तरी आपल्या गावाचा चेहरा-मोहरा बदलेल, अशी आशा त्यामागे होती. तेव्हा, राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तींच्या दौऱ्यामुळे घडून येणारा सदरचा प्रासंगिक विकास स्थायी व सार्वत्रिक स्वरूपात का घडून येऊ नये हा तर याबाबतीतला खरा मुद्दा आहेच, पण तो यापुढील काळातही टिकवून ठेवता येणार आहे का, असा प्रश्नही आहे.यासंदर्भातील आजवरचा अनुभव समाधानकारक नाही, म्हणूनही हा प्रश्न महत्त्वाचा ठरावा. यापूर्वी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रपतिपदी असताना आॅक्टो. २००५ मध्ये इगतपुरी तालुक्यातील वैतागवाडीनामक वस्तीवर येऊन गेले होते. त्यांच्या येण्याने चकाचक झालेल्या या वस्तीच्या नावातील ‘वैताग’ खुद्द राष्ट्रपती महोदयांनी दूर करीत या वस्तीला आशाकिरणवाडी असे नाव दिले होते. परंतु तद्नंतरच्या काळात विकासविषयक कुठल्याही योजनेच्या बाबतीत आशेचा किरण बाळगावा, अशी तेथली परिस्थिती राहिली नाही. आज तेथील ग्रामस्थांना वस्तीच्या मूळ नावाप्रमाणे ‘वैतागा’चाच सामना करावा लागत आहे. चारच वर्षांपूर्वी सप्टें. २०१० मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व संपुआ अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली येथून देशातील आधारकार्ड वितरण योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यावेळी टेंभलीचाही चेहरा-मोहरा असाच रात्रीतून बदलण्यात आला होता. आज त्या विकासाची गंध-पावडर तर उडून गेली आहेच, परंतु ज्या गावातून ‘आधार’चा देशपातळीवरील शुभारंभ करण्यात आला ते गावही खुद्द शंभर टक्के ‘आधार’युक्त होऊ शकलेले नाही. ही उजळणी यासाठी की, मान्यवरांच्या येण्याने अवतरणारा प्रासंगिक विकास नंतरच्या काळातही टिकून राहिल्याचे उदाहरण अपवादाने आढळावे. तेव्हा, विकास ही जर निरंतर चालणारी प्रक्रिया असेल तर ती अशी प्रसंगोपातच का घडून यावी? आपल्या यंत्रणा स्थायी स्वरूपाची कामे करण्यापेक्षा अथवा त्याकडे निरंतर लक्ष पुरविण्याऐवजी तात्कालिक, दिखाऊ वा प्रदर्शनी आणि पर्यायाने झगमगाटी कामांतच कशा समाधान शोधत असतात याचे उत्तर या उदाहरणांतून मिळून येणारे आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उत्तर महाराष्ट्रातील दौऱ्यानिमित्त नागलवाडीचा जो विकास झाला व पिंपळखुटा गावाला जोडणारा जो रस्ता झाला त्याचीही अवस्था वैतागवाडी वा टेंभलीसारखी होऊ नये म्हणजे झाले.- किरण अग्रवाल
राज्यपाल येती गावा...
By admin | Updated: February 5, 2015 23:58 IST