शहरं
Join us  
Trending Stories
1
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
2
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
3
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
4
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
5
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
6
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
7
धक्कादायक! प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या; मनोरंजन विश्वात खळबळ
8
खळबळजनक! वहिनीचं भयंकर 'सरप्राईज गिफ्ट'; नणंदेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तव्याने केले ५० वार
9
IND vs SA: टी२० मध्ये सुपरफास्ट ४००० धावा, तिलक वर्माचा नवा विक्रम, विराटलाही टाकलं मागं!
10
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
11
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
12
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
13
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
14
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
15
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
16
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
17
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
18
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
19
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
20
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: जगाच्या राजकीय मैदानात लाथांचा खेळ!

By विजय दर्डा | Updated: December 26, 2022 08:36 IST

बड्या शक्तिशाली देशांनी छोट्या आणि कमजोर देशांचा फुटबॉल केला आहे. त्यांच्या मनात येईल तेव्हा आणि मनात येईल त्याला ते लाथ घालणार!

विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह कतारमधल्या लुसेल स्टेडिअमवर अर्जेंटिनाचा सुपरस्टार लियोनेल मेस्सी आणि फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर किलियन एम्बापे यांच्यात काळजाचा ठोका चुकवणारी टक्कर सुरू होती. मीही फुटबॉलच्या त्या रोमांचक सामन्याचा श्वास रोखून आनंद घेत होतो. खेळाचा वेग जितका अधिक होता तितकीच माझ्या हृदयाची धडधडही वाढत होती; आणि मनात तेवढ्याच तीव्रतेने काही प्रश्न धडका देऊ लागले होते. - मनात आले, जगात तरी वेगळे काय चालले आहे? जगाच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या राजकारणात शक्तिशाली देशांनी छोट्या, कमजोर देशांना फुटबॉलचे मैदान का केले आहे? विजयाचा आनंद लुटण्यासाठी मनात आले की ते किक मारतात. सगळ्यात मोठा प्रश्न असा की फुटबॉलच्या या मैदानावर आपण आपल्या देशाचा विजय कधी साजरा करणार? 

या दुनियेत प्रेमाचे रंग भरण्याची क्षमता केवळ दोनच माध्यमात आहे. एक म्हणजे संगीत आणि दुसरा खेळ; परंतु खेळात राजकारण घुसलेच आहे. जगाच्या राजकारणाचा खेळ होऊन बसला आहे. महाबली अमेरिकेच्या मनात आले, त्याने पाकिस्तानला मांडीवर बसवून घेतले आणि खप्पामर्जी झाली तशी लाथही मारली. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना इच्छा झाली आणि त्यांनी आसपासच्या छोट्या, दुर्बल देशांना लाथ घातली; आणि आता तर ते युक्रेनला नेस्तनाबूत करण्याच्या पवित्र्यात  आहेत. उत्तर कोरियाला अमेरिका सातत्याने लाथा घालत आहे. अमेरिका, चीन आणि रशियासारखे मोठे आणि शक्तिशाली देश कमजोर आणि छोट्या देशांना नाउमेद करण्याचा प्रयत्न हरप्रकारे करत असतात. आफ्रिकी देशांकडे पाहिले तर तिथे कोणी हुकूमशहा आपल्याच जनतेला लाथा घालत असतो.

अफगाणिस्तानसारख्या देशात प्रत्येकच व्यक्ती फुटबॉलसारख्या लाथा खात आहे. कोट्यवधी लोक खुल्या हवेत श्वास घेऊ इच्छितात; परंतु कधी कुणाची लाथ बसेल कळणारही नाही, असे त्या देशाचे प्राक्तन !  फुटबॉलच्या मैदानात बॉल गोलपोस्टवर पोहोचण्याला महत्त्व असते. कारण त्याशिवाय विजयाचा अध्याय लिहिला जात नाही. जगभरात लाथा खाणाऱ्या छोट्या देशांच्या नशिबी मात्र हे गोलपोस्ट नाही. 

खेळाचा आनंद घेत असताना मला २०१८चा फिफा विश्व करंडक आठवला. भर पावसात फिफाचे चेअरमन जिआनी इन्फान्टिनो यांच्या डोक्यावर छत्री धरून एक माणूस उभा होता.  पुतीन यांच्या डोक्यावर मात्र छत्री नव्हती... हा फिफाच्या चेअरमनचा थाट ! आणि का असू नये? शेवटी फुटबॉल हे बंधुत्व आणि प्रेम वाढविण्याचे एक माध्यम आहे. या बंधुत्वासाठीच तर फिफाची सुरुवात झाली. हेही खरे की जगभरातल्या अनेक देशांत फुटबॉल चाहते आपापल्या संघांवर भडकले की जाळपोळ करत सुटतात. त्यात आजवर शेकडो लोकांचे बळीही गेले आहेत. पण, खेळ कधीही हिंसा शिकवत नाही.

खेळ एखाद्या देशाचे नशीब कसे बदलू शकतो याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे अर्जेंटिना ! सुमारे ५० वर्षांपूर्वी अर्जेंटिनाला सर्वात श्रीमंत आणि ताकदवान देश होण्याची अपार क्षमता असलेला देश मानले जात होते. पण आजही तिथे दहापैकी चार लोक गरीब आहेत. १४ वर्षांखाली असलेल्या मुलांची अर्धी लोकसंख्या गरीब आहे. तरीही त्या देशात फुटबॉलचा माहोल जबरदस्त ! ते पाहिले की मनात येते, आपल्याकडच्या जिल्ह्यांपेक्षाही कमी लोकसंख्या असलेले छोटे छोटे देश फुटबॉलच्या मैदानावर मोठी कामगिरी गाजवू शकतात, तर १३० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला आमचा देश या मैदानावर मागे का? भारतात फुटबॉलबद्दल प्रेम नाही का? - तेही खरे नव्हे !  पश्चिम बंगाल, केरळ, महाराष्ट्र आणि गोव्यापासून आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय त्रिपुरा, नागालॅंड, मणिपूर आणि इतकेच नव्हे तर काश्मीरच्या डोंगराळ भागातही मुले फुटबॉल खेळताना दिसतात. या मुलांमध्येही पेले, रोनाल्डो, मेस्सी, मबखौत, हुसेन, सईद नेमार आणि सुनील छेत्रीसारखे खेळाडू तयार होण्याची क्षमता आहे. त्यांना योग्य दिशा आणि ऊर्जा मिळाली पाहिजे !- तिथेच नेमकी आपण माती खातो; म्हणूनच आंतरराष्ट्रीय मानांकनात आपण शंभराच्या खाली ढकलले गेलो. 

भारतात जिद्दीची कमतरता नाही. कधीच नव्हती. १९४८ साली लंडन ऑलिम्पिकमध्ये फ्रान्सविरुद्ध खेळताना भारताच्या ११ पैकी आठ खेळाडूंना पायात बूट नसताना मैदानात उतरावे लागले होते. नागालँडमध्ये राहणारे डॉक्टर आणि भारतीय संघाचे कप्तान ताली मेरेन येवो यांना त्याबद्दल विचारले गेले, तेव्हा ते हसून म्हणाले ‘तुम्ही इथे बुटबॉल खेळता ना, भारतात आम्ही फुटबॉलही तसाच खेळतो !” खेळाच्या बाबतीत आपली सरकारे उदासीन होत गेली हे दुर्दैव होय. १९८२ साली तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या विशेष प्रयत्नांनी दिल्लीत आशियाई स्पर्धांचे आयोजन झाले. दिल्लीचे नशीब उजळले. एशियाडचा शुभंकर अप्पू देशभर पोहोचला; त्यानिमित्ताने भारतात रंगीत टीव्हीही आला. या प्रयत्नांमध्ये सातत्य राखले गेले असते तर मैदानावर आपला भारत कुठल्या कुठे पोहोचला असता. देशात पुरेशी मैदाने नसतील, खेळाविषयी आस्थाच नसेल तर चांगले खेळाडू कसे निर्माण होणार? आज आपल्या देशात खेळाचा अर्थ केवळ क्रिकेट एवढाच उरला आहे.

मी क्रिकेटचाही शौकीन आहे. तरुण असताना क्रिकेट खेळायचोही; पण या एका खेळाच्या सावलीत दुसरे खेळ खुरटून जावेत हा कुठला न्याय? खासगी क्षेत्र क्रिकेटचे संगोपन करते आहे. 

फुटबॉल आणि इतर खेळांसाठीही खासगी क्षेत्राने सहकार्याचा हात पुढे केला आहे; परंतु एवढे पुरेसे नाही. सरकारला  पुढे यावे लागेल. आपल्या देशातही आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामन्यांचे आयोजन व्हावे यासाठी पंतप्रधान मोदी यांना पुढाकार घ्यावा लागेल. त्यातून पायाभूत सुविधाही विकसित होतील; आणि मुलांमध्ये खेळाबद्दल आस्था, प्रेम उत्पन्न होईल. भारताचे खेळाडूही फुटबॉल विश्वचषकात गोल करतील आणि आम्ही शिट्या वाजवू, नाचू-गाऊ, जल्लोष करू.... असा एक दिवस येईल अशी उमेद बाळगूया.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Footballफुटबॉल